Saturday, September 7, 2024

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर

Share

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होईल. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेची तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुरलीधऱ मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात लढत होईल.

यंदा पुणे लोकसभेसाठी २० लाख ३ हजार ३१६ मतदारांची यादी तयार झाली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ मतदारांच्या संख्येचा विचार करता सर्वात मोठा मतदारसंघ असून त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागतो. त्यामुळे हे दोन विधानसभा मतदारसंघ मतदानामध्ये निर्णायक ठरणार आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात, त्यात चंद्रकांत पाटील, कोथरूड, माधुरी मिसाळ, पर्वती आणि सुनील कांबळे, कॅन्टोन्मेट हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सुनील टिंगरे, वडगावशेरी आणि चेतन तुपे, हडपसर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. रवींद्र धंगेकर, कसबा पेठ हे काँग्रेसचे आमदार आहेत.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारासंघांमध्ये पुणे लोकसभेचा क्रमांक ३४ आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघात मिळून मतदारांची एकूण संख्या २० लाख ३ हजार ३१६ एवढी आहे. त्यामध्ये १० लाख २८ हजार ८४३ पुरूष मतदार तर, ९ लाख ७४ हजार १६५ स्त्री मतदार आहेत. ३०८ मतदार तृतीयपंथी आहेत.

वडगावशेरी मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख ५२ हजार ६२८ मतदार आहेत. त्यामध्ये २ लाख ३५ हजार ३२२ एवढी संख्या पुरूष मतदारांची आहे. तर २ लाख १७ हजार २०५ स्त्री मतदार आहेत. १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २ लाख ७२ हजार ७९८ एवढी असून १ लाख ३८ हजार ५१४ पुरूष आणि १ लाख ३४ हजार २४३ स्त्री मतदार आहेत. ४१ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद जिल्हा निवडणूक शाखेकडे आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात ४ लाख १ हजार ४१९ मतदारांपैकी २ लाख १० हजार ५७१ पुरूष मतदार असून स्त्री मतदारांची संख्या १ लाख ९० हजार ८२८ आहे. २० तृतीयपंथी मतदार आहेत.

पर्वती मतदारसंघात १ लाख ७१ हजार २९९ पुरूष आणि १ लाख ६२ हजार ७४९ स्त्री मतदार असे मिळून ३ लाख ३४ हजार १३६ मतदार आहेत. या मतदारसंघात ८८ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील २ लाख ६९ हजार ५८८ मतदारांपैकी १ लाख ३७ हजार ९२२ पुरूष मतदार आहेत. तर १ लाख ३१ हजार ६३८ स्त्री मतदार आहेत. २८ तृतीयतपंथी मतदार आहेत.

कसबा पेठ मतदारसंघात १ लाख ३५ हजार २१५ पुरूष १ लाख ३७ हजार ५०२ स्त्री मतदार आहेत. ३० तृतीयपंथी मतदार आहेत. येथे एकूण २ लाख ७२ हजार ७४७ मतदार आहेत.

निवडणुकीच्या दृष्टीने पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण दहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील केंद्रांची संख्या कसबा विधानसभा मतदारसंघात असून ती ९ आहे. वडगावशेरी, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात एक संवेदनशील मतदान केंद्र आहे.

अन्य लेख

संबंधित लेख