Friday, December 27, 2024

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास

Share

महाकुंभ : हिंदू धर्मात महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याला मोठे महत्त्व आहे, यावेळी कुंभमेळा (kumbh Mela) 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण सहा शाही स्नान होणार आहेत.

त्यात सहभागी होण्यासाठी लांबून लोक येतात. महाकुंभ मेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यवधी भाविक स्नानासाठी येतात. त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे .

परंतु, कुंभमेळा म्हणजे काय? त्याचे महत्व काय ? १२ वर्षांनीच कुंभ मेळा का येतो ? गुरू ग्रहाचे आणि महाकुंभचे महत्त्व काय आहे?

कुंभमेळा- अर्थ

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ शब्दाचा अर्थ घडा / घट असा होतो आणि बऱ्याचदा ‘कलश’ म्हणुन देखील या शब्दाचा वापर होतो. भारतीय ज्योतिष शास्त्रात ‘कुंभ’ नावाची राशी देखील आहे. मेळयाचा अर्थ ‘एकत्रित येणे’ अथवा ‘यात्रा’ असा होतो. ‘कुंभ’ / घट याचा शब्दश: अर्थ घडा / घट असा असा होत असला तरी मुलभूत अर्थ वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर घट, ‘कुंभ’, ‘कलश’ हिंदु संस्कृतीतील पवित्र कार्यातील एक अविभाज्य घटक आहेत. हाच घट कुंभाचे प्रतिक मानला जातो.

कलशस्य मुखेविष्णु : कण्ठे रुद्र समाश्रित: मूलेतय स्थितो ब्रम्हा मध्ये मातृगणा : स्मृत: || कुक्षौ तु सागरा : सर्वे सप्त दीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुवेदो सामवेदोअथर्वण: || अंगैश्च सहित: सर्वे कलशं तु समाश्रिता:

साध्या भाषेत वर्णन करायचे तर, कुंभमेळा म्हणजे एक महोत्सव जो अमृताने भरलेल्या जलस्रोतच्या जवळ आयोजित केला आहे.

अमृत आणि पाणी आणि कुंभमेळ्याचा काय संबंध आहे?

हे जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदू पौराणिक ग्रंथामधील एका अध्यायाबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्यामुळे कुंभमेळा साजरा केला जातो.

पौराणिकदृष्ट्या कुंभमेळा

देव आणि दानव मध्ये ‘अमुल्य रत्न’ आणि अमृत प्राप्त करुन घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्टया कुंभमेळयाशी निगडीत आहे. समुद्र मंथना दरम्यान मंद्राचल पर्वतास ‘रवी’ तर नागराजा वासुकीचा ‘दोर’ म्हणुन उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निसटून सागरात बुडू नये यासाठी स्वत: भगवान विष्णुनी ‘कासव रुप’ घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला. मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ संबोधण्यात येते. समुद्र मंथनातून यानंतर कामधेनु, उकश्रर्शव नावाचा हत्ती इत्यादी रत्न प्राप्त झाले. मंथनातून अमृतकलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत याने हेरली आणि दानवांच्या हाती अमृतकलश लागू नये म्हणून धन्वंतरींच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरु केला. देवलोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो. जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणुन बारा दिवस कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती चार ठिकाणे म्हणजे हरिव्दार, प्रयाग ,नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन होय. या चार ठिकाणी सुर्य, चंद्र आणि गुरु ग्रहाची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो. अमृतकलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव, आणि चंद्राची मदत झाली. स्कंदपुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे तर कलशातून अमृत सांडले म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे.

या महत्त्वामुळेच, “नाशिक”, “प्रयागराज”, “उज्जैन”, “हरिद्वार” मध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. अशी एक मान्यता आहे की ज्योतिषगणना नंतर जेव्हा जेव्हा १२ वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो, तेव्हा या नद्या त्या “अमृताचे” रूप धारण करतात. अमृत धारण केलेल्या या नद्यांमधे मध्ये “शाही स्नान” केल्याने लोकांची सर्व पापे नाहीसे होतात.

गुरू ग्रहाचे आणि महाकुंभचे महत्त्व, पृथ्वीच्या रक्षणात गुरूची भूमिका

महाकुंभमेळा, जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम, दर 12 वर्षांनी प्रयागराज (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे साजरा केला जातो. हा 12 वर्षांचा चक्र गुरू ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीशी संबंधित आहे. प्राचीन भारतीय ऋषींनी बृहस्पतिचा प्रभाव आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेतले आणि त्याला महाकुंभ सारख्या धार्मिक विधींचा आधार बनवला. बृहस्पतिला “गुरु” म्हटले गेले आहे, ज्याचा अर्थ मार्गदर्शक आणि ज्ञानाचा स्रोत असा आहे.

गुरूचे १२ वर्षांचे चक्र आणि खगोलशास्त्रीय महत्त्व

गुरूला सूर्याभोवती फिरायला अंदाजे 12 पृथ्वी वर्षे लागतात, आणि हे 12 वर्षांचे चक्र हिंदू कॅलेंडर आणि ज्योतिषशास्त्रीय परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाकुंभाचे आयोजन गुरु, सूर्य आणि चंद्राच्या विशेष ज्योतिषीय स्थितीच्या आधारावर केले जाते, ज्यामुळे हा कालावधी अत्यंत शुभ मानला जातो.

गुरू ग्रह पृथ्वीच्या रक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्याची प्रचंड आकार आणि गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला एक संरक्षण कवच प्रदान करते. गुरू ग्रह आवश्यक लघुग्रह आणि धूमकेतू यांना स्वतःकडे आकर्षित करतो, ज्यामुळे ते पृथ्वीपासून दूर राहतात आणि पृथ्वीवरील संभाव्य आक्रमणाचा धोका कमी होतो.

महाकुंभमेळा वैश्विक शक्ती आणि ग्रहांच्या शक्तींशी आपल्या आध्यात्मिक संबंधाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून, महाकुंभाच्या माध्यमातून पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या बृहस्पतीचे कृतज्ञतेने पूजन केले जात आहे. विज्ञानाने या परंपरेमागील खगोलशास्त्रीय कारणे सिद्ध केली आहेत, ज्यामुळे प्राचीन भारतीय ज्ञानाचे गाढ आणि वैज्ञानिक पातळीवर महत्त्व स्पष्ट होते.

Kumbh Mela 2019 Key Statistics and Participation Numbers

महाकुंभ दरम्यान, लाखो भाविक गंगा, यमुना, आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करतात. हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरण आणि वैश्विक ऊर्जेशी आध्यात्मिक संबंध स्थापण्याचे प्रतीक आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निसर्गातील घटक आणि ग्रहांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे कारण आपल्या जीवनाचे ते पालनपोषण करतात.

वैदिक परंपरेत, बृहस्पतिला “देवगुरु” (देवांचा गुरू) म्हटले गेले आहे. बृहस्पति ज्ञान, मार्गदर्शन आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. त्याचा प्रचंड आकार आणि स्थिरता यामुळे गुरू ग्रह सूर्यमालेचा “संरक्षक ग्रह” बनतो. गुरुची ही स्थिरता मानवी जीवन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुरक्षित ठेवते.

महाकुंभमेळा आणि बृहस्पतिचे 12 वर्षांचे चक्र यांच्यातील संबंध हे प्राचीन भारतीय ज्ञानाचे एक अद्भुत उदाहरण आहे. गुरू ग्रह केवळ पृथ्वीचे रक्षण करत नाही, तर मार्गदर्शक आणि संरक्षक म्हणूनही त्याची पूजा केली जाते. ही परंपरा विज्ञान आणि अध्यात्माचे अद्भुत संमिश्रण दर्शवते, जी भारतीय संस्कृतीच्या खोल खगोलशास्त्रीय ज्ञानाची साक्ष देते आणि समृद्ध वारसा असलेल्या या परंपरेचे महत्त्व स्पष्ट करते.

या भागात एवढेच पुढील भागात आपण कुंभमेळयाबद्दल अजून गोष्टी जाणून घेऊयात…

अन्य लेख

संबंधित लेख