Saturday, March 15, 2025

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण 

Share

सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दसंपदेची देणगी दिली आहे. त्यांनी फारसी व इंग्रजी प्रभाव कमी करून मातृभाषेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशात उर्दू-फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषाशुद्धी केली होती, मात्र स्वराज्य क्षीण झाल्यावर ती चळवळ मंदावली.

मराठीवरील पहिले आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या रूपाने आले. शिवरायांनी त्यास प्रतिकार केला. दुसरा हल्ला युरोपियन शक्तींचा होता, आणि त्यानंतर मराठी भाषेचे स्वरूप बदलू लागले. अशा वेळी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपूर्ण राहिलेल्या भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेले.

फक्त भाषाशुद्धी नव्हे, तर हिंदुत्व विचारधारेचा वारसा त्यांनी पुढे नेला. सावरकरांनी दिलेल्या मराठी भाषेच्या योगदानाचे स्मरण आणि केंद्र सरकारचा गेल्या वर्षीचा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय, दोन्हीही सावरकरांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरतात.

सावरकरांनी मराठी भाषेसाठी केलेले भाषाशुद्धीकरण म्हणजे महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृतीचे प्रतीक आणि तिची वाहक असते. भाषेच्या शुद्धतेतूनच संस्कार आणि परंपरांचा जतन होतो. मात्र, अनेक शतकांपासून मराठी भाषेवर परकीय आक्रमण होत राहिले. त्यामुळे अनेक परकीय शब्द मराठीत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा यांसारखे शब्द अरबी आणि फारसी भाषांतून मराठीत आले. काहींना हे भाषेचे समृद्धीकरण वाटले, तसेच आज इंग्रजी शब्दांच्या अतिरेकाला भाषाशास्त्रज्ञही स्वीकारत आहेत.

परंतु सावरकरांचा दृष्टिकोन वेगळा होता. १९२४ मध्ये ‘केसरी’मध्ये त्यांनी ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ ही लेखमाला लिहून भाषाशुद्धीचा आग्रह धरला. त्यांच्यावर टीका झाली, विशेषतः इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार यांनी “परकीय शब्द आत्मसात करून त्यांना मराठीत रुजवणे ही आपल्या भाषेच्या विजयाची खूण नाही का?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सावरकरांनी ठामपणे उत्तर दिले – “ही काही विजय-चिन्हे नाहीत, तर आपल्या भाषेवरील व्रण आहेत!”

सावरकरांचे स्पष्ट मत होते की, जेव्हा आपल्या भाषेत पुरेसे शब्द उपलब्ध आहेत, तेव्हा परकीय भाषांचा आधार का घ्यावा? परकीय शब्दांचा अनावश्यक वापर केल्याने मातृभाषेतील मूळ शब्द मागे पडतात आणि पुढे-पुढे त्यांच्यावाचूनच अर्थ व्यक्त होणे कठीण वाटते. हेच परकीय शब्द भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात आणि लोक त्यांना आपलेसे मानू लागतात.

सावरकरांनी भाषाशुद्धीबाबत अत्यंत मोलाचे विचार मांडले –


“स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणे, हे औरस मुलांना संपवून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही! आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी, फारसी किंवा इतर परक्या भाषांतील शब्द स्वीकारणे म्हणजे सोन्याची वाटी फेकून देऊन मातीचा कप वापरण्यासारखे आहे.”

त्यांच्या या चळवळीला सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. सुप्रसिद्ध कवी माधव ज्यूलियन हे सुरुवातीला भाषाशुद्धीविरोधी होते. मात्र, त्यांनी अभ्यास केल्यावर भाषाशुद्धीचे महत्त्व पटले आणि त्यांनी आपल्या कवितांमधील फारसी शब्द काढून पुन्हा नव्याने कविता लिहिल्या! इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या साहित्यातील काही चुका अधोरेखित करून सावरकरांकडे पाठवल्या.

सावरकरांनी इंग्रजी, फारसी, उर्दू शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द सुचवले. काही त्यांनी नव्याने तयार केले, तर काही अप्रचलित शब्द पुन्हा वापरात आणले. मात्र, त्यांच्या नावावर विकृत शब्दप्रयोग खपवण्याचा प्रयत्न झाला. उदा. “रेल्वे सिग्नलला ‘अग्निरथ गमनागमसूचक ताम्र हरितलोह पट्टिका’ असे नाव सुचवले” असा चुकीचा प्रचार करण्यात आला, पण वास्तवात सावरकरांनी असे कुठलेही अवडंबर माजवले नाही.

१९३८ मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना त्यांनी भाषाशुद्धीची भूमिका ठामपणे मांडली. “दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलन, चित्रपट” यांसारखे अनेक शब्द आज सहजपणे वापरले जातात, पण त्यांचे जनक सावरकरच आहेत, हे बहुतांश लोकांना ठाऊकही नाही! साहित्य संमेलने दरवर्षी होतात, पण अध्यक्षपदावरून पूर्वसंचालकांचे स्मरण करताना सावरकरांचा उल्लेख क्वचितच केला जातो!

सावरकरांची भाषाशुद्धी चळवळ ही केवळ भाषेसाठी नव्हती, तर ती मराठी अस्मितेचा अभिमान जागवणारी होती. 

अंदमानच्या कोठडीत कोरलेले अमर काव्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वातंत्र्य, साहित्य आणि भाषेच्या सेवेसाठी अविचल राहणारे सावरकर हे जगातील एकमेव असे महाकवी म्हणावे लागतील, ज्यांनी अंदमानच्या काळकोठडीत काट्याकुट्यांनी भिंतीवर महाकाव्य लिहिले. काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेमध्येही त्यांच्या प्रतिभेचा प्रवाह थांबला नाही. त्यांच्या लेखणीतील शब्दलालित्य, भावोत्कटता आणि भाषेचे विलक्षण सौंदर्य यामुळे त्यांचे काव्य आजही लोकांच्या हृदयात घर करून आहे.

एक प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून सावरकरांनी १०,००० हून अधिक पाने मराठीत आणि १,५०० पेक्षा जास्त पाने इंग्रजीत लिहिली. सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा यांसारख्या त्यांच्या कविता आजही अजरामर आहेत. ‘काळेपाणी’, ‘माझी जन्मठेप’, ‘शत्रूच्या शिबिरात’, ‘अथांग’ यांसारखी त्यांची साहित्यसंपदा आजही महत्त्वाची मानली जाते.

मराठी भाषेचे अभिजातत्व आणि सावरकरांचा योगदान

सावरकरांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर मराठी भाषेच्या शुद्धतेसाठीही महत्वपूर्ण कार्य केले. मराठीत संकरित झालेले परकीय शब्द दूर करून स्वदेशी शब्दांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चालवलेली चळवळ अद्वितीय होती. आज केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, आणि तो सावरकरांच्या अथक प्रयत्नांना दिलेली उचित मानवंदना आहे.

सावरकरांचे शब्द, विरोधकांच्याही ओठी!

सावरकरांना विरोध करणाऱ्या अनेक मराठी व्यक्तींना कदाचित हे ठाऊकही नसेल की, त्यांनी दिलेले शब्दच आज ते सहजपणे वापरत आहेत. आणि जरी त्यांना हे समजले, तरी त्यावर त्यांना काहीच करता येणार नाही! सावरकरांनी मराठीला दिलेले योगदान कालातीत आहे – ते विरोधकांच्या मतांवर अवलंबून नव्हते आणि कधीच राहणार नाही!
Source: Vayuveg

अन्य लेख

संबंधित लेख