Saturday, July 27, 2024

पश्चिम बंगालात रामनवमीला प्रथमच सुटी

Share

आपल्या राज्यातील हिंदूंना ‘स्व’ची जाणीव झाली, की त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची जाणीव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. रामनवमीनिमित्त (ता. १७ एप्रिल) त्यांनी राज्यात प्रथमच सुटी जाहीर केली आहे. देशभरातील हिंदूंना रामाबद्दल वाटत असलेले प्रेम, या हिंदूविरोधी प्रमुख नेत्याच्या लक्षात आले असावे. संदेशखाली प्रकरणही अजून शांत झालेले नाही. आरोपींना पाठीशी घातल्याने उफाळलेला जनक्षोभही अजून शमलेला नाही. त्यामुळे सुटी देण्याचे पाऊल त्यांना उचलायला लागले असावे.

इतक्या वर्षांत एकदाही या राज्याने रामनवमीला सार्वजनिक सुटी दिलेली नव्हती. दीर्घ काळ सत्तेवर असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला कधीही हिंदूंच्या भावनांबद्दल सहानुभूती नव्हती. तर ममता बॅनर्जी यांचा ‘हिंदूविरोध’ सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाबाबत आश्चर्य वाटायला नको. ‘रामनवमीला सुटी’ हा निर्णय ममता यांनी काही हिंदूंवरील प्रेमापोटी, त्यांच्या भावना जपण्यासाठी घेतलेला नाही. तो सरळ सरळ राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. कारण लवकरच लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.

ममता यांच्या या अनपेक्षित भूमिकेवर पश्चिम बंगालमधील लोकांचाही विश्वास नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला (सीएए) त्यांनी प्रथमपासूनच विरोध केला आहे. आताही हा कायदा झाला, तेव्हा आपल्या राज्यात या कायद्याची अंमलबदावणी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यांना बंधनकारक असल्याचे त्या सोयिस्करपणे विसरल्या आहेत. वास्तविक, पश्चिम बंगालातच घुसखोरांचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. मात्र, ममतांचा कायद्याला विरोध हा केवळ घुसखोरी करून राज्यात प्रवेश केलेल्या मुस्लिमांच्या प्रेमापोटी आहे, हे त्या राज्यातील जनता चांगले जाणून आहे. या घुसखोरांची नावे मतदार यादीत असल्याने ती ममता यांची व्होट बँक आहे. त्यामुळेच त्यांचे मुस्लिमप्रेम उफाळून आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एप्रिल २०२३ मध्ये म्हणाले होते, ‘२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला ३५ जागा द्या. म्हणजे आम्ही रामनवमीला शांतपणे मिरवणुका काढू शकू.’ त्यामुळे हिंदूंच्या रागाला ममता खरेतर धास्तावल्या आहेत. गेल्या काही वर्षांत रामनवमी, हनुमान जयंतीसंबंधित कार्यक्रमांना या राज्यात मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. रामनवमीला निर्माण झालेली धार्मिक तेढ व त्यातून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरणही या राज्याने अनुभवले आहे. मागील वर्षीही राज्यातील रिश्र (जि. हुगली) आणि हावडा येथे हिंसाचार झाला होता. त्यामुळे हनुमान जयंतीला संवेदनशील भागात केंद्रीय सशस्त्र दल पाठवण्यात आले होते. न्यायालयाने यात मध्यस्थी केली होती / हस्तक्षेप केला होता.

सार्वजनिक सुट्यांची यादी पश्चिम बंगालमध्ये १५ जानेवारीला प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये रामनवमीच्या सुटीचा उल्लेखही नाही. ती ममता यांनी ऐनवेळी जाहीर केली आहे. त्यावरून त्यांचे हिंदूंबद्दलचे प्रेम किती बेगडी आहे हे लक्षात येते.

अयोध्येतील राम मंदिरावरून केवळ ममताच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसचे सगळेच खासदार हिंदूंची सतत खिल्ली उडवत होते. प्राणप्रतिष्ठा समारंभालाही ते उपस्थित नव्हते. त्यांचे खासदार रामेंदू सिन्हाराय यांनी राम मंदिराचा उल्लेख ‘अपवित्र जागा’ असा केला आहे. अपेक्षेप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी त्याबद्दल कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही किंवा त्या वक्तव्याचा निषेधही केला नाही. मात्र, आता वेगाने बदलणारी पश्चिम बंगालमधील परिस्थिती बघता रामभक्त आपल्यावर कमालीचे नाराज झाल्याचे ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आले आहे. सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचे कारण तेच आहे.

अन्य लेख

संबंधित लेख