नवी मुंबई : “मराठा (Maratha) समाजाच्या मागण्या योग्य, पण त्या कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माथाडी कामगारांकरिता स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी संघर्ष केला. अनेक लोकांनी मिळून माथाडी कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच आज अण्णासाहेब पाटलांकडे आपण माथाडी कामगारांचे दैवत म्हणून पाहतो. अण्णासाहेब पाटलांमुळेच मराठा समाजाची चळवळ उभी झाली. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशामध्ये मराठा आरक्षण एकमेव आरक्षण होत. जे उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपण १० टक्के आरक्षण दिलं. मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता. परंतू, सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण १० टक्के आरक्षण दिलं.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. या मागण्या चूक आहेत असं मी म्हणणार नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जी मागणी करतोय ती, कुठलीही मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “मराठा समाजाने सातत्याने विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीतचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असू शकतं. पण मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे आणि समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. यादृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे नाव बदलून मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, असं करणार आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. गणेश नाईक जी, आ. मंदाताई म्हात्रे, आ. निरंजन डावखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.