Friday, March 13, 2026

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

Share

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सभागृहात स्पष्ट केले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी देशभरातून लाखो भाविक येथे येतात. अशा वेळी शहराचे नियोजनबद्ध विकास आराखडा नसल्यास रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. शहराची आखणी नव्याने केल्यास हे सौंदर्य आणि पावित्र्य टिकवून ठेवता येईल.

आळंदीची ओळख इंद्रायणी नदीशी जोडलेली आहे. मात्र, सध्या नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. नदीचे प्रदूषण नियंत्रण, पुनरुज्जीवन आणि नदीकाठाचा शाश्वत विकास यासाठी ‘टेंपल टाउन’ योजनेचा निधी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. यामुळे सांडपाणी व्यवस्थापन आणि वारसा संवर्धन प्रकल्पांनाही गती मिळेल.

केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मंदिर शहरे आणि ‘टियर-२’ शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद केली आहे. याच धोरणाचा लाभ आळंदीला मिळावा, जेणेकरून वारकऱ्यांच्या सोयीसाठी आधुनिक सोयीसुविधा निर्माण करता येतील. या मागणीमुळे भविष्यात आळंदीच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख