Friday, September 13, 2024

पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य (millets) महोत्सवासह बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन, विक्री

Share

पुण्यात ३१ मे ते २ जून दरम्यान तृणधान्य महोत्सव आणि बांबूच्या वस्तू तसेच कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तसेच मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र आणि पुण्यातील मेळघाट सपोर्ट ग्रुप यांच्या कार्याची ही माहिती…

पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य महोत्सव आणि मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागिरांनी बनवलेल्या बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन तसेच विक्रीचा उपक्रम होणार आहे. या महोत्सवात आपल्याला तृणधान्याची (millets) माहिती मिळेल. तसेच तृणधान्यापासून बनविलेल्या अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला घेता येईल.

हे प्रदर्शन पुण्यातील सौ. विमलाबाई गरवारे प्रशाळा, डेक्कन कॉर्नर येथे शुक्रवार ते रविवार (३१ मे, १ व २ जून) सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत खुले असेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त उभारण्यात येणाऱ्या प्रांगणात हे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ३१ मे रोजी जनता सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेजिब यांच्या हस्ते होत आहे. मोठ्या संख्येने येऊन या प्रदर्शनात नागरिकांनी खरेदी करावी आणि आपला प्रेमाचा हातभार कारागिरांना लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शनात काय काय…
कानातले डुल, हेअरपीन, पेपरवेट, फ्रुटस्टॅंड, ट्रे, पेन स्टॅंड या आणि अशा बांबूपासून तयार केलेल्या अनेकविध वस्तू प्रदर्शनात खरेदी करता येतील. तृणधान्य महोत्सवात तृणधान्याची देशी बियाणे, बीज पाहता येईल. तसेच तृणधान्यापासून तयार केलेली बेकरी उत्पादने, केक, कुकीज, ब्रेड याबरोबरच पापड, लाडू, रोस्टेड मिलेट्स, मिलेट फ्लेक्स, मिलेट चिवडा, तयार पीठे यांचेही स्टॉल प्रदर्शनात असतील.

कपडे, वस्तू संकलन
टाकाऊतून टिकाउकडे या संकल्पनेवर आधारित आपल्या घरातील चांगले पण नको असलेले कपडे, भांडी, सायकली व पेपरची रद्दी यांचे संकलनही ३ दिवस केले जाणार आहे. समाजाप्रती संवेदनशील असलेले सर्वजण या निमित्ताने काही गोष्टी करू शकतात. त्या अनुषंगाने आपल्या घरात आपण वापरलेले कपडे आपण मोठे झाल्यावर आपल्या लहान भावाला ज्या प्रेमळ भावनेतून देतो, त्या भावनेतून स्वच्छ व चांगले कपडे धुवून, इस्त्री करुन आणून देऊ देता येतील. कपडे आणतांना लहान मुलांचे, तरुण मुलांचे, मोठ्यांचे, स्त्रियांचे व तरुणींचे असे वेगळे करुन आणावेत. अंतर्वस्त्रे, फाटके कपडे देऊ नयेत.

चांगल्या अवस्थेतील भांडी, सायकली देखील देता येतील. मात्र, कुठल्याही प्रकारच्या, चपला, औषधे, बॅगा, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. देऊ नयेत. हे सर्व कपडे, भांडी मेळघाट व इतर ठिकाणी पाठविण्याकरीता लागणारे आर्थिक साहाय्य, कपडे देतांना आपण अवश्य करावे. तीन दिवस चालणाऱ्या या अभियानात आपण स्वयंसेवक म्हणून देखील आपला वेळ देऊ शकता.

या संपूर्ण उपक्रमाला पुण्यातील सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या संस्था सेवावर्धिनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इर्जिक फाउंडेशन यांचे साहाय्य लाभले आहे.

थोडे संपूर्ण बांबू केंद्राविषयी…
मेळघाट म्हटले की आठवतो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि दर पावसाळ्यानंतर वर्तमानपत्रातून येणाऱ्या कुपोषणाच्या बातम्या. इथल्या वनवासी बांधवांकरता काहीतरी मदत करायला हवी या प्रेरणेतून अनेक हात पुढे आले आहेत. आहार, आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा या क्षेत्रात अनेक संस्था मेळघाटामध्ये प्रत्यक्ष काम करीत आहेत. मेळघाटामध्ये बांबूपासून वस्तुनिर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देणे या विषयात (कै.) श्री. सुनीलजी आणि डॉ. निरुपमा देशपांडे यांच्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेची स्थापना झाली. रोजगाराच्या माध्यमातून गेली २५ वर्षे अथक प्रयत्न करीत असलेल्या या संस्थेचा परिचय सर्वांना व्हावा, यासाठी मेळघाट सपोर्ट ग्रुप गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत आहे.

मेळघाटातील दारिद्र्य त्यातून निर्माण झालेले कुपोषण, रोजगार, महिलांचे शोषण, कर्जबाजारीपणा या समस्यांकरता स्थायी उतर देणे आवश्यक आहे. इथला कोरकू समाज फुकट काही घेत नाही. खोटे बोलत नाही, भीक मागत नाही, असा सुनीलजींचा अनुभव. या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम द्यायला हवे, या हेतूने या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूला त्यांनी माध्यम बनवले. सुनीलजींना लोकोपयोगी कामाचा वारसा मिळाला होता विनू काळे यांच्याकडून. गुरू स्व. महेशजी, स्व.नानाजी देशमुख यांच्या सोबत चित्रकुट येथे आणि पुढे शर्मा यांच्याबरोबर झारखंड येथे याच विषयात केलेल्या कामाचा अनुभवही गाठीशी होता.

वीस हजार कारागिरांना प्रशिक्षण
बांबूमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मेळघाटात “बसोड” म्हणतात. संपूर्ण बाबू केंद्राच्या माध्यमातून या स्थानिक बांबू कारागिरांच्या परंपरागत कौशल्याला प्रशिक्षणाची जोड देऊन बांबूच्या विविध आकर्षक वस्तू तयार करणारे कारागीर तयार होत आहेत. गावातील कोरकू तसेच आतापर्यंत मेळघाटातील गोंड, भिल्ल अशा विविध वनवासी समाजातील २०००० पारंपरिक बांबू कारागिरांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बांबूपासून तयार होणाऱ्या असंख्य वस्तूंपैकी एक नावीन्यपूर्ण वस्तू म्हणजे बांबूची राखी आणि राखी किटस्. संपूर्णपणे नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या राख्यांच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळतो.

“मेळघाट सपोर्ट ग्रुप”ची ओळख
संपूर्ण बाबू केंद्राचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा “मेळघाट सपोर्ट ग्रुप” च्या कामाचा उद्देश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शाळेमध्ये राखी किट्सचे वितरण केले जाते. बांबूपासून तयार केलेल्या राख्या शाळेमध्ये दाखवून मुलांना राखीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. त्यांच्यापर्यंत राख्या पोचविल्या जातात. त्याबरोबर मुलांना मेळघाटामधील संस्थेच्या कामाची माहिती दिली जाते.

विविध कंपन्या, सोसायटी, शाळा, जत्रा, महोत्सव, प्रदर्शने अशा ठिकाणी स्टॉल लावून बांबूच्या वस्तू व राख्यांची विक्री संस्थेतर्फे केली जाते. यासाठी पुणे शहरामध्ये एक केंद्र आहे. त्यामुळे वर्षभर वस्तू उपलब्ध होऊ शकतात. याबरोबरच संस्थेच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते.

मेळघाटातील महिलांकरिता बांबूची स्नानगृहे बनविण्यासाठी आर्थिक उभारणीही मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे केली जाते. महिलांसाठी शारीरिक स्वच्छता हा विषय महत्त्वाचा आहे. मेळघाटात या विषयी संस्थेमार्फत जनजागृती केली जाते. शहरातील सज्जन शक्तीकडून बांबू स्नानगृहासाठी आर्थिक उभारणी केली जाते. मेळघाटात पुण्यातील विद्यार्थ्यांची निवासी शिबिरे संस्थेतर्फे आयोजिली जातात. मेळघाटातील जनजीवन, राहणीमान समजून घेण्यासाठी तसेच तेथील लोकांच्या अडचणी, समस्या यांचा अभ्यास करण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन तरुणांसाठी ५ दिवसांची “सिपना शोध शिबिर” ही निवासी शिबिरे संस्था आयोजित करते. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या(COEP) शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून तांत्रिक बाबींमध्ये साहाय्य केले जाते.

अधिक संपर्काकरीता – मेळघाट सपोर्ट ग्रुप, दीपक जोशी (कार्यक्रम प्रमुख) – 97655 67066
राघवेंद्र देशपांडे – 98220 87381
मिलिंद लिमये – 8421864291
कार्यालयीन व इतर बाबींच्या चौकशीकरीता महेश डबीर – 98508 36167.
संस्थेचे केंद्र – १३२४ माउली हाऊसिंग सोसायटी, भरत नाट्य मंदिर जवळ, सदाशिव पेठ पुणे – ४११०३० येथे चालते.

अन्य लेख

संबंधित लेख