नागपुर: पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना नागपुरात (Nagpur Drunk And Drive) मद्यधुंद कार चालकाचा कारनामा समोर आला. नागपुरातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौक परिसरात शुक्रवारी रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात लहान मुलासह तीन जण जखमी झाले. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
नागपुरात झेंडा चौकामध्ये शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ची घटना घडलेली आहे. या अपघातात पायी जाणारे तीन जण जखमी झाले त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील एकाला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर कारमधील इतर सर्वजण पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 32 ग्राम गांजा जप्त केला. त्यात दोन विदेशी दारूच्या दोन बॉटल मिळून आल्या आहेत.
भरधाव वेगानं कार चालवून अपघात करणाऱ्या चालकासह तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात कारचालक आणि कारमध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवले आहे. तसेच त्यांच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.