Sunday, August 31, 2025

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

Share


महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख.


नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात त्यांचे अस्तित्व आहे. त्यांची जीवनशैली, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक भूमिका या सर्व बाबी परंपरेने समृद्ध आहेत. त्यांचा इतिहास, धार्मिक संदर्भ, लोककथा आणि आजचे सामाजिक प्रश्न याची ओळख करून घेऊ या.


इतिहास आणि उत्पत्ती नंदीबैलवाले हे प्रामुख्याने शैव पंथाशी संबंधित आहेत. “नंदी” हा भगवान शंकराचे वाहन आहे अणि या जमातीच्या नावाशी त्याच नंदीचा संबंध आहे. हे लोक पारंपरिकरित्या नंदीबैल घेऊन घरोघरी जातात आणि देवाशी संबंधित शुभवार्ता, भविष्यातील भविष्यवाणी आणि धार्मिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. असे मानले जाते की ते शैव संप्रदायातील भक्तगण आहेत; जे धार्मिक सेवा देण्यासाठी भटकंती करतात.


धार्मिक संदर्भ
नंदीबैलवाले नंदीबैलाला पवित्र आणि शुभदायक प्राणी मानतात. त्यांच्या गाण्यांमध्ये, बोलण्यात “बोल बम”, “हर हर महादेव” अशा घोषणा असतात. ते भविष्य सुद्धा सांगतात, नंदीबैलाच्या हालचालींवरून संकेत देतात.

लोककथा आणि लोकपरंपरा
नंदीबैलवाले अनेकदा गावोगावी फिरून लोककथा, पौराणिक संदर्भ, शिवमहात्म्याच्या गोष्टी सांगतात.
त्यांच्या गोष्टींमध्ये नंदीबैलाचे चमत्कार, भक्तीची ताकद आणि दुष्टांवर मिळणारा देवाचा न्याय यासारख्या गोष्टी असतात. विशेषत: बालकांना त्यांच्या गोष्टी फार आवडतात. ते त्याच्या गळ्यातील ढोलातून बुगुबुगु/गुबगुबू असा आवाज करत मनोरंजन करतात. गाणी आणि प्राणीकथा यांचे गानरुपी कथन करतात. नंदीबैल काही वेळा खेळही करतो, अंगावर झोपतो, मान हलवतो.

नंदीबैल रंगीबेरंगी रंगांनी सजवलेला असतो. त्याच्या अंगावर रंगीत झुल, कापड, घंटा आणि गोंडे लावलेले असतात. नंदीबैलवाले स्वतः पारंपरिक वेशात असतात. धोतर, सदरा आणि बंडी, टोपीसारखा मुकुट त्यांच्या वेशात दिसतो. 


धार्मिक यात्रा म्हणजे नंदीबैलवाल्यांचे सामाजिक संमेलनच असते. त्यांच्या विशिष्ट यात्रा साजऱ्या होतात. यामध्ये “नंदीबैल वेलची कावड यात्रा” होते. चैत्र शुद्ध १२ या दिवशी होणारी ही कावड यात्रा महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. ठीक ठिकाणी होणाऱ्या ह्या यात्रा भटक्यांच्या परंपरांशी निगडित आहेत. ही यात्रा परंपरा भटक्या आणि अर्धभटक्या जमातींशी निगडित असून ती हिंदू धर्मातील नंदीबैलाच्या पूजनाशी संबंधित आहे. कावड यात्रा पारंपरिक शिवमंदिर आणि प्रचलित लोकपरंपरेतील यात्रा आहे. “वेल” म्हणजे झाडासारखी पवित्र वस्तू आणि “कावडी” म्हणजे एक धार्मिक दानाचे स्वरूप किंवा सणाचे स्वरूप !

या यात्रेच्या वेळी गावातील लोक धान्य, भाकरी, तेल, मीठ यासारखे दान कावडी म्हणून देतात. इथे श्रद्धा आणि दृढ शिवभक्ती असते. नंदीबैल हे भगवान शंकराचे वाहन म्हणून या यात्रेमध्ये सजवलेल्या नंदीबैलासह, कावडी मागतात. म्हणजे, “कावडी” ही एक धान्य, पैसा किंवा अन्नवस्तूंचे स्वरूप असलेली भक्तिभावाने दिलेली भेट असते. नंदीबैल वेलची कावडयात्रा ही दानधर्म, शेतीसाठी शुभेच्छा आणि पर्जन्य वृष्टीसाठी साकडे घालण्याची एक परंपरा आहे. अनेक वेळा ही यात्रा भटक्या समाजाच्या उपजीविकेचा भाग असते. मात्र ही यात्रा भिक्षावृत्तीवर आधारित नसून लोकांच्या धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. लोक कावडी देताना म्हणजे दान करताना स्वतःच्या शेतीसाठी चांगला वर्षाव, घरात सुख-समृद्धी, जनावरांचे आरोग्य यासाठी मनोकामना व्यक्त करतात. पिढ्यानपिढ्या नंदीबैलासोबत नंदीबैलवाले कावडी मागत फिरतात. नंदीबैलासोबत फिरून कथा-कविता किंवा चढाईची गाणी म्हणतात.     

          
पारंपरिक व्यवसायातून त्यांना फारसा आर्थिक लाभ होत नाही. कारण आजच्या काळात अशा धार्मिक प्रथांना पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. लोक “नंदीबैल” पाहायला उत्सुक असले तरी पैसे देणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने त्यांचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सततच्या भटकंतीमुळे नंदीबैलवाल्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. कारण असते जगण्याच्या धडपडीत गावोगावी भटकंती ! समाजातील मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग दिसून येत नाही.


सामाजिक अस्मिता आणि ओळख
आजही त्यांची ओळख काही प्रमाणात नकारात्मक प्रतिमेत बंदिस्त आहे. त्यांना सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आधुनिक काळात तंत्रज्ञान, शिक्षण आणि बदलत्या समाज रचनेमुळे त्यांचे पारंपरिक व्यवसाय कमी होत आहेत. वर्तमान स्थितीमध्ये उपजीविकेसाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. प्रायः मजुरी, हमाली, छोटेखानी विक्री व्यवसाय करावे लागत आहेत.

नंदीबैलवाल्यांच्या लोककला आणि परंपरेला शासकीय व स्वयंसेवी संस्थांमार्फत संरक्षण व प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. शासनाच्या काही योजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र त्या प्रत्यक्ष समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या योजना पोहोचत नाहीत कारण माहितीचा अभाव आणि अस्थिरता होय. त्यांच्या मुलांना भटकंतीमुक्त शिक्षणाची सोय करून देणे अत्यंत गरजेचे आहे. “फोकलोर आर्टिस्ट” म्हणून नोंदणी करून त्यांना सन्मान आणि आर्थिक सहाय्य देणारे धोरण संमत झाले, तर तेही खूप उपयुक्त ठरेल. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासना बरोबरच समाजाकडूनही सहकार्य होणे आणि त्यांच्या संस्कृतीचे जतन होणे या तिन्ही पातळ्यांवर कार्य होणे आवश्यक आहे.

अलका घरत
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि भटके
विमुक्त विकास परिषद कोकण प्रांताच्या पदाधिकारी आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख