Thursday, October 10, 2024

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Share

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनी
उद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा इथं प्रधानमंत्री
विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आकडेवारीनुसार या योजनेचा
सर्वाधिक फायदा अनुसूचित जाती, अनुसूजित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांतल्या
नागरिकांनी घेतल्याचं मोदी यांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा प्रारंभ झाला.
तसंच अमरावतीच्या पीएम मित्र टेक्सटाइल पार्कचं भूमिपूजन आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या
वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटाचं अनावरण त्यांनी केलं.

या योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रांचं प्रतीकात्मक वितरण, एक लाख
लाभार्थ्यांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचं वितरण, ७५ हजार लाभार्थ्यांना डिजिटल कर्जाचं वाटप, तसंच
१८ कारागीरांना धनादेशांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. महाराष्ट्राने
आता नव्या औद्योगिक क्रांतीसाठी कंबर कसली आहे, असं सांगून आपण सर्वजण एकत्र येऊन
महाराष्ट्राची अस्मिता टिकवून ठेवू, परंपरा आणि प्रगतीच्या मार्गाने पुढे जाऊ, असं आवाहन
प्रधानमंत्र्यांनी केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल, असा विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेनं दिलेलं आरक्षण कुणीही काढून घेऊ शकणार नाही, या बाबीचा
पुनरुच्चार त्यांनी केला.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं
प्रतिपादन या खात्याचे मंत्री जितन राम मांझी यांनी केलं. २०४७पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित
भारताची उभारणी करण्यात हे क्षेत्र महत्त्वाचं योगदान देईल, असंही त्यांनी नमूद केलं.उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज साडेसहा लाख कुटुंबांचं चित्र बदलणार असल्याची
ग्वाही दिली. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या पाठीशी उभं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी देशात सुरू केलेलं परिवर्तन आपल्या सरकारनं राज्यात सुरू केलं असल्याचं प्रतिपादन त्यांनी
केलं.

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेल्या मित्रा टेक्सटाइल पार्कमुळे विदर्भाच्या मातीतल्या
पांढऱ्या सोन्याला खरी किंमत मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त
केला.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, कौशल्य विकास आणि स्वयंउद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी,
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर या
कार्यक्रमाला उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख