Saturday, March 15, 2025

संघाच्या प्रतिनिधी सभेत होणार ‘पंच परिवर्तना’च्या प्रयत्नांची चर्चा 

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी २१, २२ आणि २३ मार्च दरम्यान बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. येत्या विजयादशमी २०२५ ला रा. स्व. संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विजयादशमी (दसरा) २०२५ ते विजयादशमी २०२६ हे संघाचे शताब्दी वर्ष मानले जाईल. बैठकीत संघ शाखांकडून आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासह विशेषत्वाने ‘पंच परिवर्तनासाठी’च्या प्रयत्नांची चर्चा अपेक्षित आहे.


संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एका निवेदनाद्वारे या बैठकीसंबंधीची माहिती दिली आहे. बैठकीत शताब्दी वर्षाच्या कार्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्याबरोबरच आगामी शताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय विषयांवरील दोन प्रस्तावांवर विचार करण्यात येणार आहे. या बैठकीत संघ शाखांकडून आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासह ‘पंच परिवर्तनासाठी’च्या प्रयत्नांची चर्चा अपेक्षित आहे. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, संघाचे सर्व सहसरकार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


काय आहे ‘पंच परिवर्तन?’ 

संघ शताब्दी वर्षाच्या संदर्भात संघाने संघटनात्मक दृष्टिकोनातून दोन ध्येय समोर ठेवली आहेत. संघाच्या शाखांचा विस्तार हे पहिले ध्येय आहे आणि दुसरे ध्येच आहे कार्याची गुणवत्ता वाढवणे. सर्व स्वयंसेवकांसमोर ही दोन ध्येय आहेत. कार्याची गुणवत्ता वाढली तर कार्याचा समाजात प्रभाव वाढेल. म्हणूनच संख्यात्मक विस्तारासोबतच संघकार्यात गुणात्मक वाढ होण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.

त्याबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून ‘पंच परिवर्तन’ हाही महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. संघाचे स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन, ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना पुढे जाण्याचा विचार संघाने केला आहे. गेली अनेक वर्षे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम संघ करत आहे. त्या सकारात्मक बदलांना चालना मिळावी, गती मिळावी या उद्देशाने संघाने समाजात काही बदल घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. त्यात प्रामुख्याने समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कुटुंब प्रबोधन, ‘स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह म्हणजेच स्व-बोध आणि नागरी कर्तव्य या पाच मूल्यांचा समावेश आहे. हे ‘पंच परिवर्तन’ कार्यक्रम राबवून समाजात मोठा बदल घडवून आणता येईल, हा विश्वास आहे.

स्वतःच्या उदाहरणाने परिवर्तन

‘पंच परिवर्तना’चे हे सूत्र संपूर्ण समाजाशी जोडलेले आहे. हे विषय वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आणि संघाच्या शाखांपर्यंत अर्थातच व्यापक समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. स्वतःच्या उदाहरणाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा प्रयत्न केला जाणार आहे. हा केवळ वैचारिक किंवा विचारमंथनाचा विषय नाही, तर तो आचरण आणि व्यवहाराचा विषय आहे. या दृष्टीने मांडणी केली जात असून या प्रयत्नांना गती देण्याचे नियोजन आहे. हिंदुत्व प्रबोधनासह देशातील सद्यपरिस्थितीचे विश्लेषण आणि आवश्यक कृतींची चर्चाही बैठकीत होणार आहे.


या बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय प्रतिनिधी, देशभरातील प्रांत आणि क्षेत्र  स्तरावरील १,४८० कार्यकर्ते अपेक्षित आहेत. या बैठकीत संघप्रणित विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख