Tuesday, December 3, 2024

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १

Share

५ एप्रिल म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. या दिवसाचा प्रारंभ १९६४ मध्ये करण्यात आला. आज त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा पूर्वार्ध.

भारताला हजारो वर्षांपासून समृद्ध सागरी वारसा आहे. सागरी क्रियाकलापांचा सर्वात जुना संदर्भ ऋग्वेदात आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये महासागर, समुद्र आणि नद्यांशी संबंधित असंख्य भाग आहेत, ज्याच्या विश्वासाने मानवजातीला समुद्र आणि महासागराच्या संपत्तीचा फायदा झाला आहे. भारतीय सागरी परंपरांचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी भारतीय साहित्य, कला, शिल्प, चित्रकला आणि पुरातत्व यांतून भरपूर पुरावे मिळाले आहेत. देशाच्या सागरी इतिहासाच्या अभ्यासातून असे दिसून येते की, शेकडो वर्षांपासून १३ व्या शतकापर्यंत भारतीय उपखंडात हिंद महासागरावर वर्चस्व गाजवले होते.

भारतीयांनी समुद्राचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी न करता व्यापार आणि केवळ व्यापारासाठी केला. अशाप्रकारे, १६व्या शतकापर्यंतचा कालावधी समुद्रातून होणारा शांततापूर्ण व्यापार, देशांमधील सांस्कृतिक आणि पारंपरिक देवाणघेवाण असा होता. हिंद महासागर हा नेहमीच महत्त्वाचा भाग मानला जातो आणि भारत या महासागराच्या मध्यभागी आहे.

भारताच्या सागरी इतिहासाची सुरुवात ३००० ई. स. पूर्व आहे. या काळात, सिंधू संस्कृतीतील रहिवाशांचे मेसोपोटेमियाशी सागरी व्यापारी संबंध होते. मोहेंजो-दाडो आणि हडप्पा येथील उत्खननात या काळात सागरी क्रियाकलाप भरभराटीचे पुरावे मिळाले आहेत. गुजरातमधील लोथल येथे सापडलेल्या कोरड्या गोदी वरून साधारणतः इ.स. पूर्व २४०० मधील भरती-ओहोटी, वारा आणि समुद्राच्या ज्ञानाची माहिती मिळते. त्या काळात अस्तित्वात असलेल्या इतर समुद्री घटकांचीही माहिती मिळते. अशा प्रकारची गोदी जगातील पहिली सुविधा म्हणून ओळखली जाते.

पल्लव, चोल, चेरा आणि पांड्य राजघराण्यांनी केवळ भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्येही त्यांचे राज्य आणि व्यापार वाढविला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्त्व ओळखले
त्यानंतर भारतीय किनारपट्टीवर ताबा मिळविण्यापासून मराठ्यांनी ब्रिटिशांना जोरदार प्रतिकार केला. मुघलांकडून सतत हल्ले होत असलेल्या मराठ्यांकडे सुरुवातीला नौदल नव्हते. बलाढ्य नौदलाचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा कळले. सिद्दीशी लढताना (ज्याचा मुरुड जंजिरा येथे तळ होता) आणि कोकण किनारपट्टीवरील पोर्तुगीज नौदल शक्तीचे निरीक्षण करताना, छत्रपती शिवाजी महाराजांना बंदरे आणि मजबूत नौदलाची कार्यक्षम व्यवस्था असण्याचे महत्त्व समजले. शिवाजी महाराजांचा किल्ल्यांवर विश्वास होता. त्यांनी कोकण किनारपट्टीवर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर अनेक किल्ले बांधले. किनाऱ्याकडे लक्ष देणाऱ्या टेकड्यांवर त्यांनी किल्ले बांधून त्यांचे योग्य त्या पद्धतीने संरक्षण केले.

कान्होजी आंग्रे यांनी १६९९ मध्ये मराठा ताफ्याचे सरखेल (ॲडमिरल) म्हणून पदभार स्वीकारला. कान्होजींनी सुरुवातीला फक्त दहा जहाजांपासून सुमारे ५० गलबते आणि १० घुराबांपर्यंत आपला ताफा बांधण्यावर लक्ष केंद्रित केले.

ब्रिटिश राजवटीत भारतीय नौदल सेनेची स्थापना करण्यात आली आणि १८५८ मध्ये तिचे नामकरण “हर मॅजेस्टीज इंडियन नेव्ही” असे करण्यात आले. १८६३ मध्ये त्याची दोन शाखांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. एक मुंबई (बॉम्बे मरीन) आणि दुसरी कलकत्ता (बंगाल मरीन). त्यानंतर भारतीय सीमेतील पाण्याचे संरक्षण ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीच्या ताब्यात गेले आणि १८९२ मध्ये रॉयल इंडियन मरीनची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धादरम्यान, रॉयल इंडियन मरीनला सागरी सर्वेक्षण, दीपगृहांची देखभाल आणि सैन्याची वाहतूक यासारखी कामे सोपवण्यात आली. १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपल्यानंतर लगेचच भारतातील ब्रिटिश सरकारने रॉयल इंडियन मरीनची ताकद कमी केली. २ ऑक्टोबर १९३४ रोजी, या सेवेचे नाव बदलून रॉयल इंडियन नेव्ही ठेवण्यात आले आणि ज्याचे मुख्यालय मुंबई येथे होते.

भारताची फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर, रॉयल इंडियन नेव्ही विभागली गेली. नेव्हीच्या संपत्तीपैकी दोन तृतीयांश संपत्ती भारताकडे राहिली आणि शिल्लक पाकिस्तान नौदलाकडे गेली. संपूर्ण ब्रिटिशांच्या राजवटीत सर्व प्रकारची जहाजे बनविण्याचे काम आणि श्रेय ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवले. विशेषत: सागरी मार्गांवर पूर्वी ब्रिटीश सरकारचे नियंत्रण होते.

१९६४ मध्ये, द. सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडने पहिले जहाज “एस एस लॉयल्टी” भारतीय बंदरात बांधले. हा उपक्रम भारताच्या तत्कालीन नौकायन शास्त्रामधील ऐतिहासिक क्षणांपैकी एक मानला जातो. ह्या जहाजाचा प्रवास मुंबईहून युनायटेड किंग्डमकडे सुरू झाला. तो दिवस होता ५ एप्रिल १९६४. याला खूप महत्त्व आहे, कारण पहिला राष्ट्रीय सागरी दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून, तो दरवर्षी त्याच तारखेला साजरा केला जातो. आज (५ एप्रिल २०२४) त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

भारताच्या सार्वभौमत्वाच्या द्रुष्टीने जागरूकता पसरविणे, देशाची आर्थिक वाढ आणि भारताच्या सागरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न आणि योगदान ओळखण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पर्यावरणीय प्रदूषण, चाचेगिरी आणि बदलती व्यापार गतिशीलता ही या क्षेत्रासमोरील काही आव्हाने आहेत. या उद्योगाच्या संघर्षाकडे आमचे लक्ष वेधून घेणे आणि प्रभावीपणे उपाय शोधण्यासाठी सर्व क्रियाशील समाज एकत्र येण्यास मदत करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

त्या अनुषंगाने भारताने हळूहळू जहाजे देशात बनवायला सुरुवात केली. पण अनेक लढाऊ जहाजे आणि उपकरणे देशात बनविणे शक्य नव्हते. २००३ मध्ये तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय नौसेनेत स्वदेशीकरणाचा एक प्रयत्न केला. एक योजना आखली. पण पुढील वर्षी वाजपेयी सरकार पडल्यानंतर या योजनेत बदल केले गेले आणि काम मंदावले.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने
२०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले, त्या वेळी संपूर्ण रक्षा विभागात स्वदेशीकरणावर भर दिला देसा आणि एक १५ वर्षांची मोठी योजना आखली गेली. भारतीय नौसेनेला इंडियन नेव्ही इंडिजनीसशन प्लॅन २०१५-२०३० आखून दिला. संरक्षण उत्पादनाचे स्वदेशीकरण आणि नवप्रवर्तन (Indigenisation and Innovation) हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल आहे. ह्या अनुषंगाने हे योजना आहे. हे दायित्व पूर्णत्वाला नेण्याकरिता भारताच्या तिन्ही सशस्त्र सेना मुख्यालयात “स्वदेशीकरण संचालनालय” स्थापित करण्यात आले. या संचालनालयाचे उद्दिष्ट आणि त्याची उपलब्धी याची माहिती पुढील भागात घेऊ या.

राजेश कोरडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(छायाचित्र सौजन्य: भारतीय नौसेना)

अन्य लेख

संबंधित लेख