Saturday, November 23, 2024

पर्यावरणाचा विचार करून हिंदू सणांची निर्मिती

Share

हिंदू धर्माचे सण म्हटले की रुढी – कर्मकांड यामध्ये त्याला अडकवून टाकले जाते. हिंदू बांधवांना देखील आपल्या सण – उत्सवाबद्दल वास्तवदर्शी माहिती नसल्यामुळे अपप्रचार करणाऱ्याच्या चक्रव्यूहात ते देखील सापडतात. साहजिकच हिंदू धर्मातील सणांबाबत अप्रियता तयार होते अथवा ममत्व दिसून येत नाही.

हिंदू धर्म व संस्कृती ही सनातन – पुरातन आहे. ब्रम्हांडाची निर्मिती व पर्यावरणाचा विचार करून प्राचीन कालखंडापासून हिंदू धर्मातील सण – उत्सवांची योजना केली आहे. नवरात्र म्हटले, की महिषासूर राक्षसाशी देवीने केलेली लढाई एवढीच गोष्ट समोर येते. हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती कपोलकल्पित कथा म्हणून या गोष्टीकडे पाहतात, तसा प्रचार करतात व समाजाला देखील तसेच वाटते.

नवरात्रीच्या निमित्ताने घरोघरी जे घट बसविले जातात, त्यामागे पर्यावरणाचा – निसर्गाचा काय विचार आमच्या पूर्वजांनी करून ठेवला आहे? याचा मात्र आम्ही शोध घ्यायला तयार नाही.

घट बसविण्यामागची काय आहे भूमिका?
साधारणत: पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात नव्याने बी – बियाणे पेरायचे असतात. अलीकडच्या आधुनिक कालखंडामध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण अशा गोष्टी आल्या आहेत. बियाणांची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणाही विकसित झाली आहे. परंतु प्राचीन कालखंडामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा विकसित झाली नव्हती म्हणूनच आमच्या पूर्वजांनी नवरात्रातील घटाची कल्पना मांडली.
यामध्ये शेतकरी आपल्या शेतातील माती आपल्या घरामध्ये घेऊन येतो, त्या मातीमध्ये उपलब्ध असणारे बियाणे वेगवेगळ्या स्वरूपात पेरतो, असा बियाणे पेरलेला घट इथे – तिथे ठेवण्यापेक्षा तो घरातील देवासमोर ठेवण्याची पद्धत रूढ झाली. पूर्वीच्या काळी धर्माचा प्रभाव असल्यामुळे ही गोष्ट धर्माशी जोडली गेली तर लोक सहजपणे स्वीकारतील म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसात घट बसवण्याची कल्पना जोडली गेली. नऊ दिवसानंतर पेरलेल्या बियाणांमध्ये कोणते बियाणे आपल्या शेतातल्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतात याचे निदान त्या शेतकऱ्याला होते व तो शेतकरी ती बियाणे शेतात पेरण्याचा निर्णय घेतो. विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंगणाला जाताना आपल्या घटामध्ये आलेला तुरा टोपीमध्ये खोवण्याची प्रथा म्हणजेच जणू आमच्याकडे असणाऱ्या बियाणांची जाहिरात (ॲडव्हटाईज) करणे असेच होते. सिमोल्लंगणाला सर्व लोक जेव्हा बाहेर पडत त्यावेळेस प्रत्येकाचे लक्ष इतरांच्या टोपीत खोवलेल्या तुऱ्याकडे जायचे. साहजिकच ज्याचा तुरा चांगला आला आहे, त्याच्याकडे बियाणांची मागणी केली जायची. अशा प्रकारची कल्पना घट बसविण्यामागे आमच्या पूर्वजांची होती.

आजही माती परीक्षण, बियाणांची गुणवत्ता तपासणे या गोष्टीसाठी याचा व्यवस्थित उपयोग होऊ शकतो. हिंदू धर्म व संस्कृती ही आमच्या पर्यावरणाचा – निसर्गाचा विचार करते. धर्मातील देवदेवतांच्या जन्म, मृत्यू, अवतार कार्य अथवा त्यांच्या लीलांशी संबंधित सण – उत्सव होत नाहीत तर केवळ आणि केवळ पर्यावरणाचा विचार या सण उत्सवांमध्ये अधिक आहे. हिंदू धर्म हा पर्यावरणपूरक असेच सण उत्सव साजरे करतो. आमच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये या सण उत्सवांचे असणारे महत्त्व आजही टिकून आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या बाता मारणाऱ्यांनी हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सातत्याने अशा सण – उत्सवांना लक्ष्य बनविले आहे व दुर्दैवाने हिंदू समाजही या भुलथापांना बळी पडत आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही सजगतेने व संशोधक वृत्तीने या सण – उत्सवांमागील योग्य कारण शोधले पाहिजे व प्रत्येक सण – उत्सव आमच्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा आहे याचा अनुभव घेतला पाहिजे.

डॉ.सचिन वसंतराव लादे
पंढरपूर

अन्य लेख

संबंधित लेख