Wednesday, December 4, 2024

आण्विक पाणबुडी SSBM S4*

Share

भारताच्या चौथ्या आण्विक पाणबुडी SSBM S4* चे गेल्याच आठवड्यात जलावतरण झाल्याची मोठी बातमी भारतीय नौसेना उपप्रमुख, व्हाईस ऍडमिरल कृष्णस्वामीनाथन यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितली. भारताची समुद्रशक्ति वाढत आहे हे सर्व जगाला विदित आहेच. आण्विक पाणबुडी SSBM S4* ही अरिहंत वर्गातील चौथी स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे. (SSBN = Ship, Submersible, Ballistic, Nuclear) जिचे जलावतरण, जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टण येथे करण्यात आले. या बांधणी मध्ये मोठा वाटा भारतीय उद्योगांचा, असून ते ‘आत्मनिर्भर भारत’ चे भक्कम उदाहरण आहे. मोदी सरकारचे आत्मनिर्भर भारत हे मिशन मोड मध्ये काम सुरु असून त्यासाठी कधीच निधी कमी पडू दिला जात नाही आणि हेच मोदी सरकारचे बलस्थान आहे. त्या मुळेच भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेकडेही जोमाने सुरु आहे. त्याच बरोबर निदान संरक्षण क्षेत्रात तरी परकीय शक्तींवर अवलंबून राहायला नको ही जमेची बाजू . त्याचबरोबर संरक्षण सामुग्री व शस्त्रास्त्रे यांच्या स्वदेशी उत्पादनांना दिलेले प्राधान्य ही सामरिक महत्त्वाची गोष्ट साध्य होतेय . विशेषत: इंडो-पॅसिफिकमध्ये आपली सागरी सुरक्षा बळकट करण्यावर भारताचा भर आहे.

भारतीय नौदलाच्या सेवे मधे सध्या पहिल्या दोन आण्विक पाणबुड्या आहेत. तिसऱ्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू असून पुढच्या वर्षी ती सेवेमध्ये संमिलित होईल. पहिली पाणबुडीची वाच्यता न करता ऑगस्ट 2016 मध्ये ती नौसेनेमध्ये सामावून घेतली. ही पाणबुडी 6000 टन पाण्याचे
विस्थापन करणारी, या पाणबुडी साठी 83 MW क्षमते च्या दाबयुक्त हलके पाणी अणुभट्टी (pressurised light- water reactor) सक्षम युरेनियम (enriched uranium) इंधनाचा उपयोग केला जातो. ही पाणबुडी सध्या 750 किमी पल्ला असणारे, पाण्याखालून डागता येणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र SLBM K-15 यांनी शस्त्र सज्ज आहे.

1983 च्या दरम्यान स्वदेशी आण्विक पाणबुडी तंत्रज्ञान विकसित करून पाणबुडीचे आरेखन, अभिकल्पन व बांधणी करण्याची योजना ATV (Advanced Technology Vessle) बनवली व ते काम 25 वर्षांनंतर पूर्ण झाले. आण्विक पाणबुडी मुळे भारताच्या ‘आश्वासक न्यूनतम अण्वस्त्र संपन्नता आणि शक्ति संतुलन’ (Credible Minimum Nuclear Deterrent) साठी तीन पैकी एक महत्वाचा मार्ग सिद्ध झाला आहे. अण्वस्त्रे डागणारी / अण्वस्त्रे सज्ज पाणबुडी तयार करून हा ही एक टप्पा पूर्ण केला आहे.

” आश्वासक न्यूनतम अण्वस्त्र संपन्नता आणि शक्ति संतुलन ” साधण्या साठी भारताने 1998 च्या मे महिन्यात अण्वस्त्रांच्या पाच यशस्वी चाचण्या केल्या आणि भारत अण्वस्त्रधारी देश बनला. अणूबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, लघु अणूबॉम्ब साठीचे सर्व तंत्रज्ञान विकसित करून ते आत्मसात केल्याचे म्हणजे अणु-विखंडन आणि अणु-संमीलन तंत्रज्ञान (Fission & Fusion Technology) विकसित करून सिद्ध केल्याचे जगाला दाखवले. अणुबॉम्ब / अण्वस्त्रे आहेत पण ते शत्रूलक्ष्यावरी मारा करण्यासाठी ची यंत्रणा (Delivary System) सुद्धा आवश्यक असतात. भारताने तीन महत्वाचे मार्ग ठरवले.

पहिला मार्ग म्हणजे लढावू विमानाद्वारे ड्रॉप बॉम्ब (Drop Bomb) च्या स्वरूपात अण्वस्त्रे डागण्याची क्षमता विकसित केली आहेच. दुसरा मार्ग म्हणजे क्षेपणास्त्र प्रणाली द्वारे अण्वस्त्रे डागण्याची क्षमता विकसित केली. डॉ कलामांच्या नेतृत्वामधे भारताने अग्नी क्षेपणास्त्रे मालिका विकसित करून हे दोन्ही महत्वाचे मार्ग पूर्ण केले होते. तिसरा मार्ग म्हणजे आण्विक पाणबुडीच्या माध्यमातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता विकसित केली. भारताने पाणबुडीवरून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांना ‘K-series’ म्हणजेच डॉ. कलामांच्या सन्मानार्थ ”K” हे नाव दिले आहे. ही क्षेपणास्त्रे आपल्या अरिहंत वर्गाच्या पाणबुडीवरून डागण्याची यंत्रणा निर्माण केली आणि आता हा तिसरा मार्गही प्रशस्त केला आहे.

भानौपो-अरिहंत (भारतीय नौसेना पोत – INS Indian Naval Ship) व भानौपो-अरिघात या दोन्ही पाणबुड्या भारतीय नौसेनेच्या सेवेत आहेत। अण्विक पाणबुडीचा विकास व निर्माण हे DRDO, BARC, Navy, DPSU, आणि खाजगी उद्योग यांच्या एकत्रित सुदृढ प्रयत्नांतून साकार झाले असून गेल्या वर्षात “आत्मनिर्भर भारत” चे यशस्वी उदाहरण झाले आहे. तिसरी आण्विक पाणबुडी भानौपो-अरिदमन (INS Aridhaman) जिच्या सध्या समुद्री चाचण्या सुरु असून पुढील वर्षी ती नौसेनेच्या सेवेत दाखल होईल.

SSBM S4* भारताच्या चौथ्या आण्विक पाणबुडी ही आधीच्या दोन्ही पाणबुड्यांपेक्षा अधिक मजबूत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक बदला घेण्याची क्षमता असणारी पाणबुडी आहे . आधीच्या पाणबुडीपेक्षा SSBN-S4* ही अधिक मोठी, सुधारीत अणुभट्टीसह, अनेक क्षेपणास्त्रे धारण क्षमता आणि अधिक चांगले स्टील्थ तंत्रज्ञान असणार आहे. 6 X 533 mm टॉर्पेडो ट्यूब, 4 VLS (Verticle Launch System) मधून K-15 SLBM प्रकारची 12 क्षेपणास्त्रे किंवा K-4 SLBM प्रकारची 4 क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे डागण्याची क्षमता विकसित केली.

INS अरिहंत 750 किमी पल्ल्याच्या K-15 आण्विक क्षेपणास्त्रांचे वहन करते, तर S4* मध्ये 3,500 किमी पल्ल्याचे प्रगत K-4 SLBM आहे ज्याची 2020 मध्ये प्रथम चाचणी घेण्यात आली होती. ही क्षेपणास्त्रे प्रगत उभ्या प्रणालींद्वारे प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, पाणबुडीची परिचालन क्षमता आणि धोरणात्मक प्रतिकार वाढवतात. S4* हे त्याच्या पूर्ववर्तींमधील एक महत्त्वपूर्ण अपग्रेड आहे आणि भारतच्या क्रेडिबल मिनिमम डेटरन्स (CMD) धोरणात योगदान देते.

लेखक- काशीनाथ देवधर

अन्य लेख

संबंधित लेख