Saturday, October 12, 2024

राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ

Share

लोकमत परिष्कार म्हणजे जनमताला आकार देणे, समूह मत घडवणे, समाज परिवर्तन करणे अशी भूमिका मांडणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानव दर्शनाचे भाष्यकार असलेल्या पंडीत दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना अधोरेखित केली आहे.

स्वातंत्र्य मिळवल्यावर मार्क्सवाद,समाजवाद आणि भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था तत्कालीन नेतृत्वाने स्वीकारली होती. त्या व्यवस्थेच्या काही मर्यादा होत्या. या तिन्ही व्यवस्था परदेशी आहेत. या जिथून उगम पावल्या तिथेही यातून प्रश्नांना उत्तरं मिळालेली नाहीत. या संमिश्र रचनांची अंमलबजावणी भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जिथे लोकसंख्या सर्वाधिक आहे तिथे होऊ शकत नाही.

पंडीत दीनदयाळ यांनी देश एका वळणावर असताना पर्यायी व्यवस्थेची चर्चा 1965 साली घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. अर्थकारणाचे भारतीयकरण असा विचार पंडीत दीनदयाळ यांनी मांडलेला आहे. टिका, नकारात्मकता यापेक्षा समर्थ स्वदेशी पर्याय याची चर्चा पंडीत दीनदयाळ यांनी सुरु केली होती.

एकात्म मानव दर्शन हा पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनाचा अविष्कार आहे. मनुष्यकेंद्रित विचार यातून अंत्योदयाची भूमिका पंडीत दीनदयाळ यांनी मांडली होती. वर्चस्ववाद, अनियंत्रित भांडवलशाही अशी जागतिक स्थिती असताना पंडीत दीनदयाळ यांनी राष्ट्रजीवनाच्या समृद्धीची दिशा ठरवण्यासाठी डॉक्युमेंट तयार केले होते.

आजच्या भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यावेळचा जनसंघ या राजकीय पक्षाने राजकारण करताना एकात्मिक विचार केला पाहिजे अशी भूमिका पंडीत दीनदयाळ यांनी व्यापक विचारातून आग्रहपूर्वक मांडली होती.

25 सप्टेंबर 1916 साली जन्मलेल्या पंडीत दीनदयाळ यांचा 11 फेब्रुवारी 1968 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. 1965 साली मुंबईत पंडीत दीनदयाळ यांनी एकात्म मानव दर्शन विषयावर चार सविस्तर भाषण करून रा. स्व. संघ विचारातून सुरु झालेला जनसंघ या राजकीय पक्षाचे वेगळेपण मांडले होते. मात्र, अपघाती की घातपाती (?) मृत्यूने पुढे एकात्म मानव दर्शनाच्या उपयोजितेवर व्यवहारिक चर्चा झाली नाही.

1977 साली केंद्रात पहिल्यांदा आलेल्या जनता पार्टीच्या बिगर काँग्रेसी सरकारने अर्थकारण, प्रशासन याकडे फारसे लक्ष न देता आपसात कुरघोडी यावर भर देऊन मतदारांचा भ्रम निरास केला होता. त्यावेळी जनसंघाने आपले अस्तित्व संपवून जनता पार्टीत विलीनकरण केले होते. जनता पार्टीचे सरकार स्वतःच्या वजनाने पडल्यावर मूळ जनसंघाने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.भाजपाने सुरुवातीला गांधीवादी समाजवादाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी केली होती. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपा-एनडीए चे सरकार केंद्रात आले होते. पंडीत दीनदयाळ विचार राबवण्याच्या सरकारच्या मर्यादा होत्या. सरकार एनडीए चे होते. तसेच, त्यावेळचे भाजपा नेतृत्व जागतिक परिस्थिती विशेषत: अमेरिका येथील स्थिती बघून आपले आर्थिक धोरण मांडत होती. ते स्वाभाविक होते. निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे, ती चालवणे आणि टिकवणे याला राजकीय पक्षाचे प्राधान्य असते. त्यामुळे जिंकण्याचा फॉर्म्युला महत्वाचा असतो. अन्यथा विचार चांगला असून, लोकशाहीत त्याचे मतात परिवर्तन झाले नाहीतर त्याची उपयुक्तता सिद्ध होत नाही. पंडीत दीनदयाळ यांनी मांडलेल्या विचार सूत्रावर त्यांच्या अकाली मृत्यूनंतर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सविस्तर चर्चा न झाल्याने तो अद्याप सिद्ध होऊ शकलेला नाही.

दरम्यान, 1990 नंतर जाखाऊ धोरणाची जगभर चर्चा सुरु झाली. सोविएत रशिया कोसळला होता. मार्क्सवादाची भलावण करणारे युरोपिय मार्क्सवादापासून दूर जात होते. अमेरिका महासत्ता झाली होती. चीनने स्वतःचे स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली होती. भांडवलशाही ऐवजी गोल्बलाय lझेन अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी स्वदेशीची चर्चा भारतात सुरु झाली होती. ती स्वदेशीची चर्चा पंडीत दीनदयाळ विचारांचा भाग असे म्हणता येईल. आजचे आत्मनिर्भर भारत हा त्या स्वदेशी मांडणीचा काहीसा अंश आहे. जाखाऊ धोरणाच्या काळात नरसिंहराव हे पंतप्रधान होते. त्यांनी आर्थिक स्थिती सांभाळण्यावर भर दिला होता. त्यावेळी ही बाह्य दबाव होताच.

2014 साली देशात मोठा राजकीय बदल झाला होता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पूर्ण बहुतमताचे काँग्रेसेतर सरकार स्थापन झाले होते. 303 अश्या विक्रमी जागा जिंकून भाजपाचे सरकार आले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कार्यरत झाले. 2014 ते 2024 या काळात पंतप्रधान मोदी पंडीत दीनदयाळ विचार मांडण्याचा काही प्रमाणात प्रयत्न करत आहेत असे म्हणता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिभाषा बदलली आहे. काही आवश्यक प्रतिकात्मक बदल आवर्जून केले आहेत. 2016 साली पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी झाली होती. त्यावेळी काही प्रमाणात पंडीत दीनदयाळ कार्य आणि कर्तृत्व यावर चर्चा झाली होती. भाजपात अन्य पक्षातून येणारे, थेट वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारे अश्याना काहीशी पंडीत दीनदयाळ यांची ओळख त्यावेळी झाली होती.

जनधन, मुद्रा, शौचालय, आवास, आयुषमान भारत यासारख्या योजना हे अंत्योदय याचे प्रकटीकरण आहे असे म्हणता येईल. महायुतीची लाडकी बहीण योजना त्या चौकटीत बसवता येईल.

मात्र, योजना-अनुदान आणि वाटप एवढे मर्यादित एकात्म मानव दर्शन नाही. कल्याणकारी राज्य म्हणजे फुकट ही मूळ संकल्पना नाही. राजकीय व्यवस्था, प्रशासकीय रचना यातून समाजाचे सबलीकरण करताना समान संधी, न्याय तसेच जनसमुदायाला कार्यप्रवण करणे याला प्राधान्य देणे यावर भर दिला पाहिजे. नागरिकांना शासन यंत्रणेने सहकार्य करण्याची भूमिका घेऊन अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे.

पंडीत दीनदयाळ विचारावर विविधस्तरावर चर्चा घडवून त्यावर जनमत तयार करण्याची चाचपणी केली पाहिजे. लोकमत परिष्कार म्हणजे समाजमनाला आकार देण्याची प्रक्रिया ही नियमितपणे करून एकात्म मानव दर्शन हे पक्षाचे, संघटनेचे, विशिष्ट विचारांचे नसून राष्ट्रीय म्हणजेच भारतीय आहे, हे समजवले पाहिजे.

आज पंडीत दीनदयाळ यांचे त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करताना त्यांनी मांडलेल्या भारतीयकरणाचे पैलू समजून घेणे योग्य ठरेल.

मकरंद मुळे
ठाणे

अन्य लेख

संबंधित लेख