Wednesday, March 25, 2026

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

Share

परभणी : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मार्च २०२६ रोजी भव्य “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. परभणी येथील शारदा महाविद्यालय येथे सकाळी ९:०० वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल.

या महारोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आयटीआय (ITI), डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी विविध संधी उपलब्ध आहेत. नामांकित कंपन्या आणि उद्योजकांकडून क्षेत्र अधिकारी, ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी यांसारख्या अनेक पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार १० ते १५ हजार रुपये वेतन दिले जाईल, तसेच अनुभवावरून वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ६ हजार ते १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन ११ महिन्यांसाठी दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल, त्यांच्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

“जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी २८ मार्च रोजी सकाळी ९:०० वाजता आपल्या मूळ कागदपत्रांसह शारदा महाविद्यालय येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे,” असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत ०२४५२-२२००७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अन्य लेख

संबंधित लेख