Saturday, October 12, 2024

“प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?”

Share

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून स्पष्टपणे देशा समोर आली आहे, अशी टीकाही प्रसाद लाड यांनी केली.

“जर आरक्षण रद्द झालं तर ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने संघर्ष केला, मराठ्यांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधी यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेणार का ? ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं, तरीही त्यांना शिव्या, शाप दिल्या. आता मनोज जरांगे काय म्हणणार ? राहुल गांधी देखील देवेंद्र फडवणीस यांचा माणूस आहे, असं ते म्हणणार का ?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील, हिंमत असेल तर पुढच्या दोन तासांत पत्रकार परिषद घ्या, राहुल गांधींचा बुरखा फाडा. तर आम्ही समजू की तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात, खरे मराठ्यांचे नेते आहात. नाहीतर तुमचं बेगडी प्रेम, तुमचं मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल आणि तुमचा चेहरा समोर येईल. तुमचा बुरखा फाडायचा नसेल तर राहुल गांधी आणि महाविकास आघआडीविरोधात भूमिका घेऊन तुम्हाला त्यांचा बरुखा फाडावा लागेल” असे आव्हानही आमदार प्रसाद लाड यांनी दिले.

अन्य लेख

संबंधित लेख