पुणे: “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या विकासाचा पाढा
मेट्रो विस्तार आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-बसेस.
२४/७ पाणीपुरवठा योजना आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालय.
पुणे-लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग आणि विमानतळाचे नवीन टर्मिनल.
चांदणी चौक विस्तारीकरण आणि पायाभूत सुविधांचे जाळे.
पत्रकार परिषदेतील ‘मोठे’ मुद्दे:
महिलांना झुकते माप: भाजपने शहरात महिला आरक्षणापेक्षा अधिक, म्हणजेच ९२ महिलांना उमेदवारी देऊन महिला नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.
युतीबाबत स्पष्टीकरण: कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार महायुतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वेळी १०५ नगरसेवक असूनही आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो, मात्र जागावाटपाचा प्रश्न आता वरिष्ठ पातळीवर सुटत आहे.
गुन्हेगारीवरून विरोधकांवर निशाणा: “एकीकडे गुन्हेगारी संपवण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी द्यायची, हे कोणतं तत्व?” असा सवाल करत त्यांनी नाव न घेता पालकमंत्र्यांवर टीका केली. गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत भाजपची भूमिका नकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.