पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. पुणे शहर आता केवळ विद्येचे माहेरघर न राहता देशातील ‘GCC (Global Capability Centres) कॅपिटल’ म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामातील विविध अडचणी दूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. म्हणून यावेळी या पुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक सहमती दर्शवली.
पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गेल्या वर्षभरात देशात सर्वाधिक GCC स्पेस पुण्यात विकसित झाली असून, त्यामुळे पुणे शहर ‘GCC कॅपिटल’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे शहरात वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त सहकार्याने पुण्याच्या एकत्रित नागरी क्षेत्राच्या विकासासाठी एक व्यापक ग्रोथ प्लॅन तयार केला जात आहे. दोन रिंगरोड, मेट्रो नेटवर्क आणि विविध लिंक रोड्स पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने पाठीशी उभे आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढील काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण होण्याची कालमर्यादा पाच ते सात वर्षांवरून कमी करून अडीच ते तीन वर्षांपर्यंत आणण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे गुंतवणुकीवरील परतावा अधिक प्रभावीपणे मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी पुणे येथून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.