शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. रामदास कदम हे त्यांच्या कुटुंबासह साईदरबारीला गेले होते. तेथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, “साईबाबांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे आणि दोन दिवसांत महायुतीचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांना 18 ते 20 तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून पाहिला आहे.”
कदम पुढे म्हणाले, “मागील वेळी आमचा आकडा कमी असताना भाजपने आम्हाला संधी दिली, पण आता भाजपचे 133 हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला किती मागावे, काय मागावे याचा विचार केला पाहिजे.” त्यांनी स्पष्ट केले की, “आम्हा सर्वांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. पण भाजपला देखील आपला पक्ष चालवायचा आहे, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कोणताही मतभेद नाही.” असेही ते म्हणाले.
रामदास कदम पुढे म्हणाले की, मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. ‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, असे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेईमानी केली. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, असा जोरदार हल्ला रामदास कदम यांनी केला.