राममंदिर निर्माणाच्या कार्यात मला सहभागी व्हायला मिळणार हे समजल्यानंतर घरातील सर्व मंडळी, आमचे नातेवाईक, परिचित मंडळी, सहकारी यांनी मला जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्याने मी खरोखऱच भारावून गेले. त्या सर्वांचे आशीर्वाद हा माझा संस्मरणीय ठेवा आहे.
राममंदिर निर्माण कार्याच्या प्रारंभीची अयोध्या नगरी हे एक अतिशय छोटे गाव होते. जुनी घरे, छोटे रस्ते. एका वेळी एक वाहनच जेमतेम जाईल एवढेच. इथल्या रहिवाशांनी आणि त्यांच्या आधीच्या कैक पिढयांनी तिथे फक्त संघर्षच बघितला. २०२० मध्ये जशी राममंदिर बांधकामाची सुरवात झाली तशी थोडी थोडी वर्दळ वाढू लागली. बांधकामाशी निगडीत व्यावसायिक, कंत्राटदारांचे अभियंता, कामगार आणि अन्य मंडळी येऊ लागली. तेव्हा खरेतर सोयी सुविधा खूपच मर्यादित होत्या. गेल्या दोन वर्षात, हॉटेल, निवासाच्या सोयी ह्यांचे काही अजून पर्याय हळूहळू उपलब्ध झाले आहेत आणि नव्याने होतही आहेत. अयोध्या विकास प्राधिकरणातर्फे संपूर्ण अयोध्या नगरीचा कायापालट होतोय. संपूर्ण अयोध्यानगरीच पुनर्निर्माणाधीन आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जर दोन भेटींमध्ये दोन महिन्यांच्यापेक्षा जास्त खंड पडला, तर रस्ता ओळखू येत नाही इतका वेगाने बदल होतोय. रस्ता रुंदीकरण, भुयारी मार्ग, पूल, रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण, नवीन विमानतळाची निर्मिती, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, विविध धर्मादाय संस्थांकडून होत असलेल्या निवासाच्या सोयी, शासकीय कार्यालये, परिसर सुशोभीकरण, शरयू घाट परिसर सौंदर्यीकरण, पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था, वीजपुरवठा, वाहनतळ असे अनेक प्रकल्प एकाच वेळेस कार्यान्वित आहेत. अयोध्या नगरी आता सज्ज झाली आहे लाखोंच्या संख्येने येत असलेल्या भाविकांच्या आणि दर्शनार्थींच्या स्वागताला !!
अयोध्येचे भव्य श्रीराम मंदिर हा पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक , सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे हे कार्य जास्तीत जास्त उत्तम कसे करता येईल, हे उराशी बाळगलेले स्वप्न आणि मनोमनी घेतलेला ध्यास तसेच आपापल्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने अंमलात येईल हा विचार येथील एकूण एक निर्णयांमध्ये दिसतो. हे सगळे विचार, अनेकविध पद्धतीने एकमेकांना पूरक करून विधायक पद्धतीने स्वर्णीम अशा मंदिर निर्माणासाठी कार्यान्वित होण्याची जी काही प्रक्रिया होती, ती शब्दात मांडणे केवळ अशक्य आहे, तो फक्त आणि फक्त अनुभवच होता !!
रोमांचकारी अनुभव
हे काम करतानाचे अनुभव जितके अनोखे आणि शब्दातीत आहेत… किंबहुना त्याहीपेक्षा जास्त रोमांचकारी अनुभव आले या कार्यानिमित्ताने भेटलेल्या माणसांचे !! मला ह्या कार्यात सहभागी व्हायला मिळणार आहे, ही गोष्ट जशी आमचे नातेवाईक आणि आसपासच्या लोकांना समजली तसे ओळखीच्या आणि कित्येक अनोळखी लोकांचेही फोन आले. कुणाचे आई वडील, नातेवाईक, ओळखीचे, विशेषतः ज्येष्ठ मंडळींचे फोन आले. ते अक्षरशः डोळ्यात पाणी आणून दाटलेल्या कंठाने आशीर्वाद देत असत. आम्हाला मंदिर पूर्ण झाल्यानंतर दर्शनाला जाणे शक्य होईल की नाही हे माहित नाही कदाचित. परंतु, तुझ्या डोळ्यानी आम्ही हे निर्माणकार्य बघत आहोत, अशा शब्दांत अतिशय भरभरून आशीर्वाद दिले जात होते आणि आता मंदिर नक्की बांधून पूर्ण होणार ह्या गोष्टीचा अत्यानंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असायचा !!
तो सुरवातीचा काळ Corona चा होता, कुणाला भेटणं फारसं शक्य नव्हतं. तरी कितीतरी आजी, आजोबांनी १००/१५० रुपयांपासून ते अगदी मोठया रकमेचे धनादेश माझ्या बरोबर पाठवले.
तू घरातल्या कुठल्याही अडचणीकरता तुझे हे काम थांबवू नकोस, अयोध्येला जायचे रहित करू नकोस, आम्ही इथले सगळे सांभाळू. आमच्या कडून मंदिर निर्माण कार्याकरता ही आम्ही आमची मदत समजतो, असे आश्वस्त करणारे माझे कुटुंबीय आणि शेजारी. माझे अयोध्येला जाणे निश्चित झाल्यानंतर मला असे जे जे अनुभव आले त्याने मला नक्कीच प्रेरणा मिळत गेली.
आणखीन एक अनुभव सांगायलाच हवा. एका आजींनी स्वतःच्या हातांनी सुमारे डझनभर छोट्या मुलांचे स्वेटर्स बनवून दिले आणि सांगितले की, तू तुला योग्य वाटेल त्या ठिकाणी दे. अयोध्येतील लहान मुले म्हणजे सगळी बालस्वरूप रामासारखीच रूपे आहेत नां !!
प्रत्यक्ष राममंदिर निर्माण कार्यात सहभागी झाल्यानंतरही अनेक चांगले अनुभव येत गेले. माझ्यासाठी संस्मरणीय ठरलेले ते अनुभव सांगते पुढील भागात.
अश्विनी कविश्वर
(लेखिका स्थापत्य अभियंता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात.)