लंडनमध्ये गेल्या १६ वर्षांपासून निवासी आणि पर्यटकांना आपल्या मालकीच्या ‘रंगरेज’ रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खाऊ घालणाऱ्या हरमन सिंह कपूर यांनी वाढती खर्चिक परिस्थिती, सातत्याने मिळणाऱ्या ऑनलाईन धमक्या, पाकिस्तानी टोळक्यांकडून होणारे हल्ले तसेच मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्यामुळे सुरक्षेबाबतच्या चिंतेने आपले रेस्टॉरंट कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेस्टॉरंट कायमचे बंद करण्यासाठी दिलेल्या कारणांमध्ये वाढत्या खर्चाचे कारण दिलेले असले तरी ते फारच वरकरणी वाटते. एखाद्या रेस्टॉरंट वर सतत हल्ले होत असतील तर त्याचा परिणाम साहजिकपणे ग्राहक घटण्यावर आणि पर्यायाने उत्पन्नावर देखील होणारच. तोट्यात व्यावसाय करण्यापेक्षा तो बंद केलेला बरा. हे आर्थिक कारण दिसत असले तरी त्याच्या मुळाशी पाकिस्तानी टोळक्यांकडून होणारे हल्ले हेच कारण आहे.

हरमन सिंग कपूर यांनी आपल्या हॉटेल फक्त “झटका मटण”च्या डिशेस ठेवल्या होत्या. कोणत्याही स्थितीत आपण हलाल मटणाचे पदार्थ वाढणार नाही ही त्यांची भीष्मप्रतिज्ञा होती आणि ती त्यांनी पार पाडली. त्यामुळे लंडनमधील पिसाळलेले जिहादी मानसिकतेचे पाकिस्तानी त्यांच्या हॉटेलवर दगडफेक करण्यापासून त्यांच्या हॉटेलला कमीत कमी रेटिंग देण्यापर्यंत सगळ्या प्रकारचा छळ करत होते.
त्याचवेळी हरमन सिंह कपूर यांनी आपला व्यवसाय बंद करून पूर्णवेळ लंडनमधील भारतद्रोही संघटनांशी ठामपणे टक्कर घेण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करावेच लागेल.
हरमन सिंह कपूर यांनी खालिस्तान चळवळीवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या मिळाल्या.
२०२३ मध्ये लंडनमधील भारतीय उच्चालयात तोडफोड झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या रेस्टॉरंटवर खालिस्तान समर्थकांनी हल्ला केला. तसेच त्यांना, त्यांच्या पत्नीला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या, आक्षेपार्ह फोन कॉल्स आणि ऑनलाइन धाक-दपटशाहीला सामोरे जावे लागले होते. हल्लेखोरांनी त्यांना व्हिडिओ हटवण्याची आणि “खालिस्तान जिंदाबाद”, “हिंदुस्तान मुर्दाबाद” अशी घोषणाबाजी करण्याची मागणी केली होती. हरमन सिंह कपूर यांनी त्याला साफ नकार दिला होता.
मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे उद्विग्न होऊन “पोलीस कारवाईसाठी आम्हाला मरावे लागेल का?” असा प्रश्न ते विचारतात. लंडनच्या महापौराला तुलनेने खूप अधिकार असतात पण आज त्या पदावर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी वंशाचे सादिक खान असल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

मुळात खलिस्तानची चळवळ भारतात कधीच रुजली नाही. आपल्या शीख बांधवांनी “स्वतंत्र खलिस्तान”ला कधीच थारा दिला नाही. स्वतंत्र खलिस्तानचे उमाळे, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे वसलेल्या शीख बांधवांपैकी मूठभर माथेफिरू शिखांना फुटत असतात. अर्थात त्याला संपूर्ण सक्रिय पाठबळ आणि फूस ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या ISI ची आहे. ब्रिटनमध्ये इंग्लंड आणि वेल्स मिळून आपल्या शीख बांधवांची एकूण जनसंख्या ५,२५,८६५ आहे. त्याच्यातील अगदी मुठभर माथेफिरू शीख स्वतंत्र खलिस्तानवरून धिंगाणा घालत असतात.

स्वतंत्र खलिस्तानची मागणी किती बोगस आणि हास्यास्पद आहे याची कल्पना सगळ्या शीख समाजाला आहे. खलिस्तान समर्थकांना स्वतंत्र खलिस्तानचा नकाशा दाखवा सांगितला तर ते फक्त भारताच्या पंजाब आणि चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणाचा काही भाग असा नकाशा दाखवतात. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील अर्ध्या पंजाबबद्दल मात्र ते अवाक्षर काढत नाहीत.

शीख संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थळ संप्रदायाचे संस्थापक गुरुनानक देव यांचे जन्मस्थान नानकाना साहिब (तलवंडी) हे आहे. आणि आज ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आहे. तिथे जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा लागतो. खलिस्तान समर्थकांना याची लाजही वाटत नाही व त्यांच्या स्वतंत्र खलिस्तानच्या नकाशात ननकाना साहिब कुठेच दिसत नाही.

गुरुनानक देवांनी जिथे शीख संप्रदायाची पहिली औपचारिक बैठक घेतली, आपल्या आयुष्याची शेवटची १७-१८ वर्षे कर्मभूमी म्हणून घालवली व जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला ते करतारपूर साहिब भारताच्या सीमेपासून जेमतेम ४ किलोमीटर अंतरावर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आहे. आज इथे जायला पासपोर्ट आणि परमिट लागते व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारने ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे तेवढेच भाविक करतारपूर साहिबला जाऊ शकतात. खलिस्तान समर्थकांना याचा ना खेद ना खंत… व त्यांच्या स्वतंत्र खलिस्तानच्या नकाशात करतारपुर साहिबला कुठेच स्थान असल्याचे दिसत नाही.
खलिस्तानवादी या पवित्र स्थळांविषयी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानकडे ते ब्र काढत नाहीत. कारण स्पष्ट आहे ताटाखालचं मांजर मालक फेकेल तेवढेच तुकडे खातं. मालकाच्या ताटातल्या अन्नाला शिवायची त्याची हिंमत नसते. आणि चुकूनमाकून आपला पुरुषार्थ दाखवण्यासाठी त्यांनी विषय काढलाच तर ISI ने पोसलेले भारतद्रोही खलिस्तान समर्थक आणि त्यांची चळवळ जगाच्या नकाशावरून पुसली जाईल. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे म्हणून. जे कधीच मिळणार नाही अशा फक्त भारतातील पंजाबबद्दल ते बोलत असतात.

शीख संप्रदायाचे १० वे आणि शेवटचे देहधारी गुरु, गुरु गोविंद सिंह यांचे जन्मस्थान बिहार मधील (तख्त श्री हरिमंदिर जी) पटना साहिब व बलिदान वेदी महाराष्ट्रातील नांदेड येथे (हजूर साहिब गुरुद्वारा) आहे. पण खलिस्तान समर्थकांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नाही. संप्रदायासाठी एवढी पवित्र असलेली ती दोन्ही स्थळेदेखील खलिस्तानच्या नकाशात ते दाखवत नाहीत.
त्याचवेळी आमचा देशभक्त असलेला सर्वसामान्य शीख बांधव मात्र उगजळा मागे धावणाऱ्या खलिस्तान समर्थकांना ओरडून ओरडून सांगतो…
| ननकाना की और चलो, जो पौरुष ने ललकारा है,
खालिस्तान ना मांगो, सारा हिन्दुस्तान तुम्हारा है l

हे खलिस्तानी समर्थक ज्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या कच्छपी लागले आहेत त्या देशातील जनतेची शासनकर्त्यांची लष्कराची जिहादी मानसिकता काय आहे हे एकदा या खलिस्तान समर्थकांनी आपल्या पूर्वजांच्या बलिदानाकडे नजर टाकून जाणून घ्यावे.
आपले सगळे धर्मगुरू जिहादी मानसिकतेच्या क्रूर अत्याचारी धर्मवेड्या मुसलमान मुघल शासकांशी आपल्या धर्मासाठी संस्कृतीसाठी मानसन्मानासाठी किती निकराने लढले. गुरु तेग बहादूर, भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाल दास यांनी तर अनंत यातनामय मृत्यू स्विकारला पण इस्लाम स्विकारायला नकार दिला. या त्यांच्या बलिदानाचे दिल्लीच्या गुरुद्वारा शीश गंज साहिब गुरुद्वारात जाऊन पुन्हा एकदा स्मरण करावे. आणि तरीही डोळे उघडले नाहीत तर खुशाल स्वतंत्र खलिस्तानसाठी तीच जिहादी मानसिकता असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या आश्रयाला जावे.
जे इतिहास विसरतात त्यांच्या नशिबी तोच इतिहास पुन्हा लिहिला जातो. ही इतिहासाची साक्ष आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या ISI च्या तुकड्यांवर पोसलेल्या या खलिस्तान समर्थकांनी एकदा हिंदुस्थानच्या फाळणीचा इतिहास वाचावा. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुसलमानांनी पंजाबमध्ये आपल्या अगणित शीख बांधवांचा केलेला नृशंस नरसंहार अगदी या हत्याकांडातून लहान लहान बालकांची देखील सुटका झाली नव्हती. हजारो शीख माताबहिणींवर केलेले अनन्वित बलात्कार आणि शीखविरहित केलेला रावी पलीकडचा अर्धा पंजाब. खलिस्तान समर्थकांचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विषयी असलेले प्रेम आणि ममत्व एका झटक्यात संपून जाईल आणि आपल्या पूर्वजांनी आपला धर्म संस्कृती मानसन्मान राखण्यासाठी किती उच्च प्रतीचे बलिदान दिले होते याची प्रचिती येईल. “स्वबोध” आणि “शत्रूबोधा”चा लवलेश नसलेल्या खलिस्तान समर्थकांना आपल्या पूर्वजांच्या क्षात्रतेजाचे एकदा स्मरण करून देणे आवश्यक आहे.

पण दुर्दैवाने या खलिस्तान समर्थकांना मात्र हरमन सिंह कपूर यांच्यासारख्या देशभक्ताला धमक्या देण्यातच पुरुषार्थ वाटतो. इंग्लंडमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानांनी प्रचंड घुसखोरी केलेली आहे. प्रत्येक पिढीमागे त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर हा वर्ग घन या प्रमाणात वाढत चालला आहे. ISI आणि या जिहादी पिलावळीचे पाठबळ मिळाल्यामुळे लंडनमधील खलिस्तानी समर्थक चेकाळले आहेत. तरीही हरमन सिंह कपूर डगमगले नाहीत हे विशेष… एका सच्चा देशभक्त आणि शीख संप्रदायाच्या आदर्श अनुयायाप्रमाणे त्यांनी धंदा बंद केला पण “खलिस्तान जिंदाबाद” “हिंदुस्थान मुर्दाबाद”च्या घोषणा दिल्या नाहीत. आणि आता तर ते या खलिस्तानी चळवळी विरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत याला म्हणतात शिखांचे क्षात्रतेज, याला म्हणतात –
चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, गीदड़न ते मैं शेर बनाऊं,
सवा लाख से एक लड़ाऊं, तबै गोबिंद सिंह नाम कहाऊं।”
म्हणत पुरुषार्थाची शर्थ करणाऱ्या गुरु गोविंद सिंहांचा खरा चेला.

हरमन सिंह कपूर हे या लढाईत एकटे नाहीत केवळ लंडनमधीलच नाही तर पूर्ण ब्रिटनमधील हिंदू समाज, हिंदू संघटना शीख बांधव त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहेत.

या निमित्ताने अगदी अलीकडच्या काळातील स्व. प्रमोद नवलकरांच्या १९५६ पासून ५२ वर्षे नेटाने प्रत्येक रविवारी नवशक्तीत प्रकाशित होणाऱ्या “भटक्याची भ्रमंती” या स्तंभातील लंडनच्या शीख बांधवांच्या क्षात्रतेजाचा एक किस्सा सांगू इच्छितो-

१९७० चे दशक… लंडनमध्ये “हिप्पी” (Hippie) टोळक्यांनी हैदोस घातला होता. हिप्पी म्हणजे खांद्यापर्यंत वाढवलेले अस्ताव्यस्त केस आणि विस्फारलेली दाढी. चित्र विचित्र रंगीबेरंगी कपडे. बहुतांशी बनियन आणि बर्मुडा किंवा अगदी उघडे बंब. सिगरेट, दारू, चरस आणि त्याहून जालीम अमली पदार्थांचे व्यसन लावून घेतलेले. कित्येक दिवस आंघोळ नाही. पाश्चात्य संगीत ही दुखती नस (weak point). मुक्त जीवनशैली जगणारे. कोणतेही बंधन न मानणारे. त्यात स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नव्हता. थोडक्यात छंदीफंदी मवाली.
हे हिप्पी कायम टोळक्याने फिरत. त्यामुळे टोळक्याची आक्रमकता त्यांच्यात भिनली होती. सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकांबरोबर त्यांची अनेक वेळा बाचाबाची होत असे. वरताण म्हणजे ते कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जात यथेच्छ खात आणि वेटरने बिल आणून दिले की सबंध रेस्टॉरंटची तोडफोड करून टाकत. मेट्रोपॉलिटन पोलीसांकडे (The Met) तक्रार करूनही काही उपयोग होत नसे कारण पोलीस त्यांच्याकडे सोयीस्कर कानाडोळा करत. असल्या भणंग लफंग्यांवर कारवाई करून तरी काय उपयोग? उलट पोलिसांनाच ताप व्हायचा. पोलिस सर्वसामान्य जनतेला आणि रेस्टॉरंट मालकांना सबुरीचा सल्ला देत. ब्रिटनची जनता आणि पोलीस दोघेही या हिप्पी टोळक्यांना प्रचंड कंटाळले होते.

आणि एक दिवस एका हिप्पी टोळक्याचे दुर्दैव आड आले. लंडनचे पंजाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साऊथहॉलच्या (Southhall) आपल्या एका शीख बंधूच्या रेस्टॉरंटमध्ये एक हिप्पी टोळके पोहोचले. भराभर ऑर्डर दिल्या आणि चापूनचोपून जेवले. वेटरने बिल आणून दिल्याबरोबर नेहमीप्रमाणे एका हिप्प्याने वेटरच्या कानशिलात मारण्यासाठी हात उचलला. बरं हा वेटर सुद्धा आपला शीख बांधव. त्याने वरच्या वर हिप्प्याचा हात धरला आणि दुसऱ्या हाताने हिप्प्याच्या कानशिलात वाजवली. त्या हिप्प्याच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकले. पण तोपर्यंत बाकीच्या हिप्प्यांनी हॉटेलमध्ये धुडगूस घातला. बरीच तोडफोड केली. हे बघितल्याबरोबर हॉटेल मालक आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलची शटर्स खाली ओढली. आणि हॉटेल मधल्या शीख बांधवांनी मिळून कचाट्यात सापडलेल्या सगळ्या हिप्प्यांची कणीक तिंबली. मनसोक्त बदडल्यावर शटर उघडून अर्धमेल्या स्थितीतील हिप्प्यांना बाहेर फुटपाथवर फेकून दिले ते हिप्पी टोळके कसेबसे खुरडत खुरडत पसार झाले.

थोड्या वेळाने दोन मोठ्या गाड्या भरून हातात सायकल चेन्स, हॉकी स्टिक्स, लोखंडी रॉडस् घेतलेली हिप्प्यांची भलीमोठी झुंड पूर्ण तयारीनिशी सरदारजीच्या त्या हॉटेलवर तुटून पडली. हे बघून संबंध साऊथहॉल रस्त्यावर उतरला. रस्त्यात हिप्पी विरुद्ध सरदारजी अशी तुंबळ हाणामारी सुरू झाली.

तोपर्यंत लंडन पोलिसांना या हाणामारीची खबर लागली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुर्दैवाने लंडन पोलिसांनी “गोऱ्या कातडी”च्या प्रेमापोटी कळत नकळत हिप्पींची बाजू घ्यायला सुरुवात केली आणि साऊथहॉलच्या शीख बांधवांच्या क्षात्रतेजाने उसळी घेतली. इंद्राय स्वाहा, इंद्राय सह तक्षकाय स्वाहा या न्यायाने त्यांनी हिप्प्यांबरोबर लंडन पोलिसांना देखील तुडवायला सुरुवात केली. काळवेळ ओळखून पोलिसांनी माघार घेतली. कारण पोलिसांचे वर्तन वर्णद्वेषी (Racial Descrimination) होते आणि ब्रिटनमध्ये वर्णद्वेष हा खूप मोठा गुन्हा आहे. त्याला कडक शिक्षा आहे. साउथहॉलचा हा सगळा शीख बांधव हा ब्रिटनचा नागरिक होता. न्यायालयात जर पोलिसांवरचा वर्णद्वेषाचा आरोप सिद्ध झाला असता तर त्यांना भयंकर भारी पडले असते. नोकरी तर गेलीच असती पण तुरुंगाची हवा देखील खावी लागली असती.
त्यामुळे लंडन पोलिसांनी प्रकरण मिटवत नमते घेतले मात्र त्याच वेळी हिप्प्यांना भयंकर दम दिला यापुढे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये फुकट खाल्ल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली तर याद राखा आणि लोकांनी तुम्हाला बडवले तर आम्ही मध्ये देखील पडणार नाही. त्या दिवसापासून लंडनमधील कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये फुकट खाण्याची हिंमत हिप्प्यांनी केली नाही.
भारताच्या शीख संप्रदायाच्या गुरुंच्या क्षात्रतेजाचा लंडनच्या साऊथ हॉलमधील आमच्या शीख बांधवांचा वारसा पुढे चालवणाऱ्या हरमन सिंह कपूर यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
बोले सो निहाल, सत श्री अकाल… 🙏🚩🌹