Tuesday, February 10, 2026

“ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

Share

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,” अशा बोचऱ्या शब्दांत चव्हाणांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

रविंद्र चव्हाण यांचे ट्विट जसेच्या तसे:
“परम वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम”

राष्ट्राला परमवैभवाकडे नेण्याच्या ध्येयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे अढळपणे उभा आहे. तेव्हा ज्यांच्या भूमिका ‘पंचवार्षिक योजने’प्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा हा ‘तपस्वी प्रवास’ कधीच समजणार नाही ! संघाचा विस्तार कोणाच्या करिष्म्यावर अवलंबून नाही, तर ‘माणूस जोडण्याच्या’ निःस्वार्थ संस्कृतीवर उभा आहे.

स्वतः कितीही भूमिका बदलल्या तरी जनशक्ती पाठीशी उभी राहत नाही, हे लक्षात आल्यामुळेच काहीजणांना वैचारिक हतबलता आली आहे. याच हतबलतेतून त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीविषयी शंका घेतली आहे. मात्र १०० वर्षांपासून संघाने ‘इदं राष्ट्राय’ या आपल्या विचाराशी कोणतीही तडजोड केली नाही, संघाला मिळणारा हा जनाधार स्वयंसेवकांनी पिढ्यानपिढ्या व्रतस्थ राहून कमावला आहे.

संघावर टीका करून हेडलाईन मिळवणं सोपं आहे, मात्र संघ परिवाराचा त्याग, शिस्त आणि सेवाभाव अंगी बाणवणं कठीण आहे. त्यामुळे राजकारणात तुमच्या ‘स्क्रिप्ट’ बदलतील, पण संघाचं ‘वैचारिक अधिष्ठान’ मात्र कधीही बदलणार नाही !

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत राज ठाकरेंच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांवर बोट ठेवले आहे. स्वतःच्या भूमिका बदलूनही जनशक्ती पाठीशी उभी राहत नसल्याने त्यांच्यात ‘वैचारिक हतबलता’ आली आहे, अशी टीका चव्हाणांनी केली. तसेच, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या उद्योजक आणि मान्यवरांवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असून, संघाचा जनाधार हा स्वयंसेवकांच्या त्यागातून निर्माण झाला आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

राजकीय चर्चांना उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला. या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे या टीकेला आता आपल्या सभेतून किंवा सोशल मीडियावरून काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख