Friday, November 21, 2025

अल्पवयीन मुले आणि गुन्हे

Share

महाराष्ट्र टाइम्समध्ये या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार असे म्हणले आहे की, गेल्या १८ महिन्यात सुधारगृहात १५०० मुले दाखल झाली आहेत. त्यापैकी १० ते १२ मुले खुनाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली. हे वास्तव फार धक्कादायक आणि भीतिदायक आहे. अर्थात सुधारगृहात यासाठी अनेक प्रयत्न खेळ, समुपदेशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग या सारख्या माध्यामातून केले जातातच, शिवाय व्यावसायिक मार्गदर्शन देखील केले जाते. मात्र या टप्प्यावर  असे गंभीर प्रश्न सहजपणे सोडविले जाणे सोपे नाही. अनेक पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

पालक, भावंडे, शिक्षक, शाळेतील मित्र, अशा सर्वांनी एकत्र येऊन यावर विचार करून निर्णय घ्यायला हवा. सध्या अनेक कुटुंबांमध्ये १ किंवा फारतर २ मुले असतात. घर योग्य रितीने चालवता यावे यासाठी सर्वांना अर्थार्जन करणे गरजेचे झाले आहे.

आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील कुटुंबांना महिन्याचे गणित बसवायला खरेच फार झगडावे लागते. दिवसाचा बराच वेळ आणि शक्ती त्यातच खर्च होते. अर्थात हा सगळा खटाटोप मुलांना चांगले भविष्य देता यावे यासाठीच असतो आणि सुदैवाने शिक्षणाने चित्र सुधारेल असा त्यांना विश्वास वाटतो. पण या सगळ्या धडपडीत मुलांसाठी व अन्य कौटुंबिक गोष्टींसाठी फार वेळ उरत नाही. मुले आणि अन्य सर्वांशी संवाद साधायला फार वेळ शिल्लक राहत नाही. विशेषतः मुलांशी बोलायला वेळ नसल्यामुळे फार नुकसान होते.

  मध्यमवर्गीय परिवारामध्ये देखील दोघाही पालकांचा वेळ कामातच निघून जातो. जर आजी आजोबा घरात असले तर तेच उपलब्ध असतात. अर्थात ते मुलांशी संवाद करू शकतात, त्यांचे म्हणणे ऐकतात, लहान लहान मुद्दे ऐकून त्यावर चर्चा करतात. मात्र सर्व घरात हे चित्र दिसत नाही, कधी कुटुंबाला कामाच्या ठिकाणी रहावे लागते, तर कधी आजी आजोबा स्वतंत्र घरात राहतात. सधन घरांमधे त्यांचे राहणीमान भिन्न असते, त्याची आपली आव्हाने असतातच.

एकुणातच कुटुंबाचे स्वरूप एक व्यवस्था म्हणून बदलले आहे, त्याच बरोबर मूल्य व्यवस्था पण बदलते आहे. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला केंद्रस्थानी ठेवले जाते, दृष्टिकोन बदलला आहे. याची पुढची पायरी म्हणजे; मी चुकीचे वागू शकतच नाही, चुकीचा विचार माझा असूच शकत नाही, हा विचार मूळ  धरतो आहे. मग एखाद्या वाहनाला मागे टाकणे असो किंवा वाहन चालविणे असो, चालविणारा स्वतःची चूक पाहू शकत नाहीत. चूक माहीत असली तरी ती मान्य होत नाही. जर काही म्हणण्याचा प्रयत्न केला तर येणारा प्रतिसाद अतिशय आक्रमक येतो. शिवीगाळ देखील होते, ते असभ्य किंवा चुकीचे मानले जात नाही. स्वतःचे चुकले आहे असे लक्षात येऊनही मुले आणि मुली दोघेही याकडे शांतपणे पहायला तयार नाहीत. अगदी साधे मुद्दे अकारण मोठे रूप धारण करताना दिसतात कारण प्रत्येकाला सिद्ध करायचे असते की मी चुकूच शकत नाही.

प्रत्येक पातळीवर हेच घडताना दिसते. एखादी लहान त्रुटी लक्षात येणे आणि त्यासाठी वाईट वाटणे, क्षमा मागण्यात कमीपणा नसतो, किंबहुना यातून दृष्टी विस्तारण्याची किंवा सुधारणेची संधी मिळते याचाच सध्या विसर पडतो आहे.

काही वेळा कामाचे स्वरूप असे असते की अडचणीत असलेल्या व्यक्तींशी नेहेमी गाठ पडते. माणसे चिंताग्रस्त असतात, अशा ठिकाणी शब्दही फार जपूनच वापरावे लागतात. आपल्या कामाचा तो एक भागच असतो, त्यामुळे वादविवादाचे प्रसंग टाळणे आवश्यक ठरते. हे कौशल्य अंगी बाणवावे लागते. अनेक प्रकारच्या भूमिकांमध्ये ही गरज असते म्हणाना. एखादी गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे हे आपल्या अधिकाराला आव्हान देणे नव्हे हे समजून घेणे आवश्यक आहे. बोलताना समान धागा शोधावा लागतो, आणि समजून घेणे म्हणजे कमीपणा तर नसतोच. किंबहुना त्याने स्पष्टता येते, बदल पण करता येतो.

अर्थात हे करणे; सांगण्याइतके सोपे नाही. हे मुलांना पटवून द्यायचे कसे? अशा वेळी शब्द पोकळ वाटतात, आपल्या कृतीतून ते दिसले तर काही प्रमाणात उमजते. थोडी चर्चा व्हावी याची, हलकेच तरुण पिढीला लक्षात आणून देता येईल का ते पहावे. शांतपणे आणि विवेकाने वागणे म्हणजे पराभव झाला असे वाटू शकेल, पण तसे नाही हे सांगितले जायला हवे.

पालक, शिक्षक याशिवाय घरातील मोठी माणसे सर्वानांच हे मूल्य रुजवायला मदत करावी लागेल. शिवाय हे आक्रमकपणे वाद घालणे, आवाज चढवणे किंवा शिवीगाळ करणे इथेच थांबत नाही. समोरच्याला शारीरिक इजा करणे, प्रसंगी रागाच्या भरात हत्येपर्यंत केव्हा मजल जाते ते कळत नाही. समोरच्या व्यक्तीला माझे म्हणणे पटत नाही येवढे कारण पुरते. आपल्याला दिलेले ते आव्हान आहे असेच त्याकडे पाहिले जाते. भावनेच्या भरात घडलेल्या कृत्यासाठी आयुष्यभर परिणाम भोगणे येते. केवळ वादावादीमुळे झालेल्या गुन्ह्याची भरपाई कितीही पश्चाताप झाला तरी होत नाही.

शाळा व महाविद्यालय यामध्ये समुपदेशक नेमले जातात, ते यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुलांना गांभीर्याने विचार करायला लावुन भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करू शकतील.

असे प्रसंग कसे हाताळावे याचे शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेल. पालक शिक्षक भेटीत, कार्यशाळा किंवा चर्चासत्र आयोजित करून पालकांनाही जागरूक करावे लागेल.

शिक्षकांचा मुलांशी दैनंदिन संवाद असतोच. ते ही मुलांना शांतपणे मार्गदर्शन करू शकतील. ते शालेय जीवनात दीर्घकाळ मुलांचे आदर्श असतातच. त्यामुळे त्यांना हा प्रयत्न करणे शक्य आहे. शिवाय अनेकांचे मुलांशी छान नाते असतेच. याचा उपयोग पालकांना मदत करण्यासाठी नक्की होऊ शकतो. मात्र ते सजगपणे केले पाहिजेत. प्रसंगी सर्वांना यासाठी बदलावे लागेल, मूक दर्शक होऊन चालणार नाही. घरातील वातावरण देखील बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्यात मुलांचे आयुष्य उध्वस्त होते आहे याची गांभीर्याने दाखल सर्वांनाच घ्यावी लागेल.

या समस्येची सोडवणूक करण्यासाठी धर्माची एक उपयुक्त भूमिका असू शकते असे काहींना वाटते. शिक्षकांनाही मुलांच्या भाव विश्वाची सखोल माहिती आहे हे पहावे लागेल. याबद्दल थोडी अधिक चर्चा करूयात ते पुढच्या लेखात.

-विद्या माधव देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख