तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक आहे. संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचे सर्वात क्रांतिकारक पाऊल म्हणजे त्यांनी ज्ञानाचे भांडार सर्वसामान्यांसाठी खुले केले. त्या काळात ज्ञान आणि धर्मग्रंथ हे केवळ संस्कृत भाषेपुरते मर्यादित होते, ज्यामुळे सामान्य समाज ज्ञानापासून वंचित राहत होता. ज्ञानेश्वरांनी ही परंपरा मोडीत काढून, मराठी या लोकभाषेला ज्ञानाच्या प्रसाराचे माध्यम बनवले. ‘ज्ञान हे सामायिक असावे, स्वैरपणे वितरित व्हावे’ या भूमिकेतून त्यांनी भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थदीपिका) या नावाने मराठीत भाष्य लिहिले. शके १२१२ (इ.स. १२९०) मध्ये नेवासे येथे गोदावरी नदीच्या काठी रचलेला हा ग्रंथ केवळ भाषिक परिवर्तन नव्हता, तर ती एक मोठी क्रांतिकारक कृती होती. यामुळे साध्या, अशिक्षित आणि ग्रामीण समाजालाही गीतेचे तत्त्वज्ञान समजणे सोपे झाले. त्यांनी अभंग, ओव्या यांसारख्या सोप्या रचनांमधून अत्यंत अवघड तत्त्वज्ञान लोकांच्या मनात सहजपणे उतरवले. ‘अमृतानुभव’ या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथातून त्यांनी आपला स्वयंपूर्ण तात्त्विक दृष्टिकोन मांडला, जो लोकशिक्षणाचे एक प्रभावी साधन बनला.
ज्ञानेश्वरांचा समतेचा संदेश केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नव्हता; त्यांनी तो प्रत्यक्ष जीवनात साकारला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न केले. समाजाच्या कानाकोपऱ्यात हा विचार पोहोचावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला. कीर्तने, प्रवचने व संवादाच्या माध्यमातून लोकसंग्रह केला. ‘सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे’ ही संकल्पना लोकांच्या मनात दृढ करणे, हे त्यांच्या कार्याचे मुख्य ध्येय होते. त्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात करून पंढरपूरच्या मेळ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यामुळे अठरापगड जातींतील लोकांना एकत्र येण्याची आणि समान पातळीवर भक्ती करण्याची संधी मिळाली. ज्ञानेश्वरांनी हे जाणले होते की, जेव्हा समाजात समतेचा अभाव असतो, तेव्हा तो आतून खचतो आणि अशा समाजावर बाह्य आक्रमणे सोपी होतात. त्यामुळे, त्यांनी केलेला समतेचा प्रसार हा केवळ आध्यात्मिक विचार नव्हता, तर ते राष्ट्रीय अस्तित्वासाठी एक संरक्षक कवच होते. या दूरदृष्टीमुळे संत ज्ञानेश्वर हे भारतीय संत परंपरेतील एक तेजस्वी शिखर मानले जातात.
ज्ञानेश्वरांच्या वैश्विक दृष्टिकोनाचा कळस म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’च्या अठराव्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी विश्वात्मक देवाकडे मागितलेले ‘पसायदान’ होय. ‘पसाय’ हा ‘प्रसाद’ या संस्कृत शब्दाचा प्राकृत अपभ्रंशआहे. ही प्रार्थना केवळ वैयक्तिक लाभासाठी नसून, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. पसायदानातील सामाजिक समानतेचे पैलू त्यांच्या प्रार्थनेतून स्पष्ट होतात. “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,” या प्रार्थनेत ते दुष्टांचा नाश न मागता, त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी होऊन त्यांना सत्कर्मात रस वाटावा, अशी मागणी करतात; यातून कोणताही व्यक्ती कायमचा वाईट नसतो, त्याला बदलण्याची संधी मिळावी, हा उदात्त विचार आहे. “भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे,” या मागणीतून ते सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, अशी इच्छा व्यक्त करतात.
मानव, पशू, पक्षी असा कोणताही भेद न करता सर्वांना समान मानते. याशिवाय “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो,” यातून पापाचा अंधार जाऊन जगात स्वधर्माचा सूर्य उगवावा, अशी मागणी करतात. जिथे ‘स्वधर्म’ म्हणजे प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. ज्ञानेश्वर पुढे मागतात की, “जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात,” ज्यातून प्रत्येक प्राणिमात्राच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि परमेश्वराच्या दृष्टीने कोणीही लहान-मोठा नाही. ज्ञानेश्वरीच्या आधारे जीवन जगणाऱ्यांना यश मिळावे (“ग्रंथोपजीविये… दृष्टादृष्ट विजये, होआवे जी”), यातून ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे. शेवटी, “किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकीं,” या प्रार्थनेतून केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर तिन्ही लोकातील सर्वजण सुखी व्हावेत, ही समान सुखाची व्यापक कल्पना मांडली आहे.
संत ज्ञानेश्वरांनी समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना एक साधा, सोपा आणि सर्वसमावेशक भक्तिमार्ग दाखवला. ‘पंढरपूरची वारी’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असून, ती आज जागतिक पातळीवरील समाजशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय बनली आहे. यावरून संत ज्ञानेश्वरांची सामाजिक जाणीव आणि दूरदृष्टी किती व्यापक होती, याचा प्रत्यय येतो.