Thursday, November 6, 2025

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’

Share

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतही सार्वजनिक जीवनावर संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये, राष्ट्रीयता आणि पंथनिरपेक्षता यांचे अद्भूत सामंजस्य त्यांच्या ठायी दिसून येते. भारतात धार्मिक परंपरांनी आपल्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे, हे संत नामदेवांच्या चरित्रातून दिसून येते.

पंजाबचा प्रवास-

देशभर तीर्थयात्रा केल्यानंतर संत नामदेव पंजाबमध्ये आले आणि तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. झांज आणि एकतारी घेऊन ते मधुर स्वरात भजन गात असत. पंजाबमधील संत नामदेवांचे कार्य एवढे महत्त्वाचे आहे, की पंजाबच्या संत परंपरेत त्यांना प्रथम संताचा मान दिला जातो. त्यांनी पंजाबमध्ये २० वर्षे वास्तव्य केले. तेथील लोकांचा विश्वास आहे, की त्यांनी तिथेच देहत्याग केला. अमृतसरपासून जवळच असलेल्या घुमाण येथे बाबा नामदेव किंवा भगत नामदेव यांचा गुरुद्वारा आजही उभा आहे. त्यांच्या शिष्यांना नामदेवियाँ असे म्हटले जाते. इतकेच नाही तर शिखांचा पवित्र अशा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये त्यांचे ६१ पद आणि ३ श्लोक हे १८ रागांमध्ये संकलित आहेत.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजी की मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथांतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. त्यांच्या कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

अर्धशतकाहून अधिक अशा भक्तिमय कालखंडात संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचलम, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.गुजरात, सौराष्ट्र, सिंधु प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेश येथेही नामदेवांचे वास्तव्य झाले होते.

संत ज्ञानेश्वरांचेच समकालीन असलेले आणि आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणारे संत नामदेव यांचे संत परंपरेत आगळे स्थान आहे. संत नामदेवांनी उभा भारत पायाखाली घालत प्रवास करून समाजप्रबोधन आणि जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून आपल्या कृती तसेच आचरणातून समता आणि भक्तीची शिकवण दिली. एवढेच नाही तर महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सूत्रात बांधले. त्या अर्थाने ते राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते ठरतात.

अन्य लेख

संबंधित लेख