Friday, September 13, 2024

‘‘सारथी रामलल्ला के’ ची निर्मिती नव्या पिढीसाठी !’

Share

अयोध्येत पवित्र रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिराची उभारणी झाली. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापनाही झाली. या राममंदिर उभारणीचं बीज जनमानसात रुजवणारे, त्यासाठी उभारलेल्या प्रदीर्घ देशव्यापी श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार-प्रणेते मोरोपंत पिंगळे आणि या आंदोलनात कायदेशीर-प्रशासकीय अशा सर्व स्तरांवर संघर्ष करणारे विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोकजी सिंघल यांचं त्यातील योगदान बहुसंख्यांना विशेषतः नव्या पिढीला ठाऊक नाही. या दोघांच्या भगीरथ प्रयत्नांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘सारथी रामलल्ला के’ माहितीपटाचं नुकतंच हनुमान जयंतीला लोकार्पण करण्यात आलं. या माहितीपटामागील उद्देश, त्यामागची नेमकी भूमिका काय होती हे समजून घेण्यासाठी या माहितीपटाच्या निर्मात्या धरित्री जोशी यांच्याशी साधलेला हा संवाद…

प्रश्न : ‘सारथी रामलल्ला के’ या माहितीपटाच्या निर्मितीमागची तुमची प्रेरणा काय होती ? या आंदोलनाशी तुमचा संबंध आला होता का ?
धरित्री जोशी : माझे वडील माधवराव जोशी विश्व हिंदू परिषदेच्या श्रीराम जन्मभूमी न्यास मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीचे अध्यक्ष होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या अगदी प्रारंभापासून ते त्याच्याशी निगडित होते. आमच्या पुण्यातील शनिवार पेठेतील भिवरा निवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी, प्रचारक, स्वयंसेवकांचं सतत वास्तव्य असायचं. आमच्या या वाडासदृश घरात बऱ्याच खोल्या होत्या. तेथे या नेते-स्वयंसेवकांची सदैव वर्दळ असायची. रामजन्मभूमी आंदोलन १९९०-९२ या काळात भरात असताना, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोकजी सिंघल, या आंदोलनात आपल्या अमोघ वक्तृत्वानं महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या साध्वी ऋतुंभरा देवी अशा अनेक नेत्यांची आमच्या घरी वर्दळ असायची. अशोकजी सिंघल यांच्याशी तर आमचं घरच्यासारखं नातं होतं. सिंघलजी पुण्यात येत, उद्योगपतींसह अनेकांबरोबर त्यांच्या महत्त्वाच्या बैठका होत असत. मात्र त्यांना ह़ॉटेल वगैरेमध्ये राहणं पसंत नसायचं. त्यांचा मुक्काम आवर्जून आमच्या घरीच असायचा. अशोकजी अत्यंत साधे होते. ते बडेजाव मिरवत नसत. माझे वडीलही या काळात पुण्यात आलेल्या अनेक पदाधिकारी-स्वयंसेवकांना आणायला स्वतः रेल्वेस्थानक, स्वारगेट आदी ठिकाणी जात. आई-बाबा आणि मी असं आमचं फक्त तिघांचं कुटुंब नव्हतंच. अनेक स्वयंसेवक आमच्या कुटुंबाचाच भाग होते. माझ्या लहानपणी मी अशोकजी सिंघल यांच्या अंगाखांद्यावर खेळली आहे.

प्रश्न : आपल्या वडिलांचेही रामजन्मभूमी आंदोलनात मोठे योगदान आहे. त्याविषयी सांगा…
धरित्री जोशी : ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा वादग्रस्त वास्तू ‘बाबरी’ पाडण्यात आली तेव्हा मोठी तणावपूर्ण स्थिती होती. त्यावेळी तेथील राम-सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्या सूचनेवरून अशोकजी सिंघल यांनी माझे बाबा- माधवराव जोशींकडे सोपवल्या होत्या. या मूर्तींना कोणतीही क्षती पोहोचू नये म्हणून बाबांनी सर्वतोपरी काळजी घेतली. जिवाची बाजी लावून ४८ तास या मूर्ती माझ्या वडिलांनी प्राणपणाने सांभाळल्या. त्यावेळी हे जोखमीचं काम होतं. वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर लगेचच तिथे चबुतरा उभारण्यात आला आणि उपस्थित साधू-संतांच्या मंत्रोच्चारात माझ्या वडिलांनी त्यांच्या ताब्यातील या मूर्तींची त्या तात्पुरत्या मंदिरात खऱ्या अर्थानं प्रथम प्राणप्रतिष्ठा केली. या आंदोलनाच्या तणावपूर्ण काळात या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कऱण्याचा मान माझ्या वडिलांना मिळाला होता. त्यांच्या या योगदानाबद्दल आणि कारसेवेतील यशस्वी उल्लेखनीय सहभागाबद्दल पुण्यात कबीरबाग येथे त्यांचा आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते अशोकजी सिंघल यांच्या उपस्थितीत भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी बाबांचा ७० वा वाढदिवसही होता. ‘बाबरी’ कोसळताना राम-सीता-लक्ष्मण मूर्ती प्राणपणाने जपल्याबद्दल बाबांविषयी गौरवोद्गार काढत मोरोपंत त्यांच्याविषयी भरभरून बोलले होते. राहुल सोलापूरकर, शरद गंजीवाले त्या वेळच्या स्मृतींना उजाळा देत असतात. तसेच बाबांनीही याविषयी लिहून ठेवलंय. मी कालांतराने पत्रकारिता क्षेत्र निवडलं. पण त्याआधीच दिवंगत झाल्यामुळे माझ्या बाबांनी माझी पत्रकारिता पाहिली नाही. पुढे ‘पुढारी’, ‘सकाळ’, ‘झी मराठी’नत्यानंतर ‘झी २४ तास’, ‘टीव्ही ९’च्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना मला या सर्व व्यक्तिमत्वांचं मोठेपण समजत गेलं. आपल्या लहानपणी आपल्याला कुणा दिग्गजांचा सहवास लाभलाय, हे तेव्हा मला उमगलं.

प्रश्न : ‘सारथी रामलल्ला के’ हा माहितीपट तयार करण्याची कल्पना कशामुळे सुचली ?
धरित्री जोशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात रामलल्लांची अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा माझ्या १४ वर्षांच्या मुलाने पाहिला. त्यावेळी मला असं जाणवलं, की १४ ते ३० या वयोगटातील नव्या पिढीला फक्त असंच वाटतंय, की अयोध्येत एक राममंदिर बांधायचं होतं, ते बांधल्यानंतर राममूर्तीची तिथे प्रतिष्ठापना झाली. पण त्यामागचा आंदोलनाचा दीर्घ इतिहास, झालेला संघर्ष, अनेकांनी गमावलेले प्राण… संपूर्ण प्रतिकूलतेतून उभारलेलं, संघाने संपूर्ण देशाच्या समोर हा विषय प्राधान्याने आणून यशस्वी केलेलं हे आंदोलन, त्यामागचे खरे सूत्रधार… या तपशीलाबाबत नवी पिढी संपूर्ण अनभिज्ञ आहे. आमची पिढी हे आंदोलन पाहत मोठी झाली होती. मात्र, नव्या पिढीला हा इतिहासच ठाऊक नाही. प्रसारमाध्यमांनीही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी या आंदोलनाचा नेमका इतिहास विशद करणारं वृत्तांकन केल्याचं पाहण्यात आलं नाही. या सोहळ्यानिमित्त ‘सेलिब्रिटीं’च्या मुलाखती, प्रतिक्रिया यामध्ये या आंदोलनाचे खरे सूत्रधार आणि त्यांचं योगदान हे नव्या पिढीला कसं समजणार, या अस्वस्थ विचारातून असा माहितीपट निर्माण करण्याची कल्पना मला सुचली. रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास तसा ५०० वर्षे जुना आहे. मात्र, या आंदोलनाचा तुलनेनं अगदी अलीकडच्या आधुनिक काळातील इतिहासही विस्मृतीत चाललाय. हा इतिहास नव्या पिढीसाठी जागवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. या आंदोलनातील मार्गदर्शन आणि मुख्य भूमिका मोरोपंत पिंगळे यांनी बजावली होती. तसेच अशोकजी सिंघल यांचाही सिंहाचा वाटा होता. हे आंदोलन दीर्घ काळ चाललं. विरोधकांनी त्या काळात आंदोलकांची ‘मंदिर कब बनायेंगे?’ असं विचारत हेटाळणीही केली. तरीही स्वयंसेवक, कारसेवक आणि रामभक्तांच्या हृदयात राममंदिर उभारणीचा संकल्प तेवता ठेवला गेला… थोडक्यात, मोरोपंत पिंगळे आणि अशोकजी सिंघल या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचं स्मरण करून, त्यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूनेच ही निर्मिती केली.

प्रश्न : या माहितीपटात प्रामुख्यानं काय मांडण्यात आलंय ?
धरित्री जोशी : या माहितीपटात प्रामुख्यानं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मोरोपंत पिंगळे आणि अशोकजी सिंघल यांचं या आंदोलनातील योगदान विशद केलंय. मोरोपंतांनी १९८३ मध्ये देशभर काढलेल्या एकात्मता यात्रेतून सुमारे दहा कोटी नागरिकांच्या सहभागातून सर्वप्रथम या आंदोलनाचा पाया कसा रचला गेला, याची सविस्तर माहिती भैय्याजी जोशींनी दिली आहे. चंपत राय यांनी सांगितलंय, की समृद्ध कुटुंबात जन्मलेल्या अशोकजी सिंघल यांना प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपली हयात या आंदोलनाला दिली, तसेच संघकार्यासाठी झोकून देत स्वतःला समर्पित केलं. प्रसंगी पदरमोड करून या आंदोलनासाठीचा कायदेशीर लढा लढला. प्रत्येक वकिलाकडून याची कायदेशीर बाजू समजावून घेऊन ती भक्कम केली. प्रसंगी अंतर्गत आणि बाह्य विरोधांना तोंड देत त्यांनी न्यायालयीन संघर्ष करून प्रतिकूलतेवर मात केली. त्यांच्या या कार्याचं उचित स्मरण यानिमित्तानं माझ्या हस्ते झालंय, ही माधवराव जोशींची कन्या म्हणून मला खूप आनंद आणि समाधान देणारी बाब आहे. ज्या दिग्गजांच्या छत्रछायेत माझं समृद्ध बालपण व्यतीत झालं, अशांना ‘फुल ना फुलाची पाकळी’ मी यानिमित्ताने वाहिली आहे.

प्रश्न : हा माहितीपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसे प्रयत्न केले ?
धरित्री जोशी : हा माहितीपट म्हणजे या राममंदिर उभारणीतील जे खरे दोन स्तंभ आहेत त्या मोरोपंत पिंगळे, अशोकजी सिंघल या दिग्गजांच्या स्मरणाद्वारे त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. यात माझा खारीचा वाटा आहे. राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं जगभर वार्तांकन झालं. मात्र, त्यासाठी आयुष्य वाहणाऱ्या दिग्गजांचं अपेक्षित प्रमाणात स्मरण झालं नाही. ते विस्मृतीत जाऊ नयेत, या प्रामाणिक भावनेतूनच हे दस्तावेजीकरण केलंय. त्यामागे उत्पन्नाचा हेतू कधीच नव्हता. माझे प्रामाणिक प्रयत्न पाहून जनता सहकारी बँकेने पुढाकार घेत आर्थिक सहाय्य केले. अवघ्या १७ मिनिटांच्या या माहितीपटात या दिग्गजांचं तपशीलवार योगदान सांगण्यास मर्यादा आल्या. आचारसंहितेच्याही मर्यादेमुळे त्यातील काही दृश्य-छायाचित्रे, तसेच राजकीय उल्लेख वगळावे लागले. हा माहितीपट सर्वदूर जावा, यासाठी ‘एबीपी माझा’चा ‘स्लॉट’ मी विकत घेतला. त्यानंतर या वाहिनीवर हा माहितीपट दाखवण्यात आला. सध्याच्या ‘इन्स्टंट’ जमान्यात झटपट माहिती मिळवणाऱ्या पिढीला हा १७ मिनिटांचा माहितीपट बरीच माहिती देऊन जाईल. त्यातून चिकित्सक इच्छुकांना सविस्तर इतिहास जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली तर आनंदच आहे. आगामी काळात शाळा-महाविद्यालयांनी हा माहितीपट आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवावा, असे आवाहन मी यानिमित्तानं करते.

प्रश्न : माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद-प्रतिक्रिया कशा होत्या ?
धरित्री जोशी : त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे, लाभत आहे. हा माहितीपट रामभक्त हनुमानाच्या जन्मोत्सव दिनी (२३ एप्रिल २०२४) प्रदर्शित झाला. मोरोपंत पिंगळे आणि अशोकजी सिंघल या रामभक्तांवरील या माहितीपट प्रदर्शनाचा हा दिवस अतिशय औचित्यपूर्ण ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे माननीय संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. आता हा माहितीपट ‘एबीपी माझा’च्या सर्वाधिक प्रेक्षकांक़डून पाहिल्या गेलेल्या चित्रफितींपैकी एक ठरलाय. त्यामुळे ‘एबीपी माझा’नं हा व्हिडीओ त्यांच्या ‘मोस्ट ट्रेंडिंग’ श्रेणीत समाविष्ट केलाय. एक निर्माती म्हणून ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.

प्रश्न : या माहितीपटासाठी कुणाचं सहकार्य लाभलं, कुणाला याचं श्रेय द्याल ?
धरित्री जोशी : मुख्य श्रेय या माहितीपटात संवाद साधणारे चंपत राय आणि भैय़ाजी जोशी यांना जातं. या आंदोलनाला त्यांनी जवळून अनुभवलंय. आदरणीय मोरोपंत-सिंघलजींचा सहवास त्यांना लाभलाय. त्यामुळे थेट साक्षीदार या नात्यानं त्यांच्या विवेचनात विश्वासार्हता आहे. या दिग्गजांविषयी त्यांच्या कृतार्थ भावना आहेतच त्यामुळेच ते भरभरून बोलले आहेत. प्रसिद्ध अभिनेते राहूल सोलापूरकर यांचं निवेदन या माहितीपटास लाभलंय. संगीत संयोजन पं. केशव गिंडे आणि निनाद सोलापूरकर यांनी केलंय. ज्येष्ठ पत्रकार रवी गुळकरी यांचं संहितालेखन आहे. छायाचित्रण चिंतामणी ठकार आणि दिनेश कंदरकर यांचं आहे. ‘विश्वरूप कन्सेप्ट’नं लघुपट निर्मितीची तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

Table of contents

अन्य लेख

संबंधित लेख