नागपूर : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. जनतेला साध्या गोष्टींसाठी शासनाच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो, विशेषतः महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न असतात. हे लक्षात घेऊन, तलाठी कार्यालयांपासून विभागीय आयुक्त कार्यालयांपर्यंत जबाबदार व तत्पर प्रशासनाची गरज आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.
महसूल मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या योजनांची सद्यस्थिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सादरीकरणाद्वारे मंत्री महोदयांना समजावली. यावेळी अपर महसूल आयुक्त डॉ. माधवी खोडे, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय कार्यपद्धती गतिमान होण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. ज्या विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे, तो दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मात्र, शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेतली जाईल. सोयीच्या ठिकाणी बदल्या होणार नाहीत, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
गोरगरिबांना घरकुल योजनेतून कमी दरात रेती उपलब्ध व्हावी यासाठी समितीचा अहवाल तयार आहे. लवकरच यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यनिष्ठतेने करावी, अशी अपेक्षा मंत्री महोदयांनी व्यक्त केली.
महानिर्मिती अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांसाठी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त करत, नागपूर येथे प्रायोगिक तत्वावर एनएमआरडीए, महानिर्मिती आणि बँकांमध्ये संयुक्त करार करून महादूला येथे आवास योजना साकारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन मंत्री बावनकुळे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.