Wednesday, December 4, 2024

“मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

Share

शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव (Shevgaon) येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकीत स्वतः मतदान करावे व हिंदू बांधवांकडूनही मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. गरज लागल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत मदत करावी, असे त्यांनी सांगितले.

४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता भातकुडगाव फाटा येथे महाराजांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी देवटाकळी, बक्तरपूर, भातकुडगाव, भायेगाव आणि हिंगणगाव येथील भक्तगणांनी भव्य स्वागत केले. अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी कमानी उभारण्यात आल्या होत्या. पूजन कार्यक्रमात ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के आणि गोविंद महाराज जाड देवळेकर उपस्थित होते.

धूत परिवाराच्या वतीने धूत जिनिंग प्रेस येथे महाराजांचे आगमन झाल्यानंतर स्वागत व आद्यपूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता २५०-३०० मोटारसायकलींच्या रॅलीने मिरवणुकीचा प्रारंभ झाला. या रॅलीत सहभागी सर्वांच्या डोक्यावर भगवी टोपी होती, आणि प्रत्येक गाडीला भगवा ध्वज फडकत होता. रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली, जिथे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी शिवाजी महाराजांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यानंतर, त्यांनी दगडी शिवस्मारकाची पाहणी केली, व स्मारक समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवस्मारक समितीने महाराजांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले.

“यानंतर, स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर खंडोबा मंदिरात खंडेरायाची पूजा केली. याप्रसंगी, जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिवचैतन्य जागरण यात्रेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

या प्रवासात स्वामीजी आपल्या वयाचा विचार न करता, कमी विश्रांती आणि निश्चित भोजनाच्या वेळांकडे दुर्लक्ष करून केवळ राष्ट्रकार्याच्या उद्देशाने समाजजागृतीचे कार्य अविरतपणे करीत आहेत, याचे भान सर्वांना त्यांनी करून दिले.

यानंतर, स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी ४५ मिनिटे शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर भाष्य केले आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य काय असावे, याबाबत मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचे दाखले देत त्यांनी उपस्थितांना राष्ट्रकार्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील संत आणि महाराज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांनी एकत्र प्रतिज्ञा घेतली की, “आम्ही सर्वजण मतदान करू आणि हिंदू संस्कृती व राष्ट्रहितासाठी योग्य उमेदवाराला मतदान करून जागृती करणार,” असे वचन त्यांनी स्वामीजींना दिले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.”

अन्य लेख

संबंधित लेख