Start-up हा आता तरुणाईसाठी परवलीचा शब्द बनला आहे. मनातली भन्नाट कल्पना व्यवसायाचं रूप घेऊ शकते, हे आता सगळ्यांनाच पटले आहे. दशकभरापूर्वी असलेली रोजगार म्हणजे केवळ नोकरी ही कल्पना आता कालबाह्य होते आहे. आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनू असा विचार करणारे तरूण आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. अनेक तरुणांनी एकट्याने वा सोबतीने आपल्या मनातील कल्पनांना यशस्वी व्यवसायात रुपांतरीत केले आहे. तरुणाईच्या गळ्यातील इअरफोन्स पासुन चश्म्यापर्यंत आणि चपलेपासून टोपीपर्यंतच्या वस्तूंच्या व्यापारावर या स्टार्टअप्सनी आता आपला प्रभाव निर्माण केला आहे.
केंद्रशासनाच्या स्टार्टअप इंडिया या नावाने चालणाऱ्या विविध योजनांनी या विषयात भरीव कामगिरी केली आहे. १६ जानेवारी २०१६ ला सुरु झालेल्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत स्टार्टअप्सची सुलभ नोंदणी, आयकर सवलत, कल्पना विकसनासाठी इनक्युबिशन लॅब व सीड फंड मिळण्याची व्यवस्था,नव-उद्योजक-गुंतवणूकदार यांची आपसातील ओळख, महिला उद्योजकांसाठी विशेष योजना, विपणन करण्यासाठी जेम्स पोर्टल सारखे पोर्टल अशा अनेक योजनांमुळे व्यवसायोत्सुक तरुणांना आपला व्यवसाय करण्यास सुरुवातीच्या काळात आधार मिळत असल्यामुळे व्यवसायाचा विस्तार आणि आपल्या उत्पादन अथवा सेवेची गुणवत्ता वाढवण्यास पुरेसा अवकाश मिळत आहे.
आजघडीला भारतभरात १४०१७५ स्टार्टअप्स नोंदवले गेले आहेत. त्यापैकी ५८२७७ महिलांनी सुरू केलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात नोंदवलेल्या स्टार्टअप्सची संख्या एकुण २३५०९ एवढी आहे. या स्टार्टअप्स मधुन भारतभरात १५.५३ लाख एवढी थेट रोजगार निर्मिती झाली आहे. स्टार्टअप्सची संख्या, मेंटर्स, इनक्यूबेटर्स व गुंतवणूकदार संख्या यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात अग्रगण्य आहे.
ऋषिकेश कासांडे