Saturday, July 27, 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटामुळे रसिकप्रेक्षकांच्या आठणींना उजाळा..

Share

कलावंताच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार, जीवनप्रवासात आलेल्या अनेक बाबींना सामोरे जावं लागतं. अशाच काही निवडक घटनांची गुंफण केलेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे असून रीडिफाईन प्रॉडक्शन ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुधीर फडके यांच्या जीवनाचा आलेख मांडताना बालपण, तारुण्य, वार्धक्य या उत्पत्ती, स्थिती, लय यांच्याशी साधर्म्य सांगणाऱ्या परिस्थितीचे चित्रण अवघड असले, तरीदेखील या चित्रपटात अत्यंत उत्तमरित्या रंगवल्या आहेत.

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बाबूजी म्हणजेच सुधीर फडकेंची ही कथा. कोल्हापुरातले कायदेतज्ज्ञ विनायक वामनराव फडके यांच्यापोटी रामचंद्र ऊर्फ सुधीर फडके यांचा जन्म झाला. वडिलांनी मुलाचा संगीताकडे असलेला ओढा ओळखला आणि कोल्हापुरतील संगीत विद्यालयात पाठवलं. तिथे पं. वामनराव पाध्ये हे त्यांना गुरू म्हणून लाभले. त्यानंतर पुढे विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाल्यानंतर ‘मोपल्यांचे बंड’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि ‘संगीत क्षेत्रात मोठा हो!’ असा आशीर्वादही दिला. तरुणपणात बाबूजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा आधार मिळतो; संघाशी त्यांचं नातं अखेरपर्यंत राहतं. बाबूजींची जीवनगाथा साकारताना तरुण बाबूजींची भूमिका आदिश वैद्य याने साकारली आहे, तर प्रौढ बाबूजी सुनील बर्वे यांनी साकारली आहे. बाबूजींची देहबोली साकारताना कुठंही ती वेगळी वाटणार नाही, याची काळजी सुनील बर्वे यांनी घेतली आहे. त्यांना असलेल्या गाण्याच्या अंगाचा वापर या चित्रपटात सुरेख झालेला पाहायला मिळतो. दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी कथा, पटकथा, संवाद या जबाबदाऱ्याही समर्थपणे सांभाळल्या आहेत.

चित्रपटातमधील विशिष्ट काळ दाखवताना तो काळ सर्व तपशीलांसह प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा वेळ घेतलेला आहे. तसंच बाबूजींच्या संपूर्ण आयुष्याचा पट मांडताना घटनांची, प्रसंगांची गर्दी मुळीच केलेली नाही. सर्वात विशेष म्हणजे पार्श्वसंगीतामध्ये मूळ गाणीच वापरण्याचा अनोखा प्रयोग केलाय, जो प्रेक्षकांच्या मनावर अत्यंत परिणामकारक ठरला आहे, असं नक्की म्हणता येईल. बाबूजी आणि गदिमा अर्थात ग.दि. माडगूळकर यांची भेट होणं, त्यांची मैत्री होणं; हा मराठी कलाविश्वासाठी दुग्धशर्करा योग ठरला. यातूनच ‘गीत रामायण’ या अलौकिक काव्याची निर्मिती झाली. त्यापैकी काही प्रसंगांची मांडणी सुद्धा उत्तमपद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहे.

ललिताबाई फडकेंची भूमिका मृण्मयी देशपांडे, आशा भोसले यांच्या भूमिकेत अपूर्वा मोडक, माणिक वर्माच्या भूमिकेत सुखदा खांडकेकर, ग. दि. माडगूळकरांच्या भूमिकेत सागर तळाशिकर, केशव बळीराम हेडगेवार यांच्या भूमिकेत शरद पोंक्षे, राजा परांजपे यांच्या भूमिकेत मिलिंद फाटक तर वीर सावरकरांची भूमिका धीरेश जोशी यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिका अतिशय छान साकारल्या आहेत. कथेची मांडणी आणि संवाद, प्रत्येक प्रसंगाचे केलेले चित्रण, वर्णन सोबतच अभिनय, संगीत ह्यासर्व बाजू प्रेक्षकांना अधिक आवडून जाणाऱ्या आहेत हे नक्की..

अन्य लेख

संबंधित लेख