Saturday, March 21, 2026

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले

Share

सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. “केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, ही केवळ माझी नाही तर देशभरातील कोट्यवधी हिंदूंची मागणी आहे. इतिहास घडवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, जी फार कमी लोकांना मिळते. आपले धार्मिक कर्तव्य पार पाडण्याची ही वेळ आहे आणि हिंदू समाज तुम्हाला ही संधी देत आहे. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्यावा.”

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती झाली आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार पाहिल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र झाल्या असून, त्यातूनच ही मागणी पुढे येत असल्याचे राजा सिंह यांनी नमूद केले.

धर्मांतरविरोधी कायद्याचे कौतुक

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या कडक धर्मांतरविरोधी कायद्याबद्दल राजा सिंह यांनी राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन केले. “हा कायदा महाराष्ट्रातील हिंदूंच्या रक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला सोलापूर आणि परिसरातील हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती. राजा सिंह यांच्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख