मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याची टीका केली आहे.
आकडेवारी काय सांगते? मुंबईत भाजपच ‘बॉस’!
भाजपने मुंबईतील गेल्या निवडणुकांचे आकडे मांडून हे सिद्ध केले आहे की, निव्वळ भावनांनी मतपेट्या भरत नाहीत.
महायुतीचा वरचष्मा: विधानसभा २०२५ च्या निवडणुकीत मुंबईत एकट्या भाजपला १८.९० लाख मते मिळाली आहेत, तर शिवसेनेसोबत महायुतीची एकूण मते २९ लाख पार गेली आहेत.
ठाकरे बंधूंची कमकुवत बेरीज: ‘उबाठा’ गट (१३.९५ लाख) आणि ‘मनसे’ (४.१० लाख) एकत्र आले तरी त्यांची बेरीज केवळ १८.०२ लाख होते.
ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद ही भाजपच्या एकट्या मतांपेक्षाही कमी आहे.
‘उघड्याशेजारी दुसरा उघडं गेलं…’
ग्रामीण म्हणींचा आधार घेत उपाध्ये यांनी या युतीवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, “ही युती म्हणजे आषाढीच्या घरी महाशिवरात्र आहे! उघड्याशेजारी दुसरा उघडं गेलं, रातभर थंडीने काकडून मेलं…” अशी अवस्था या दोन्ही पक्षांची होणार आहे. जेव्हा भावनिक महापूर ओसरेल, तेव्हा त्यांना वास्तवातल्या मतांच्या दुष्काळाचा सामना करावा लागेल.
‘दोन अपूर्णांक कधीच पूर्णांक होत नाहीत’
“राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते,” असे ठणकावून सांगत उपाध्ये यांनी स्पष्ट केले की, दोन भावांच्या एकत्र येण्याने मतपेटी भरत नाही. मुंबई महानगरपालिकेत ‘उबाठा’ सोबत काँग्रेस नसल्यामुळे, केवळ मनसे-उबाठा युती भाजपच्या विकासकामांसमोर टिकणार नाही.
मुंबईकरांचा कौल ‘स्थैर्या’ला!
भाजपने स्पष्ट केले आहे की, गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप मुंबईतील नंबर १ चा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक आमदार भाजपचेच निवडून येत आहेत. मुंबईकर आता भावनिक सादेला बळी न पडता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकास’ आणि ‘आकडेवारी’च्या राजकारणालाच साथ देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
“दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते! ही युती मराठी अस्मितेसाठी नाही, तर फक्त राजकीय अस्तित्वासाठी आहे. ही युती केवळ भीतीपोटी आहे, मुंबईच्या हितासाठी नाही,” असे केशव उपाध्ये म्हणाले.