मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या संभाव्य युतीचे वर्णन ‘दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम’ असे केले होते. मात्र, भाजपने या विधानाचा समाचार घेत याला ‘प्रीतीसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ असल्याचे म्हटले आहे.
पराभवाच्या भीतीने केलेली सक्ती: केशव उपाध्ये
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून संजय राऊत आणि उबाठा गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “दोन भावांचे मनोमिलन म्हणजे प्रीतीसंगम आहे, असे संजय राऊत म्हणत असले तरी, जनतेच्या मते हा प्रीतीसंगम नाही तर ‘भीतीसंगम’ आहे!” आगामी निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीनेच ही युती करण्याची सक्ती त्यांच्यावर ओढवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
केशव उपाध्ये यांचे ट्विट
‘उबाठा-मनसे’ आघाडीवर भाजप आक्रमक
भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे गटाला धारेवर धरले. “उबाठा-मनसे आघाडी हा केवळ सत्तेसाठी आणि अस्तित्वासाठी चाललेला धडपड आहे. हा प्रीतीसंगम नसून राजकीय विलीनीकरणाच्या भीतीतून जन्मलेला भीतीसंगम आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि नाशिकसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, युती अधिकृत होण्यापूर्वीच भाजपने या संभाव्य आघाडीला ‘निराधार’ आणि ‘भीतीपोटी झालेली युती’ ठरवून प्रचारात आघाडी घेतली आहे.