Monday, January 12, 2026

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

Share

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली.

या प्रचार सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे विंदा करंदीकरांच्या “तेच ते आणि तेच ते” या कवितेसारखे होते.

“मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव” १९६६ पासून वाजवून वाजवून गुळगुळीत झालेली ही रेकॉर्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल प्रचार सभेत परत वाजवली. ही घोषणा ऐकून ऐकून सरावलेल्या कानांचे समोर बसलेले जुने जाणते शिवसैनिक देखील मनातल्या मनात कुत्सितपणे हसले असतील.

पश्चिम रेल्वेच्या सुरत भुसावळ मार्गावर “नवापूर” म्हणून एक रेल्वे स्थानक आहे. ब्रिटिश काळात १८९९ ते बांधले गेले.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राबरोबरच गुजरात प्रांताची स्थापना झाली. तेव्हा अर्धे नवापूर रेल्वे स्थानक महाराष्ट्रात गेले आणि अर्धे गुजरातेत गेले. म्हणजे नवापूरची तिकीट खिडकी एका राज्यात आहे तर स्वच्छतागृहे दुसऱ्या राज्यात आहेत.

गेल्या ६५ वर्षात ना कधी गुजरातने अर्धे नवापूर रेल्वे स्थानक आपल्याकडे मागून घेतले. ना कधी महाराष्ट्राने ते गुजरातला देऊ केले. ना कधी महाराष्ट्राने अर्धे रेल्वे स्थानक आपल्याकडे मागितले. ना कधी गुजरातने ते देऊ केले.

आणि तरीही अख्खा पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचा मीरा रोड भाईंदर हा काही भाग गिळंकृत करून किंवा ओलांडून मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आखला जातो आहे. असा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आरोप आहे.

प्रत्येक निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधु गुजरातकडे सरकणारी मुंबई घट्ट धरून ठेवतात. निवडणूक होईपर्यंत खेचत राहतात आणि निवडणूक झाली की परत जागेवर आणून ठेवतात. पुढची ५ वर्षे मुंबई जागेवरच असते. परत निवडणूक आली की परत मुंबई गुजरातकडे सरकायला लागते. तीच प्रथा, तीच परंपरा, पिढ्यान् पिढ्या दर ५ वर्षांनी ते तेच ते तेच ते, तेच ते आणि तेच ते… याला आता मुंबईकर चांगलाच सरावला आहे…

“गरिबी हटाव” घोषणेवर इंदिरा गांधी यांनी १९७१ ची लोकसभा निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली आणि तेव्हापासून आजतागायत ३ पिढ्या झाल्या पण काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत तीच गरिबी हटावची घोषणा देते. या घोषणेमुळे काँग्रेसला काही वेळा सत्ता मिळाली खरी मात्र जनतेची गरिबी काही दूर झाली नाही. जेव्हा हे जनतेच्या लक्षात आले तेव्हा सत्तेच्या राजकारणात काँग्रेसला गरिबी आली. आज गरिबी हटावची घोषणा देऊन देखील काँग्रेस सत्तेपासून कोसो दूर आहे.

अगदी तीच अवस्था या मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची होणार आहे. “मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव” ही घोषणा म्हणजे “लांडगा आला रे आला” या गोष्टीसारखी अगदी कुचकामी ठरली आहे.

टोमण्यांबरोबरच यमक जुळवणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ” देवाभाऊ” म्हणून जनतेकडून झालेले त्यांचे कौतुक सहन न आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाषणात देवाभाऊला “मेवाभाऊ” हे यमक जुळवले. पुढे “भाजपचे आता राष्ट्र प्रथम, नवे भ्रष्ट प्रथम” असे राष्ट्रला भ्रष्ट. जयंत पाटील यांनी एकत्र आलेल्या “भावकी”चा उल्लेख केल्यावर आता “गावकी” पण एक होत आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणी जागृत करून. “गोळी”ला तुम्ही “पोळी”ला आम्ही. असले पुचाट यमक जुळवून भाषण रंगवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पुढे जाऊन… “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजही व्यासपीठावर येऊन मुंबईत केलेल्या कामांबद्दल आदित्य ठाकरे यांच्या समोर चर्चा करावी असे अफलातून आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.

१९९२ साली देवेंद्र फडणवीस नागपूरहून पहिल्यांदा नगरसेवक झाले. नंतर ते नागपूरचे महापौर झाले. त्यावेळी आदित्य ठाकरे पांगुळगाडा घेऊन चालायला शिकत होते.

पुढे देवेंद्रजी आमदार झाले. महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री झाले. गेली ३३ वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विकासाची एक व्हिजन आहे आणि ते स्वतः त्याच्यावर अव्याहत काम करत असतात.

त्या देवेंद्रजींनी आदित्य ठाकरेंबरोबर मुंबईच्या विकासावर चर्चा करावी हे आव्हान देण्यासाठी जे आंधळं पुत्रप्रेम लागतं. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पुरेपूर ठासून भरलेले आहे अन्यथा त्यांनी देवेंद्रजींनी आपल्याबरोबर किंवा संजय राऊत यांच्याबरोबर किंवा सुनील प्रभू यांच्याबरोबर चर्चा करावी म्हणून आव्हान दिले असते.

याच आंधळ्या पुत्रप्रेमापायी २०१४ साली भाजपच्या जेष्ठ नेते ओ पी माथुर यांच्याशी महायुतीच्या जागांच्या वाटाघाटीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पोरसवदा आदित्य ठाकरे यांना पाठवले आणि चर्चेचा फियास्को झाला. युती तुटली.

पण इतिहासापासून काहीही शिकायचे नाही, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम ठरवलेले असल्यामुळे त्यांनी परत आदित्य ठाकरे यांनाच पुढे केले. हम नही सुधरेंगे…!

असले निरार्थक आव्हान देण्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला स्वतःचा मुंबईच्या विकासाचा एखादा आराखडा कालच्या सभेत मुंबईकरांसमोर मांडला असता तर तो जास्त प्रभावी ठरला असता.

तसे तर त्यांचे बंधुराज राज ठाकरे देखील मुंबईच्या विकासावर एक अक्षर बोलले नाही. महाराष्ट्राच्या विकासाची ५० वर्षांची ब्ल्यू प्रिंट त्यांनी सुरळी करून कुठे घालून ठेवली आहे देव जाणे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तसे खूप मोठे इतिहासकार आहेत. १९६० पूर्वी झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे श्रेय घेताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांपर्यंत सगळ्यांचे पेटंट १९६६ साली स्थापन झालेल्या आपल्या शिवसेना पक्षाकडे घेतले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख हे दोघेही कम्युनिस्ट विचारधारेकडे आकर्षित झाले होते. एरवी या दोघांची आठवण कधीही न होणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर या दोघांचा उल्लेख कोणत्या हेतूने केला आहे हे न समजण्याएवढे मुंबईकर दूधखुळे आहेत काय?

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनसंघापासून मोरारजी देसाईंपर्यंत सगळ्यांवर तुटून पडले. ही मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन ६५ वर्षे उलटून गेली आहेत. २ पिढ्या येऊन गेल्या. आज या सगळ्या विषयाचे औचित्य काय आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे जाणोत. त्यातूनही जर या विषयावर बोलायचे होते तर २०१२ साली रझा अकादमीच्या मोर्चादरम्यान मोर्चेकरी मुसलमानांनी केलेल्या हुतात्मा स्मारकाच्या मोडतोडीबद्दल त्यांनी कडक शब्दात बोलायला हवे होते. महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगायला हवे होते. पण त्यांनी याबाबत अवाक्षर उच्चारले नाही. कोणत्या तोंडाने बोलतील? किंबहुना मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मारलेल्या मिठ्या तेही विसरलेले नाहीत आणि मुंबईकर देखील विसरलेले नाहीत.

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव…
दोन भावांचे मनोमिलन ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐतिहासिक घटना वाटते. त्यांच्या प्रत्येक भाषणात अगदी कालच्या प्रचार सभेच्या भाषणात देखील याचा आवर्जून उल्लेख होता आणि हे मनोमिलन कोणासाठी तर म्हणे “मराठी माणसासाठी”.

अरे हाड्… गेली २० वर्षे एकमेकांचा विश्वासघात तेलकट वडे, चिकन सूप, लायकी, भ्रष्टाचार, विठ्ठल बडवे काय काय एकमेकांच्या अब्रूचं खोबरं करणं चाललं होतं. झालं…? मिटलं सगळं भांडण? महाराष्ट्राला तुमच्या घरगुती भांडणामध्ये काडीचाही रस नव्हता. तुम्ही एकत्र होतात तेव्हाही आणि तुम्ही वेगळे झाला तेव्हाही मराठी माणसाला काहीही फरक पडला नव्हता. तुम्ही मात्र महाराष्ट्राला आपल्या विक्रम वेताळाच्या न संपणाऱ्या गोष्टी ऐकवण्यात मश्गुल असताना.

मधल्या काळात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हिंदुत्व आणि विकास या दोन आघाड्यांवर गरुड भरारी घेतली.

आता केंद्रात सत्तेत सहभाग नाही. राज्यातली सत्ता हातातली गेली आणि मुंबई महापालिका आपली वडीलोपार्जित संपत्ती असल्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा भाजप प्रणित महायुती आपल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेवर कुठाराघात करणार हे लक्षात आले तेव्हा त्यांनी अगतिकतेने २० वर्षे तोंड न बघितलेल्या आपल्या चुलत भावाला साकडे घातले. राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. एक खासदार ना एक आमदार नाही की एक नगरसेवक नाही. मग काय चोराची लंगोटी. जे हाताला लागेल ते आपले या न्यायाने राज ठाकरे यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला.

मुंबई महापालिकेची सत्ता हातातून गेली तर दोन्ही भावांच्या पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. पुढची महापालिकेची निवडणूक ५ वर्षांनी होणार आहे तोपर्यंत पक्ष चालवायचा कसा? कार्यकर्ते सांभाळून ठेवायचे कसे? हा यक्षप्रश्न दोघांपुढे आहे.

उद्धव आणि राज यांची युती म्हणजे उद्धव ठाकरेंची मजबुरी आणि राज ठाकरे यांच्यासाठी गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशी आहे. आणि ती पुंगी वाजणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

मुंबईची मराठी अस्मिता आता शहाणी झाली आहे. सोशल मीडियामुळे तिला खरं काय आणि खोटं काय हे ताबडतोब कळतं. अगदी पुराव्यांसकट.

शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळपर्यंत मातोश्री २ च्या दावणीला बांधलेली मराठी अस्मिता मोकळी होऊन भाजप प्रणित महायुतीच्या दिवाणखान्यात ऐटीत रेलून बसलेली असेल आणि त्याचवेळी ठाकरे बंधूंची ही संधीसाधू युती संपुष्टात आलेली असेल.

कारण “मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव” अशी ही युती आहे…

अन्य लेख

संबंधित लेख