जनजाती कल्याण आश्रमच्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्याकडून एैकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन याचा उपयोग सामाजिक कामात झाल्याचे सांगतानाच बारीपाड्याचा विकास कसा कसा होत गेला याचीही माहिती चैत्राम पवार यांनी या कार्यक्रमात दिली.
जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधने हे पाच मुख्य घटक धरून बारीपाडा गावात कामाला सुरुवात केली. हे काम करताना सोच बदलो, बाकी सब बदल जाएगा हा वनवासी कल्याण आश्रमाचा संदेश मोलाचा ठरला आणि वनवासी कल्याण आश्रमाशी संपर्क वाढल्यामुळे ग्रामविकासाची दिशा ठरवता आली. जनजाती कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतूनच बारीपाडा उभे राहिले, असे मनोगत चैत्राम पवार यांनी पुण्यात आयोजित प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.
अखिल भारतीय जनजाती कल्याण आश्रमाशी संलग्न असलेल्या पुणे महानगर, जनजाती कल्याण आश्रमाच्या दिनदर्शिका प्रकाशनाचा विमोचनाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवार यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हादजी राठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चैत्राम पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगर अध्यक्ष प्रकाश धोका यांनी स्वागत केले.
वनव्यवस्थापनाचा आदर्श
कार्यक्रमात चैत्राम पवार यांच्याशी प्रा. सुधीर गाडे यांनी संवाद साधला. पवार यांचे बारीपाडा हे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आहे. या गावात पवार यांनी विकसित केलेले वनव्यवस्थापनाचे मॉडेल देशभरासाठी आदर्श ठरले आहे. वृक्ष लागवड, माती, पाणी संवर्धन आणि आत्मनिर्भर गाव उभारण्यासाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. देशातूनच नाही, तर परदेशातूनही लोक या आदर्श गावाला भेट देण्यासाठी येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर ७८ देशांच्या सर्वेक्षणात भारताच्या बारीपाडा गावाला दुसरा क्रमांक मिळाला. चैत्राम पवार यांना भारतभरातील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
बारीपाड्यातील विकासाचा प्रवास
वनवासी कल्याण आश्रमाला १९९१ पासून जोडला गेलो. नोकरी न करता गावातच राहण्याचे आणि गावाच्या उन्नतीचे काम करायचे ठरवले. कल्याण आश्रमाशी संपर्क वाढल्यामुळे ग्रामविकासाची एक दिशा ठरवता आली, असे पवार यांनी सांगितले. जंगलतोड थांबवण्यासाठी उपाय करणे, वृक्षारोपण, जंगल तोड करणाऱ्यांसाठी शिक्षा इत्यादी उपाय आम्ही योजले. शेती विकासासाठी ७०० पेक्षा जास्त बांध बांधले. अडीचशे एकर शेती दुबार पिकासाठी तयार केली. आहारात भरड धान्यांचा, जुन्या पारंपरिक भाज्या, रानभाज्यांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले. वनधन विकासासाठी जंगल हे केंद्र धरून शाश्वत विकासाचा प्रयत्न केला. गाव पातळीवरील बचत गटांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त केले. योजना नको असे लेखी पत्र सरकारी अधिकाऱ्यांना देऊन गाव हे गावकऱ्यांच्या मदतीने स्वयंपूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त केले, अशी माहिती देत पवार यांनी बारीपाड्यातील विकासाचा प्रवास मांडला.
जनजाती कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतूनच बारीपाडा उभे राहिले आहे. कामातील पारदर्शकता, प्रवास, संपर्क, संघटन या सर्वांचा उपयोग आतापर्यंतच्या कामात झाला. विकास म्हणजे चांगले अन्न जे शेतात मिळते, अशी विकासाची व्याख्या सांगून पवार म्हणाले, शुद्ध अन्न, शुद्ध हवा आणि शांत झोप हे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण आणि आरोग्यासाठी एकमेकांशी जोडून राहणे, ग्रामीण आणि शहरी विभाग जोडलेले असणे गरजेचे आहे. अनेक उद्योग गावात सुरू केले आहेत. मोहाच्या फुलांपासून विविध पदार्थ तयार करणारा शबरी नॅचरल ग्रामोद्योग उभारला आहे. वनांचल विज्ञान केंद्रासाठी श्री. गिरीशजी कुबेर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांनी शासनाच्या मदतीने दहा केंद्रांना मान्यता मिळवली आहे आणि त्यातील एक बारीपाड्यामध्ये आहे.
बारीपाड्याचे यश हे कल्याण आश्रम आणि विविध ग्रामीण संसाधनांचा योग्य वापर व ग्रामीण भागाची प्रगती यांच्यावरच अवलंबून आहे. विकास करत असतानाच आपल्याला कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. ग्रामीण विकास हा नगरीय कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जैवविविधतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी मांडले.
संघाचे अप्रतिम कार्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हादजी राठी यांनी जनजाती कल्याण आश्रमाच्या विविध विकास प्रकल्पांचे आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. संघ किंवा संघाचे कार्यकर्ते, प्रचारक निष्काम काम करतात. सामाजिक कार्याची संपूर्ण देशभरात उभारणी संघच करू शकतो. समाजसेवा, सेवाकार्य सुरू करणे आणि त्याची गणिती पद्धतीने वाढ हे संघाला जमलेले आहे. ते इतरांना जमणार नाही. त्यासाठीच समाजाने संघाला साहाय्य करावे. सेवेसंबंधीचे जे कार्य संघाने हाती घेतले आहे ते अप्रतिम कार्य आहे, असे राठी म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी धोका यांच्या पंचांहत्तरी निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. संस्थेचे सचिव सतीश मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कार्यकर्त्या शोभा जोशी यांनी दिनदर्शिकेच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली.
प्रकाश खिचडे यांनी नाशिक मधील गुही येथे जो शाळा उभारणी प्रकल्प सुरू आहे त्याची माहिती देऊन त्यासाठी मदतीचे आवाहन केले. महिला प्रमुख तुषारिका लिमये यांनी आभार प्रदर्शन केले.