Saturday, November 23, 2024

वारकरी संप्रदाय व पंढरीची वारी ही हिंदू धर्माचीच आहे ना?

Share

समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी व वेगवेगळ्या साधनांनी सध्या वैचारिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजासहजी हातात उपलब्ध असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून चुकीचे भ्रम निर्माण केला जातोय. एक प्रकारे ही वैचारिक लढाईच सुरू आहे. विशेषत: हिंदू धर्माबाबतचे चुकीचे चित्र उभा केले जात आहे अथवा धर्माला बदनाम करून हिंदू समाजाला संघटित होण्यापासून रोखले जात आहे.

यावर्षी आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर यादरम्यान निघालेल्या पालखी सोहळ्यांमध्ये या संदर्भाने अनेक चुकीचे भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. हा पालखी सोहळे धर्मनिरपेक्षतेचे आहेत, हे पालखी सोहळे सर्व धर्मांना सामावून घेणारे आहेत, ज्ञानोबा – तुकारामच्या जयघोषाप्रमाणे अल्ला – विठ्ठलचाही जयघोष करण्याचा प्रयत्न केला गेला, संतांच्या सामाजिक समरसतेवर प्रश्न विचारले गेले, मुस्लिम व ख्रिश्चन समुदायांकडून धर्मप्रचाराचा प्रयत्नही केला गेला, अनेक मुस्लिम संतांना वारकरी संप्रदायाचे संत म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला व भगव्याध्वजा बरोबर हिरवे ध्वजही फडफडले. वारकरी संप्रदाय हा भागवत धर्म आहे, याचा हिंदू धर्माशी संबंध नाही असा भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला गेला व एक प्रकारे या पालखी सोहळ्यातून वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला. हे सारे करत असताना वारी व वारकरी यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतु मध्ययुगीन कालखंडातील सर्वच संतांनी हिंदू धर्मातील सर्व जातींना एकत्र करण्यासाठीच अशा प्रकारची वारी सुरू केल्याचे लक्षात येते. वारी व पालखी सोहळ्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाचे संघटन आहे व सर्व हिंदू समाजाला परमेश्वराची भक्ती करण्याचा समान अधिकार असल्याचा साक्षात्कार घडवून आणण्यासाठीच ही वारीची परंपरा आहे, हे मात्र आपण विसरून चाललो आहोत, म्हणूनच वारकरी संप्रदायाची खरी ओळख करून घेणे गरजेची आहे. 

वारकरी संप्रदाय वाटचाल व महत्त्व-

समाजाच्या धारणेसाठी धर्माची कल्पना पुढे आली, या धर्माचरणातून मोक्षप्राप्ती हे ध्येय बाळगून निरनिराळी व्रत-वैकल्ये करणाऱ्यांना व हे सर्व करण्याचा अधिकार नसणाऱ्यांनादेखील विशेषतः मध्ययुगाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर-नामदेवादि संत मंडळींनी भक्तीचा सहज-सोपा मार्ग मोक्षप्राप्तीकरिता दाखविला. हा मार्ग सर्वदूर-सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यासाठी संतांनी ज्या वारकरी अथवा भागवत संप्रदायाचा प्रसार केला, त्या वारकरी संप्रदायाचा आपण प्रथमतः विचार करू. वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे आपल्या एका ग्रंथांमध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात, वारकरी संप्रदाय म्हणजेच महाराष्ट्रीय संतांचा भागवत धर्म. हा भागवतधर्म विशाल आणि समावेशक अशा वैदिक धर्माचेच एक विकसित रूप आहे. वेदातील भग-सविता-सूर्य-विष्णू या देवता क्रमाच्या विकासातून विष्णू हे Iविष्णुदैवानां श्रेष्ठ : इति I य : स: विष्णुर्यज्ञस: I असे विशाल स्वरूप उदयास आले. भगवान विष्णू हा यज्ञ आहे. या विष्णरुपी यज्ञात चातुर्वर्ण्ययुक्त विराट पुरुषाचे हवन करण्याच्या प्रेरणेतून धर्मकल्पना उद्यास आली. या धर्मकल्पनेसच आपण वैष्णवधर्म असे म्हटले. यज्ञाच्या बाह्य अवडंबरापेक्षा त्यातील त्यागाच्या तत्वावर सर्वस्व भर देऊन उद्यास आलेला हा वैष्णवधर्म म्हणजे सनातन भागवतधर्म होय.* वारकरी संप्रदायाची ही व्याख्या किती यथार्थ आहे.

वारकरी संप्रदायाचे महत्त्व अनेक अभ्यासकांनी व संशोधकांनी मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे एकूणच महत्व विषद करताना संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. भा.पं. बहिरट वारकरी संप्रदाय – उदय व विकास या आपल्या ग्रंथात म्हणतात, *वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या भारतातील अनेक भक्ती संप्रदायांपैकी प्रमुख असा संप्रदाय आहे, हा संप्रदाय सद्धर्म आणि सदाचार यांच्या शिकवणुकीच्या द्वारा तो श्रेष्ठ जीवनमूल्यांचे रक्षण व पोषण करीत आहे.* सद्धर्म व सदाचार यासाठी सातत्याने सर्वच संतांनी या संप्रदायाच्या माध्यमातून केलेले कार्य विचारात घेता श्री.बहिरट यांचे म्हणणे पटू लागते. वारकरी संप्रदाय अथवा पंथ हे नाव कसे पडले या संदर्भात प्रा.शं.वा.दांडेकर वारकरी पंथाचा इतिहास या आपल्या ग्रंथामध्ये पुढीलप्रमाणे आपले मत मांडतात, *वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरास जातो, तो पंढरपूरचा वारकरी म्हटला जातो व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंथ होय.* परंतु वारकरी म्हणजे काय? हा प्रश्न उरतोच. कै. वि.का. राजवाडे यांनी आपल्या नामादिशब्दव्युत्पत्तीकोश यामध्ये *वारि: -री (प्रवाशांची टोळी) = वारी* असे म्हटले आहे. यावरून पंढरपूरला जाणारी प्रवाशांची टोळी म्हणजेच भगवद्भक्तांचा समूह म्हणजे वारी व अशी वारी नियमाने करणारे ते वारकरी व या भगवद्भक्तांचा म्हणजेच वारकऱ्यांचा पंथ म्हणजे वारकरी पंथ अथवा संप्रदाय असे म्हणता येईल.

वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर -सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तीसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र.रा.गोसावी आपल्या पाच भक्तिसंप्रदाय या ग्रंथामध्ये या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, *भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते असे मानले जाते. तेव्हा ज्ञानदेव पूर्व म्हणजे भक्त पुंडलिकाचा काळ, ज्ञानदेव व नामदेव काळ, भानुदास आणि एकनाथांचा काळ, तुकोबा आणि निळोबा यांचा काळ आणि तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ असे या संप्रदायाचे पाच कालखंड स्थूलमानाने पडतात.* साधारणतः याच पद्धतीचा कालखंड श्री.शं.गो.तुळपुळे, श्री.भा.पं.बहिरट व श्री.सुंठणकर या सारख्या अभ्यासकांनी मांडला आहे, म्हणूनच हा कालखंड आज सर्वमान्य होताना दिसत आहे.

पंढरीला येणारा तो वारकरी, पण हा वारकरी कोणाला भेटायला येतो? तर तो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीरायाला म्हणजेच पांडुरंगाला- विठ्ठलाला भेटायला येतो. या विठुरायाच्या ओढीने मैलोनमैल चालत येणारे भगवद्भक्त आहेत. हा विठुराया हरी व हर म्हणजेच विष्णू व शिव यांच्या ऐक्‍याचे प्रतीक मानला जातो. निरनिराळ्या संतांनी आपल्या अभंगातून यापद्धतीचा संदर्भ दिला आहे. संत नामदेव महाराज,

विष्णूशी भजीला शिव दुराविला |
अधःपात झाला तया नरा ||

नामा म्हणे शिव विष्णू मूर्ती एक |
देवाचा विवेक आत्मारामू ||

अशी हरिहरैक्यभावना व्यक्त करतात तर

 हरी हरा भेद | नाही करू नये वाद ||

द्वैत मानणाऱ्यांना संत तुकाराम महाराज असा उपदेश करताना दिसतात. वारकरी पंथातील भगवद्भक्त नित्य एकादशी करून हरीची उपासना करतात तर महाशिवरात्रीचा उपवास धरून हर म्हणजेच शिवालाही भजताना दिसून येतात, म्हणजेच निदान वारकरी तरी हा भेद मानत नाहीत असे दिसून येते.

एखादा पंथ अथवा संप्रदाय उदयास येतो त्यावेळी या पंथ-संप्रदायाच्या अनुयायांनी कसे वागावे-बोलावे, काय खावे-प्यावे? हा आचारधर्म त्या पंथ-संप्रदायाच्या प्रवर्तकांनी ठरवून दिलेला असतो. परंतु वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे. एकदा का ही समत्व दृष्टी निर्माण झाली, की मग आपोआपच प्रेम, बंधुता या गोष्टी सहजपणे आचरणात यायला लागतात. प्रा.र.रा.गोसावी पाच भक्तिसंप्रदाय या आपल्या संशोधनपर ग्रंथात याच पद्धतीचे मत व्यक्त करतात, *विश्वबंधुत्व, समत्व आणि प्रीती या तीन तत्त्वातून वारकर्‍यांचा आचारधर्म  उदयास आला आहे.* वारकरी संप्रदायातील आचार धर्म हा कर्मकांड जरी नसला तरी सहज करण्यायोगे, आचरण्याजोग्या काही गोष्टी मात्र या संप्रदायात निश्चित आहेत. *रामकृष्णहरी हा मंत्र जप, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, कपाळ व शरीराच्या इतर भागावर गोपीचंदाचा वापर करून मुद्रा धारण करणे, एकादशी दिवशी उपवास करणे व पंढरपूर – आळंदीची वारी करणे* अशा गोष्टी वारकरी म्हणवणाऱ्याने कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली आहे, यासाठी आग्रह धरला जातो, परंतु सक्ती केली जात नाही, त्यामुळेच हा आचारधर्म कर्मकांड ठरत नाही.

गेली हजार-बाराशे वर्षे ज्या संप्रदायाच्या वाढीचा कायमच चढता आलेख राहिलेला आहे, त्या संप्रदायाच्या या वाढीमागील मुख्य कारण कोणते असेल, तर ते म्हणजे या संप्रदायाची शिकवण. संत ज्ञानेश्वर – नामदेवांपासून संत तुकाराम – निळोबारायांपर्यंत सर्वच संतांनी आपल्या *आचरणातून, अभंग- भजन-कीर्तन यातून कर्तव्य करा पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरालाच आपली बुद्धी-सर्वस्व अर्पण करा, प्रपंच करा पण त्याचा मोह ठेवून त्याला कायम चिटकून राहू नका, वर्णधर्म पाळा पण भेदाचा भाव मनामध्ये न ठेवता वर्णाभिमान सोडा* यासारखी सातत्याने शिकवण दिली. सर्वच संतांनी आपल्या वाड्मयातून या गोष्टींचा प्रसार करून वारकरी संप्रदायाला वर्धिष्णू बनविले. संतांनी आपल्या वागण्यातून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन करायचे व अध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक जाणीवा जागृत, विकसित करायच्या हेच ध्येय ठेवलेले होते, म्हणूनच या संत साहित्याची आजच्या आधुनिक काळातही तेवढीच गरज असल्याचे लक्षात येते.

वारकरी संप्रदायाचा आचारधर्म हा काही कर्मकांड नाही, त्यामुळेच तो आचरण्यास सहज-सोपा आहे हे लक्षात घेऊन वारकरी संप्रदाय व संतांनी घालून दिलेल्या संस्काराचे आजच्या काळात आचरण करणे हीच खरी ईश्वर भवती ठरणार आहे.

डॉ. सचिन वसंतराव लादे
पंढरपूर

अन्य लेख

संबंधित लेख