Saturday, May 25, 2024

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष

Share

भारतीय समाज आपल्या संस्कृतीची रुजवात नव्या पिढीला घालून देत राहिला आहे. काय आहेत या समाजाची मूल्ये जी सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील? २२ एप्रिल या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ही मूल्ये विषद करून सांगणारा हा लेख.

आज २२ एप्रिल, वसुंधरा दिवस म्हणजेच Earth Day हे एक असे आंतरराष्ट्रीय सामाजिक आंदोलन आहे. या दिवसाच्या निमित्ताने साऱ्या विश्वभरातील लोक ऊर्जेचा अत्यंतिक अतिरिक्त वापर, जलवायु परिवर्तन, जंगलतोड, विनाशकारी उपकरणे, रसायने, प्लास्टिकचा अतिवापर ह्या पर्यावरण विषयक प्रश्नांचा पायाभूत पातळीवर अतिशय गंभीरपणे अभ्यास, विचार, चिंतन, प्रचार, प्रसार करतात. हा दिवस साजरा केला जायला लागला त्याला एक भीषण घटना कारणीभूत आहे. २८ जानेवारी १९६९ या दिवशी अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया जवळच्या समुद्रातील एका तेलविहिरीतून प्रचंड तेलगळती होऊन सगळे तेल समुद्रावर, किनारपट्टीवर पसरू लागले. त्यामुळे हजारो पक्षी मृत्युमुखी पडले, हजारो सील आणि डॉल्फिन मासे मरून समुद्रकिनाऱ्याला लागले. किनारे प्रदूषित झाले. हे सारे दृश्य अत्यंत भयकारी होते. आणि या गळतीचे कारणही मानवनिर्मितच होते. ज्या कंपनीची ही तेलविहीर होती त्यांनी केवळ पैसे वाचवण्यासाठी समुद्राच्या तळाशी आवश्यक त्या सुरक्षा योजना करायच्या टाळल्या. आणि कंपनीच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे एका फटक्यात हजारो, लाखो जीवांची कत्तल झाली. अमेरिकेत बेसुमार वाढत चाललेले औद्योगिकीकरण, निसर्गाची हानी या गोष्टी सामान्य लोकांना दिसत होत्याच. त्यात ही घटना घडली. समाजात निर्माण झालेल्या संतापाला, अस्वस्थतेला, उद्रेकाला सिनेटर गेरार्ड नेल्सन यांनी वाट करून दिली. २२ एप्रिल १९७० हा दिवस प्रथम ‘राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण दिवस’ म्हणून साजरा केला गेला. या निमित्ताने केलेल्या विविध कार्यक्रमात सगळ्या अमेरिकेतील लाखो लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय संघटना देशोदेशी वसुंधरा दिवस प्रयत्नपूर्वक, कल्पकतेने, विवेकी दृष्टीने, जबाबदारीने साजरा करत आल्या आहेत.
वसुंधरा दिवसाचे मुख्य उद्दिष्ट पृथ्वीच्या, पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात जागरूकता वाढवणे हे आहे. कोणतीही जातपात, देश, रंग, धर्म याच्या चौकटीत न अडकता समग्र मानवतेसाठी सगळ्या जगाने एकविचाराने निसर्गरुप होण्याचा हा दिवस आहे.

निसर्गाच्या संरक्षण, संवर्धनाचा विचार करताना संकटांची, आव्हानांची, शत्रूंची यादी पाहता त्यांच्याशी दोन हात करणे अशक्य वाटू लागते. अशी निसर्गाची अपरिमित हानी करणाऱ्या शेकडो लाखो छोटयामोठ्या मनुष्यनिर्मित घटना जगभर घडत आहेत. जागतिक स्तरावरील तेल कंपन्या, फार्मा लॉबी, शस्त्रास्त्रे कंपन्यांचे गट, बांधकाम कंपन्या, केमिकल, खते, बी बियाणे बनवणाऱ्या कंपन्या, प्लास्टिक असे कित्येक नफेखोर गट निसर्गाचा टोकाचा निरादर करत अत्यंत निर्दयतेने पृथ्वीची नासाडी करत आहेत. जगातील विविध मानव समुदायांनी अधिकाधिक भौतिकतावादी, अनैतिक, सुखलोलुप व्हावे यासाठी निर्लज्जपणाचे रोज नवे उच्चांक गाठत आहेत.

Save soil

पण निसर्गदेवता इतकी मऊ हृदयाची आहे की कितीही हाल सोसले, नासाडी सहन केली तरी निसर्गाला पुनरुज्जीवित व्हायला फार थोडा काळ पुरतो. कोविड काळात लॉकडाऊनमुळे जगभरात शुकशुकाट होता. माणसं पिंजऱ्यात ठेवल्यासारखी घरात बसून होती. तेव्हा निसर्गाने मोकळा श्वास घेतला. अनेक जंगली प्राणी, दुर्मिळ पक्षी लोकांना शहरांतूनही बघायला मिळाले. प्रदूषण शून्य झाल्यामुळे कधीही न दिसलेले दूरचे डोंगर, क्षितिज नजरेच्या टप्यात आले. गावांचा, शहरांचा, जंगलांचा हिरवेपणा वाढला. या निमित्ताने मानवजगताला निसर्गाच्या सृजनशील शक्तीची प्रकर्षाने जाणीव झाली. लहान असताना ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे एक विवादित पुस्तक वाचले होते. त्यातील विचार किती शास्त्रीय, अशास्त्रीय हा मुद्दा बाजूला ठेवू. पण आपण माणूस म्हणून खरंच पृथ्वीवर पृथ्वीवासी म्हणून राहण्याच्या लायकीचे आहोत का? असा प्रश्न मनाला पडतो. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते पृथ्वीकडे इतकी शक्ती आहे की ती मानवाच्या सर्व गरजा पुऱ्या करू शकते. पण माणसाच्या लालसेला ती पुरी पडू शकत नाही. या सगळ्याचा विचार करता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे नफेखोर, मनुष्यप्राण्याला भोगलोलुप बनवणारी अर्थव्यवस्था, त्याभोवती निर्माण झालेली समाजव्यवस्था, त्यातून तयार झालेल्या अनैसर्गिक धार्मिक व्यवस्था, तत्वज्ञान या सगळ्याचा परिपाक पर्यावरण, पृथ्वी आणि पर्यायाने मानवाच्या ऱ्हासात आहे.

या विनाशाची सुरुवात साधारण विचार केला तर युरोपातील औद्योगिक क्रांतीपासून झाली असे ढोबळ मानाने म्हणता येईल. औद्योगिकीकरणामुळे जसजशी आर्थिक घडी बदलत गेली तसतशी युरोपियन समाजाची, सत्तास्थानांची विस्तारवादी वक्रदृष्टी जगातील खनिजसंपत्ती, मनुष्यबळ, जमिनी मालमत्ता यांवर पडू लागली. या युरोपियन चाच्यांनी दिशा आणि देश सरळ वाटून घेतले. त्यांच्या धार्मिक ग्रंथांनुसार सगळी पृथ्वी ही त्यांचा विशिष्ट देव मानणाऱ्या मानवांच्या उपभोगासाठी बनलेली असल्याने अधिकाधिक पृथ्वीवर आपली सत्ता स्थापन करून तिथल्या सभ्यता नष्ट करून, तिथल्या समाजाला आपले गुलाम बनवून तिथून ओरबाडता येईल त्या सर्व प्रकारची संपत्ती ओरबाडून काढायची; आपल्या धर्माच्या प्रसाराचा आडोसा घेऊन या लोकांच्या अस्मितांवर घाला घालायचा, अशी व्यवस्था जगभर त्यांनी उभी केली. भारतातही पोर्तुगीज, इंग्रज, डच लोक याच उद्देशाने आले. त्यातल्या इंग्रजांना इथे मोठ्या काळासाठी एकहाती राज्य करता आले. त्यांनी कित्येक अनैसर्गिक कायदे आपल्यावर लादले. सत्तेच्या बळावर इथल्या माणसांचेच नाही तर निसर्गाचे शोषण करणाऱ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व्यवस्था उभ्या केल्या.

Industrial revolution

स्वाभाविकपणे भारतीय समाजाची मूळ सनातन व्यवस्था धुळीला मिळाली. स्वबोधातून निर्माण होणारा स्वाभिमान, आत्मविश्वास नष्ट होऊ लागला. निसर्गाला अनुकूल असणारी जीवनव्यवस्था अनेकांना कमी प्रतीची वाटू लागली. नैतिक मूल्यांच्या सामान्य कल्पनांना ठोकर बसली. इतकी अपरिमित हानी होऊनही जसा निर्सग संधी मिळताच पुन्हा नव्याने मूळ धरू लागतो, फोफावू लागतो त्याप्रकारे भारतीय समाजही आपल्या संस्कृतीची रुजवात नव्या पिढीला घालून देत राहिला. काय आहेत या समाजाची मूल्ये जी सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील?

हा विषय मांडायचा तर मोठमोठे खंड लिहून होतील. पण चराचरात देव आहे असे मानून डोंगर दगड, झाडे, फुले, पशु, पक्षी माणसे साऱ्यालाच देवत्व देणारी ही संस्कृती आम्हाला ओरबाडायचा नाही तर सृजनाचा संस्कार देते. निसर्गदेवतेचे आभार मानायची शिकवण देते. शक्य तितके थोडक्यात भागवून जास्तीत जास्त पुढच्या पिढ्यांसाठी वाचवायचे अशी आर्थिक व्यवस्था भारतातच पाहायला मिळते. तथाकथित श्रीमंत राष्ट्रांत आत्ता संपत्तीचा मनसोक्त उपभोग करून घ्या, पुढच्या पिढ्या आपण करून ठेवलेली कर्जे चुकवतील असा अब्राहमिक विचार दिसतो. भारतीय अर्थव्यवस्था फेमिनाईन आहे. म्हणजेच अतिशय लवचिक, सुबकपणे मांडलेली आहे, असे एस. गुरुमूर्ती हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अभिमानाने म्हणतात.

एखाद्या धार्मिक, सामाजिक कामासाठी पाणी घेतानाही नदीचीही क्षमा मागावी आणि आवश्यक तितकेच पाणी वापरावे, ते नासू नये हे आमच्याच संस्कृतीत शिकवले जाते. अन्नाचा कणही वाया जाऊ देऊ नये असेच आम्ही मुलांना शिकवतो. कारण आम्ही प्रसाद म्हणून अन्नाला नमस्कार करून मग ते ग्रहण करत असतो. आम्ही सरकारी फ्रीबीजवर आमचे कुटुंब चालवत नाही की आमच्या आईवडिलांना सरकार सांभाळत नाही. पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना आता लक्षात येऊ लागले आहे की कुटुंबाने एकत्रितपणे सर्व माणसांची अंतिम श्वासापर्यंत व्यवस्था लावणे हीच खरी व्यवहार्य, चतुरपणाची आणि शाश्वत टिकणारी आर्थिक, कौटुंबिक व्यवस्था आहे. जगभरातून ओरबाडलेल्या संपत्तीवर किती वर्षे देश आणि जनतेला पोसणार? आणि इकडे आमच्या संस्कृतीत रात्री झाडे झोपतात म्हणून आम्ही फुलेही तोडत नाही. जंगलातली काही विशिष्ट औषधी वनस्पती हवी असेल तर तीही विशिष्ट दिवशी आणि एकदाच तोडावी असा नियम आहे. वड पिंपळाचे झाड तोडणे म्हणजे ब्रह्महत्येचे पाप असे म्हणत शेकडो वर्षे पर्यावरणाचे संरक्षण करणारे असे कित्येक महावृक्ष पिढ्यानुपिढ्या जतन करतो. पाश्चात्य संस्कृतीची शिकवण अशी की माणसाला एकच जन्म मिळतो. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. स्वाभाविकपणे दोनही संस्कृतींच्या पापपुण्याच्या संकल्पनांमध्ये आत्यंतिक फरक पाहायला मिळतो. अक्षयतृतीयेला नवे बीजारोपण करण्याची पद्धत आपल्याकडे हजारो वर्षे चालत आली आहे. नवी झाडे लावणे म्हणजेच वसुंधरा दिवस साजरा करणे ना? आपल्या संस्कृतीत आपण हे पूर्वापार करत आलो आहोत. धर्मो रक्षती रक्षत: असे म्हणतात. म्हणजे धर्म त्यालाच वाचवतो जो धर्माला वाचवेल. निसर्गाच्या बाबतीतही असेच आहे नाही का?

भविष्याचा वेध घेत अवकाशाला कवेत घेताना ही जीवनदायी वसुंधरा सुजलाम सुफलाम राहावी म्हणून सनातन जीवनमूल्यांचा आधार हाच खरा आधार आहे हे हळूहळू आता सगळ्या जगाला पटू लागले आहे. जगासाठी ‘भारत अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो भारत’ आहे. या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या वाक्याचा मथितार्थच येणाऱ्या काळासाठी मार्गदर्शक प्रकाशरेषा ठरत आहे.

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय तसेच ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख