Friday, September 13, 2024

घरून नाही, केंद्रावर येऊन मतदान करणार…

Share

महादेव दंडगे यांचे वय आहे फक्त १०३ वर्षे. फक्त का म्हणायचे, कारण त्यांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह…

हा प्रसंग घडला सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात. अनेकदा पांढरपेशा, सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसत नाही. मात्र अशा वातावरणातही काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण शिराळामध्ये आहे. त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक महादेव दंडगे. त्यांचे वय वर्ष आहे फक्त १०३.
या वयातही देशप्रेम, कणखरपणा, जिद्द या गुणांनी ओतप्रोत भरलेले हे व्यक्तिमत्व.
दंडगे यांचे समृद्ध, सफल आयुष्य आहे. गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदारसंघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी, तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाशी जोडलेला आहे. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे गेले होते. बरोबर शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत होत्या.
यंदा निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील, तसेच अंध मतदारांसाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे. निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी श्री. शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. या दौऱ्यात श्री. दंडगे यांचे वय १०३ असल्याचे समजले. त्यांची श्री. शिंदे यांनी आपुलकीने भेट घेऊन त्यांना मतदान करण्याबाबत सूचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मितहास्य करत सांगितले, “छे… ! छे… ! मी घरून मतदान करणार नाही. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणार.” त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदेही थक्क झाले. या १०३ वर्षांच्या मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांनी नक्कीच घ्यायला हवा.

अन्य लेख

संबंधित लेख