समुद्र हा मुंबईचा सखा. सगळी धावपळ, दगदग विसरायचं ठिकाण म्हणजे नरीमनचा समुद्र किनारा! याच अथांग समुद्राच्या लाटांवर मुंबईची स्वप्नं हिंदोळत असतात. पण २६ नोव्हेंबर २००८ च्या त्या काळरात्री, याच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन मृत्यू शहरात शिरला. तेही एका भारतीय मच्छिमार बोटीतून – त्या बोटीचं नाव होतं ‘कुबेर’. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या १० अत्यंत प्रशिक्षित नराधमांनी या बोटीचं अपहरण केलं, निष्पाप मच्छिमारांना समुद्रात फेकून दिलं आणि कुलाब्याच्या बधवार पार्कच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं. नियतीचा खेळ पाहा, स्थानिक कोळी बांधवांना या अनोळखी, अवजड सॅक आणि शस्त्रं बाळगणाऱ्या टोळक्याचा संशय आला होता. त्यांनी प्रशासनाला सावधही केलं, पण दुर्दैवाने त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष झालं आणि पुढच्या काही तासांतच भारताच्या इतिहासातल्या सर्वात भीषण अशा रक्ताळलेल्या अध्यायाची सुरुवात झाली.
त्या रात्री मुंबईच्या नर्व्ह सेंटर्सवर हल्ला करण्यासाठी हे १० दहशतवादी दोन-दोनच्या गटात विखुरले. त्यांच्या सॅकमध्ये AK-47 आणि ग्रेनेड्स होते आणि मनात भारताच्या आत्म्यावर घाव घालणारा द्वेष. लिओपोल्ड कॅफेमध्ये पर्यटकांच्या आनंदावर विरजण घालत गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. तिकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) अजमल कसाब आणि इस्माईल खान या दोन नराधमांनी जिहादाचा नंगानाच घातला. अवघ्या काही मिनिटांत या दोन जिहाद्यांनी ५० हून अधिक निष्पाप जीव घेतले. कामा हॉस्पिटलच्या दिशेने जाताना त्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं. हे हल्ले एका सुनियोजित युद्धाची सुरुवात होती.
पुढचे ६० तास जे घडलं ते पाहून जगाचा थरकाप उडाला. ताज, ओबेरॉय, ट्रायडंट आणि नरीमन हाऊस… मुंबईच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या या इमारतींचे रूपांतर ‘किलिंग फिल्ड्स’मध्ये झालं होतं. हे एक शहरी युद्ध (Urban Siege) होतं. दहशतवाद्यांनी या वास्तूंना वेढा घालून आतमध्ये शेकडो निष्पाप जीवांना ओलीस धरलं होतं. एकेका खोलीत जाऊन, विशेषतः परदेशी नागरिकांना वेचून मारलं जात होतं. हा ‘स्लो-मोशन शूट-आउट’ होता, ज्याने जगभरातील माध्यमांना ३ दिवस खिळवून ठेवलं होतं. पाकिस्तानातले हँडलर्स टीव्हीवर हे लाईव्ह पाहत होते आणि फोनवरून अतिरेक्यांना सूचना देत होते. भारताला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खच्ची करणं, हाच त्यामागचा उद्देश होता. १७५ निष्पाप बळी आणि ३०० जखमींच्या आक्रोशानंतर २९ नोव्हेंबरच्या सकाळी हा मृत्यूचा खेळ थांबला.
या रक्तापातामागे बंदूकधारी हातांमागे एक विषारी विचारसरणी होती. लष्कर-ए-तैयबा ही सलाफी-जिहादी संघटना भारताला ‘इस्लामचा शत्रू’ मानते. त्यांचे उद्दिष्ट केवळ काश्मीरपुरते मर्यादित नसून भारताचे तुकडे करणे हे आहे. २६/११ च्या हल्ल्यात नरीमन हाऊस (ज्यू केंद्र) ला लक्ष्य करणं, हे ‘क्रुसेडर-झिओनिस्ट-हिंदू’ (अमेरिका-इस्रायल-भारत) या युतीविरुद्धच्या द्वेषाचं प्रतीक होतं. ज्यूंना मारून इस्रायलशी भारताचे संबंध तोडण्याचा तो एक क्रूर प्रयत्न होता.
दहशतवाद्यांच्या क्रूरतेपेक्षाही जास्त वेदनादायी होतं ते तत्कालीन व्यवस्थेचं आणि राजकीय नेतृत्वाचं अपयश. हल्ल्याची पूर्वसूचना असूनही सागरी सुरक्षा रामभरोसे होती. मुंबईत रक्ताचे पाट वाहत असताना एनएसजी (NSG) कमांडोंना पोहोचायला १० तास लागले, कारण त्यांच्यासाठी विमानाची सोय नव्हती. पोलीस जुनाट रायफल्स घेऊन एके-४७ चा सामना करत होते. त्याहून संतापजनक होती नेत्यांची संवेदनशून्यता. जेव्हा मुंबई जळत होती, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री टीव्हीवर दिसण्यासाठी कपडे बदलण्यात मग्न होते, ज्यामुळे त्यांना ‘भारताचा नीरो’ म्हटलं गेलं. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आपल्या मुलाला आणि एका दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलची पाहणी करायला गेले होते, जणू काही ते चित्रपटाचं लोकेशन शोधत होते. “भारत जागा झालाय, राजकारणी कधी जागे होणार?” हा प्रश्न तेव्हा प्रत्येक मुंबईकराच्या मनात होता.
जेव्हा व्यवस्था कोलमडते, तेव्हा सामान्य माणसांमधली देशभक्ती जागृत होते. ही देशभक्तीच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशासाठी सर्वोच्च काहीतरी देण्याची प्रेरणा देते. या अंधाऱ्या रात्रीत काही ताऱ्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. तुकाराम ओंबळे… या वाघाने स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या पण कसाबला जिवंत पकडलं. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्व करताना सहकाऱ्यांना,”वर येऊ नका, मी त्यांना बघून घेतो,” असं सांगितलं आणि हौतात्म्य पत्करलं. त्यांचे बलिदान हे व्यवस्थेच्या अपयशावर पांघरूण होऊ शकत नाही. व्यवस्थेच्या त्या अपयशाने घेतलेले हे बळी होते.
२६/११ हा भारतासाठी एक वेक-अप कॉल होता. त्यावेळच्या ‘सॉफ्ट स्टेट’ धोरणामुळे भारताने केवळ संयम बाळगला. पण २०१४ नंतर चित्र पालटलं. आज भारताने ‘झिरो टॉलरन्स’चं धोरण स्वीकारलं आहे. उरी, पुलवामा आणि आता ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने हे सिद्ध केलं की, आता दहशतवादी हल्ल्याचं उत्तर केवळ चर्चेतून नाही, तर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ने दिलं जाईल. “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही” आणि “पाकिस्तानात घुसून मारण्याची क्षमता” हेच नव्या भारताचं सुरक्षा धोरण आहे.
आजच्या युवा पिढीसाठी २६/११ चा इतिहास हा एक धडा आहे. तो धडा म्हणजे स्थिर आणि मजबूत सरकारशिवाय देशाची सुरक्षा आणि प्रगती अशक्य आहे. तुकाराम ओंबळे आणि मेजर उन्नीकृष्णन यांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली आपण तेव्हाच वाहू शकतो जेव्हा आपण मतदान करताना राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या आणि कठीण काळात कठोर निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहू. कारण देश सुरक्षित तरच आपण सुरक्षित!