लाडकी बहिण योजनेवरून भारतीय जनता पक्षाला विरोधकांकडून तसेच तथाकथित विचारवंतांकडून सातत्याने लक्ष्य केले जात असले तरीसुद्धा ही योजना महिलांना फक्त भाऊबीज देण्यापुरतीच मर्यादित नसून महिलांना अनेकविध संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी ८३ महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक असताना त्याही पुढे जाऊन भाजपने ९२ महिलांना उमेदवारी देत महिलांचा सन्मान केला आहे.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांमध्ये मिळून एकूण १६५ जागा आहेत. त्यातील ८३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या सर्व जागा भाजप लढवत आहे. शिवाय सर्वसाधारण गटात पुरुषांना उमेदवारी देणे शक्य असतानाही भाजपने अशा नऊ जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या ९२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यातील एका जागेवर मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपने सर्वसाधारण गटात चार आणि अनुसूचित जातीच्या गटात पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. या सर्व जागांवर पुरुष उमेदवारांना उमेदवारी देणे शक्य असतानाही तेथे महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिला आरक्षण नसलेल्या जागांवर त्या निवडणूक लढवत आहेत.

नगरसेविकांची उत्तम कामगिरी
भाजने यापूर्वीही संधी दिलेल्या अनेक नगरसेविकांनी चांगली कामगिरी करत त्यांच्या कामाचा ठसा महापालिकेत आणि त्यांच्या त्यांच्या प्रभागातही उमटवला आहे. त्यातील अनेक नगरसेविका महापालिकेच्या मुख्य सभेतही नेहमीच अभ्यासपूर्ण भाषणे करून चांगले मुद्दे मांडत असत. मालतीबाई परांजपे, शांताबाई लिमये, लीलाताई भावे, उर्मिलाताई आपटे, तसेच शनिवार-नारायण पेठेतून निवडून येणाऱ्या ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, दक्षिण पुणे परिसरातील प्रभावतीताई मटाले, कर्वेनगर भागातील शशिकलाताई मेंगडे, माधुरीताई सहस्रबुद्धे अशी उत्तम कामगिरी केलेल्या कितीतरी नगरसेविकांची नावे सांगता येतील.
आपापल्या प्रभागातील नागरिकांची कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. सभागृहात प्रश्न मांडावे लागतात. या कामातही या नगरसेविका मागे नसत. कामांसाठी वारंवार पाठपुरावा करणे, समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटत राहणे, पत्र देणे, निवदेने देणे अशा सर्व पद्धतीने त्या कामे करत.
चांगल्या कामगिरीचा विश्वासमहापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळण्याचा विश्वास असून निवडून आलेल्या सर्व नगरसेविका प्रभागात आणि महापालिकेतही उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे.