नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली की, आज ‘वंदे मातरम्’ गीतावर चर्चा आणि उद्या (९ डिसेंबर) निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे.
भाजपचा ‘उबाठा’वर थेट हल्ला!
लोकसभेत चर्चा सुरू होण्यापूर्वीच, महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (उबाठा) त्यांच्या भूमिकेवरून घेरले आहे. उपाध्ये यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसवरही टीका केली आहे.
बाळासाहेबांची आठवण करून देत उपाध्ये यांनी प्रश्न केला की, “आज लोकसभेत ‘वंदे मातरम्’ वर चर्चा आहे. उबाठा काय भूमिका घेणार? बाळासाहेब असते तर शिवसेनेने छातीठोकपणे समर्थन करणारी भूमिका घेतली असती!”
काँग्रेसवर ‘मतांच्या राजकारणा’साठी ‘वंदे मातरम्’ला विरोध केल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
‘वंदे मातरम्‘ला १९५० मध्ये राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला. पण “ते लोकसभेत सुरू व्हायला तब्बल ४२ वर्षे लागली. कारण? मतांच्या लांगुलचालनासाठी काँग्रेसने केलेला विरोध.”
१९९२ मध्ये प्रथमच भाजप नेते राम नाईक यांच्या पाठपुराव्यानतंर संसदेच्या कामकाजाची सुरुवात ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने, तर समारोप ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाने होऊ लागला असे ते म्हणाले.
‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिन मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला एकाच वेळी घेरत असल्याचे दिसून येत आहे. आता ‘वंदे मातरम्’च्या चर्चेवर उबाठा गट काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.