मुंबई : “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि आजचा ‘उबाठा’ पक्ष यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असते तर देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना शिवसेनेत कधीच थारा मिळाला नसता,” अशा तिखट शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या अब्दुल रशीद खान उर्फ मामू ह्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर ट्विट करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, ज्यांनी “पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्या, ज्यांनी “यह मुसलमानों की बस्ती है”, “हम सब एक हैं, इसे मार डालो” किंवा “इसकी संपत्ति जला दो” अशा चिथावणीखोर घोषणाबाजी केली, त्यांना आज ‘उबाठा’ पक्षात रेड कार्पेट दिले जात आहे.
उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे फरक स्पष्ट करताना म्हटले की, “ती ‘बाळासाहेबांची शिवसेना’ होती, हा केवळ ‘उबाठा पक्ष’ आहे!” त्यांच्या मते, बाळासाहेबांच्या शिवसेनेत हिंदुत्ववादावर ठाम राहण्याची आणि देशविघातक शक्तींना ठेचून काढण्याची धमक होती. मात्र, आज केवळ सत्तेच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांना तिलांजली देऊन अशा समाजविघातक घटकांना पक्षात घेणे, ही हिंदुत्वासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी एक ‘धोकादायक मानसिकता’ असल्याचेही त्यांनी नमूद केले. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात आता ‘खऱ्या’ आणि ‘खोट्या’ शिवसेनेवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.