मुंबई : “निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. “उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे.
प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा!
केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विट) हँडलवरून संजय राऊतांच्या दाव्याचा पंचनामा केला. ते म्हणाले की, ज्या पक्षात आज निवडणूक लढवण्यासाठी सक्षम चेहरे उरलेले नाहीत आणि जिथे उमेदवार शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे, तिथे ‘निष्ठावंत कार्यकर्ता’ हा मुद्दाच शिल्लक राहत नाही. भाजपच्या मते, ठाकरे गटासमोर आज सर्वात मोठे संकट हे उमेदवारी देण्याचे नसून, पक्ष सोडून जाणारे नेते आणि उमेदवार टिकवण्याचे आहे.
“अस्तित्वासाठी उमेदवारांची शोधाशोध”
गेल्या काही काळापासून ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. अनेक जुने आणि जाणते कार्यकर्ते महायुतीत सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी टोला लगावला की, “आज उबाठामध्ये प्रश्न उमेदवारी कापण्याचा नाही, तर उमेदवार टिकवण्याचा आहे.” निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवार मिळत नसल्यानेच ठाकरे गट अशा प्रकारची ‘निष्ठावंत’ विधाने करून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच, भाजपने ठाकरे गटाच्या संघटनेतील कमकुवत दुव्यावर बोट ठेवले आहे. “ज्यांनी स्वतःचा पक्ष सावरला नाही, ते आता निष्ठेच्या गोष्टी करत आहेत,” असे म्हणत भाजपने आगामी काळात ठाकरे गटाला उमेदवार उभे करणेही जिकिरीचे जाईल, असे संकेत दिले आहेत.