Friday, December 26, 2025

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

Share

मुंबई : “भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला.

अटलजी: आधुनिक भारताचे शिल्पकार

मुख्यमंत्री म्हणाले की, भारत मातेचे सुपुत्र भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी जवळजवळ 5 दशकांहून अधिक काळ देशाला दिशा देण्याचे कार्य केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घडवलेल्या नवभारताचा पाया खऱ्या अर्थाने रचणारे हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते.

परराष्ट्रमंत्री असताना अटलजींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी दिशा दिली; त्याच तत्त्वांवर पुढे भारताचे परराष्ट्र धोरण घडत गेले. अटलजी म्हणायचे की, देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो, त्यासाठी त्यांनी ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या’ माध्यमातून उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम भारत जोडण्याचा निर्णय घेतला, जागतिक दर्जाच्या महामार्गांची संकल्पना ही अटलजींच्या दूरदृष्टीची साक्ष आहे.

अणुचाचणीनंतर जगाने भारतावर लादलेल्या निर्बंधांनंतरही अटलजी यांनी ठामपणे देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे उभी केली. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यामुळे भारतीय भाषेला जागतिक मान्यता मिळाली.

अटलजी अनेक भाषांमध्ये प्रवीण होते आणि विविध साहित्याचा त्यांना सखोल अभ्यास होता. हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करणारे आणि राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना प्रकट करणारे अटलजी होते. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी दाखवलेला मार्ग, दिलेले विचार, दृढता आणि राष्ट्रवाद आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुढे नेत आहेत. त्यामुळेच आज भारत जगातील प्रमुख देश म्हणून उभा राहिला आहे.

मुंबईत उभं राहणार अटलजींचं भव्य स्मारक!

“अटल सेतूच्या रूपाने आपण त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेतच, पण मुंबईत अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक येत्या काळात निश्चितच साकारले जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यामुळे अटल प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

खरी श्रद्धांजली १६ जानेवारीला!

आगामी महापालिका निवडणुकीवर भाष्य करताना फडणवीस यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “आज आपण अटलजींना अभिवादन करत आहोत, पण त्यांना खरी श्रद्धांजली १६ जानेवारीला दिली जाईल. ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल आणि ‘कमळ’ खिलेल, तीच अटलजींना खरी मानवंदना असेल.”

“अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा!” हा अटलजींचा मंत्र आता मुंबईत प्रत्यक्षात येणार असून, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारासाठी भाजप सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाशजी, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख