हिंदू संस्कृतीचा पूर्ण नाश होणार आणि तिची ओळख पुसली जाईल असे वाटत असतानाच हिंदूही राज्यकर्ते होऊ शकतात हा विश्वास छत्रपती शिवरायांनी आणि मराठा साम्राज्याने निर्माण केला. इंग्रजांच्या काळात जी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली, जे सांस्कृतिक उत्थान घडले, जे प्रबोधन आणि परिवर्तन घडले त्याची प्रेरणा आपल्याला शिवशाहीत दिसते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचे आणि पराक्रमाचे हे स्मरण.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९४५ या तिथीला म्हणजेच २ जून २०२३ रोजी ३५० व्या शिवराज्याभिषेक शकाचा प्रारंभ झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही हिंदुस्थानच्या इतिहासातील विलक्षण घटना होती. साडेतीनशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
शिवपूर्वकाळ आणि परकीयांची आक्रमणे
इसवीसनपूर्व काळापासून हिंदुस्थानातील संपत्ती लुटण्यासाठी परकीय आक्रमकांच्या टोळ्या भारतावर धाडी टाकत होत्या. हिंदुस्थानवरील पहिले आक्रमण २५०० वर्षांपूर्वी ग्रीक राजा अलेक्झांडर याने केले. त्यानंतर शक, हूण, कुशाण यांची आक्रमणे झाली परंतु त्यांना आपण आपल्या संस्कृतीत सामावून किंवा विलीन करून घेतले. ८व्या शतकात इस्लामी अरब मोहंमद बिन कासिमने आक्रमण केले आणि राजा दाहीरचा पराभव करून सिंध प्रांत जिंकला. त्यानंतर इस्लामी आक्रमणांची धार वाढत गेली. जगभर जिथे जिथे इस्लाम गेला तिथे त्यांनी तिथल्या प्राचीन संस्कृतीचा नाश केला. तिथली सर्व जनता इस्लाममय झाली. भारतामध्ये या काळात पराकोटीची असहिष्णुता आणि अत्याचार हिंदू समाजाने सहन केले. परंतु या कालखंडातील इतिहास फक्त पराभवाचा नसून हिंदुंच्या शौर्य आणि बलिदानाचाही आहे. शिवपूर्वकाळात ललितादित्य, नागभट्ट प्रथम, चालुक्यांचा प्रतिनिधी पुलकेशी द्वितीय, काबुल आणि जाबुलची हिंदू साम्राज्ये, राजपूत राजे, आसाममध्ये अहोम शासक, दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्य यांनी इस्लामला रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.
शिवाजी महाराजांचे प्रशिक्षण
शहाजीराजे आणि जिजाऊंनी बाल शिवबाच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. अनेक कला, विद्या आणि शास्त्रांचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले. आपल्याला मिळालेले प्रशिक्षण आणि अंगभूत गुणांच्या आधारे शिवाजी राजांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. प्रारंभीच्या काळात शिवाजी राजांनी शेतीमध्ये अनेक सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामधून शेतकरी समृद्ध झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदारांना रोजगार मिळाला. ही मंडळी सर्व समाज किंवा जातीतील होती. तेच शिवरायांच्या सैन्यात दाखल झाले. अशारीतीने अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली.
१६४८ साली फत्तेखानाच्या पहिल्या स्वारीच्या वेळी महाराजांकडे १,००० ते १,२०० मावळे होते. त्यानंतरच्या ३२ वर्षातील प्रगती पाहूया. १६८० साली महाराजांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी स्वराज्यात, १ लाखाचे घोडदळ, १ लाखाचे पायदळ, आरमारात ३०० माणसे किंवा ३०० टन सामान वाहू शकतील अशी जहाजे निर्माण झाली होती. डोंगरी तसेच सागरी किल्ले बांधून स्वराज्याच्या सीमांचे रक्षण केले गेले. महाराजांनी गडकोटांचे प्रशासन उत्तमरितीने राबविले. महत्त्वाच्या किल्ल्यांवर १८ कारखाने, १२ महाल बांधले. किल्ल्यांच्या रक्षणासाठी १.७५ लाख होन आणि मुघलांशी लढण्यासाठी १.२५ लाख होन राखून ठेवले. प्रभावी गुप्तचर यंत्रणा निर्माण केली. स्वदेशी व्यापार आणि उद्योगधंद्यांना संरक्षण दिले आणि वाढीसाठी प्रोत्साहनही दिले. राज्याभिषेकाचे वेळी अष्टप्रधान मंडळ नेमून त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची निश्चिती केली. स्वभाषा किंवा भाषाशुद्धीसाठी काम करताना रघुनाथपंत हणमंते, धुंडिराज लक्ष्मण व्यास यांच्या माध्यमातून राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली. स्वराज्यातले साधुसंत आणि गुणीजनांचा सन्मान करून त्यांना मदत दिली. महाराजांच्या प्रेरणेने अनेक लेखक, विद्वान आणि कवींनी उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती केली. परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे महाराजांनी पुनर्निमाण केले. परावर्तनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवताना नेतोजी पालकरांचे हिंदू धर्मात परावर्तन करून त्यांच्या मुलाला आपली मुलगी दिली.
दिल्ली जिंकण्याचे ध्येय
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य लक्ष्य दिल्ली जिंकण्याचे होते याचे समकालीन पुरावे आपल्याला मिळतात. १) जयसिंहाचा दरबारी कवी रत्नाकर पंडित याचे काव्य २) राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी केलेली भविष्यवाणी ३) अॅबे कॅरे या फ्रान्सच्या प्रवाशाने लिहून ठेवलेले वर्णन ४) गेरॉल्ड आँजिअर या मुंबईच्या इंग्रज वखारीच्या प्रमुखाने लिहिलेले पत्र यामधून हे ध्येय स्पष्ट होते.
शिवाजी महाराजांची मुद्रा
शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय लोकांचे कल्याण हेच होते हे त्यांच्या मुद्रेमधून दिसून येते.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता | ़
साहसूनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते ॥
अर्थ – प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी, शाहजीराजांचा पुत्र असलेल्या शिवाजी महाराजांची ही मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसत आहे.
राज्याभिषेकाची आवश्यकता
एक सार्वभौम राजा म्हणून इतर राजे अथवा शासनकर्त्यांशी करावे लागणारे तह, करार, तसेच आपल्या राज्यात दिलेली इनामे, नेमणूकपत्रे, वतने यांना अधिकृतपणा येण्यासाठी शिवाजी महाराजांना स्वत:स राज्याभिषेक करून घेणे तांत्रिक दृष्ट्या आवश्यक होते. शेकडो गडकोटांचे आणि सहस्त्रावधी सेनेचे स्वामी झालेल्या शिवाजी महाराजांनी स्वत:ला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ या दिवशी राज्याभिषेक करून घेतला. त्या दिवसापासून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली तसेच शिवराई होन म्हणजेच सुवर्णनाणी सुरू केली. राज्याभिषेक हा त्या राज्याचा आणि प्रजेचा एक श्रद्धा, स्वाभिमान, अस्मिता प्रगट करणारा सोहळा असतो तसाच तो एक आनंदसोहळाही असतो.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ या मुहूर्त दिनी पहाटेपासून अनेक विधी पार पडल्यानंतर शिवराय सुवर्णसिंहासनावर स्थानापन्न झाले. राजसभेतील मुख्य समारंभ पार पडला. आता भूपती, जलपती, गडपती, नरपती, गजपती, अश्वपती, पुण्यवंत, नीतीवंत, वरदवंत छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण अंबारी असलेल्या हत्तीवरून भव्य मिरवणुकीने वाजतगाजत वाडेश्वराच्या (जगदीश्वर) दर्शनाला निघाले.
राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने एक हिंदू राजा म्हणून त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने एक हिंदू राजा म्हणून त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे, शाहू महाराज यांच्याकडेही एक हिंदू राजा म्हणूनच पाहिले गेले. शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्यावेळेस बलाढ्य मुघल सम्राट औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मराठ्यांनी २७ वर्षे संघर्ष केला व स्वराज्याचे रक्षण केले. या स्वातंत्र्यसमराचे नेतृत्व छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी केले. याचाच परिणाम अपयशाने निराश झालेला औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ रोजी महाराष्ट्रातच मृत्यू पावला.
स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी अठराव्या शतकात स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर केले. यावेळी छत्रपती शाहू महाराज, पेशवे बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे तसेच असंख्य सरदार मंडळी आणि मुत्त्सद्दी यांच्या पराक्रम आणि कौशल्याने विशाल साम्राज्य निर्माण केले. ज्यावेळेस परकीय अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानवर वारंवार आक्रमण करून लुटालूट व अत्याचार सुरू केले त्यावेळेस राष्ट्ररक्षणाच्या कर्तव्य भावनेतून त्याच्याशी संघर्ष केला. १७५७मध्ये अब्दालीला पराभूत करून अटकेपार भगवा झेंडा फडकावला व अटक ते कटक हिंदूंचे शक्तिशाली साम्राज्य निर्माण करून शिवरायांचे स्वप्न साकार केले. कुठलीच गोष्ट अशक्य नाही हा शिवशाहीचा खरा संदेश. हिंदू संस्कृतीचा पूर्ण नाश होणार आणि तिची ओळख पुसली जाईल असे वाटत असतानाच हिंदूही राज्यकर्ते होऊ शकतात हा विश्वास शिवरायांनी आणि मराठा साम्राज्याने निर्माण केला. इतकेच नव्हे तर हे कालचक्र उलटे फिरविता येऊ शकते हे दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी भावी पिढ्यांपुढे हा आदर्श निर्माण केला की, आपापल्या पिढीपुढे जे जे आव्हान असेल ते अशक्य वाटले तरी ते शक्यतेच्या कोटीत आणता येते. भारत इस्लाममय करण्याचे इतिहासाचे कालचक्र शिवशाहीने परतवून लावले. असे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. हा इतिहासातून मिळालेला धडा आपल्याला पुढील काळात उपयोगी पडला. इंग्रजांच्या काळात जी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली, जे सांस्कृतिक उत्थान घडले, जे प्रबोधन आणि परिवर्तन घडले त्याची प्रेरणा आपल्याला शिवशाहीत दिसते.
मराठा साम्राज्याचा परिणाम
अठराव्या शतकात हिंदू समाज मराठ्यांच्या राजवटीत पुन्हा आर्थिकदृट्या सबल झाला. मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे हिंदूंवरील अत्याचार कमी झाले, जिझिया कर बंद झाला, हिंदू महिलांवरील अत्याचार थांबले, रजपूत समाजातील मुलींचा मुघल बादशहाच्या घराण्यात विवाह केला जाण्याची अत्यंत अपमानास्पद प्रथा बंद पडली, मठ-मंदिरांचा आणि मूर्तींचा विध्वंस थांबला. त्याच वेळी हिंदू संस्कृतीतील कला, संस्कृती आणि कलाकार यांचा विकास झाला. इंग्रजांच्या राजवटीतील बहुसंख्य संस्थानिक हिंदू होते याचे कारण पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर विस्तारलेल्या मराठा साम्राज्याचा प्रभाव हेच होते. म्हणूनच भारतातील मोठ्या भूभागावर हिंदू बहुसंख्यांक राहिले आणि बहुसंख्य संस्थानिक हिंदू होते. १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने एकूण ५६२ संस्थाने भारतामध्ये विलीन केली गेली. त्यापैकी सुमारे ५०० संस्थानिक हिंदू होते. हिंदू बहुसंख्य राहिले त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या कल्पनेप्रमाणे संविधान आणू शकलो आणि आजपर्यंतची वाटचाल करू शकलो.
पावन पर्व – राज्याभिषेक शक ३५०
जसे आपण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे अमृत पर्व साजरे केले तसेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच २ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक शक ३५० चा प्रारंभ झाला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक प्रेरणादायी घटना आहे. या निमित्ताने या पावन पर्वात सामील होऊन सर्व भारतभर देशभक्तीचा जागर करावा तसेच शिवरायांच्या या गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासाचा प्रसार व प्रचार करावा हेच सर्व भारतीयांना आवाहन.
सुधीर थोरात
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आहेत.)