जय महाराष्ट्र सैनिकांनो…
१९६६ साली हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू करण्यापूर्वी २ वर्ष आधीचा… माझा जन्म शिवाजी पार्क, मुंबईचा…
आई-वडिलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे… माझे सगळे शालेय शिक्षण मुंबईच्या उपनगरातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले…
सगळं आयुष्य मुंबईच्या एका उपनगरात गेलं… त्यामुळे मी पक्का मराठी मुंबईकर आहे…
मूळगाव तळ कोकणात… मुंबईतला तळ कोकणातला माणूस शिवसेनेच्या मागे एक दिलाने उभा राहिला… तसा मीही स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून जाऊन… कट्टर शिवसैनिक बनलो… बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वंदनीय माननीय पूजनीय सगळं काही होते… माझ्यासाठी “साहेब” एकच होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे…
स्व. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र वाचनात आल्याने… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने मी पुरता भारावून गेलो होतो…

त्यातच ८० च्या दशकात स्व. बाळासाहेबांची दमदार भाषणे… तडफदार वक्तृत्व… रोखठोक विचार… मिश्किल टीकाटिप्पणी… मार्मिक साप्ताहिकामधील खुमासदार व्यंगचित्रे आणि मुंबईकर मराठी माणसासाठी त्यांचा तुटणारा जीव यामुळे मी शिवसेनेकडे आकृष्ट झालो… बाळासाहेबांना मराठी माणसाचे दैवत मानू लागलो… आणि माझ्या दैवतामुळे मी कधी शिवसैनिक झालो हे माझे मलाच कळले नाही… तो काळ होता १९८० चा… माझं जेमतेम १६/१७ वर्षे होतं एवढा मी तरुण… नुकताच कॉलेजला प्रवेश घेतलेला कॉलेज विद्यार्थी होतो… स्वर्गीय बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेला एक अस्सल मुंबईकर मराठी शिवसैनिक…
बाळासाहेब शिवसेना प्रमुख असले तरी त्यांची जडण घडण ही व्यंगचित्रकार आणि संपादक म्हणून झाली होती… त्याचाही परिणाम त्यांच्या भाषेवर झाला आहे… त्यांचा प्रत्येक शब्द हा व्यंगचित्रासारखाच बाहेर पडत असे…
बाळासाहेब व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषेत उपमा, प्रतिमा आणि रुपके पाहायला मिळत असत… शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यंमत्री होते तेव्हा बाळासाहेब भरसभेत त्यांना ‘साखरेचे पोते’ संबोधून हश्या आणि टाळ्या मिळवत… त्याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना एका मुलाखतीत त्यांनी ‘मोरारजी डायरचाही बाप आहे’ या शब्दात त्यांच्यावर टीका केली होती… अण्णा हजारेही बाळासाहेबांच्या वाग्बाणांपासून वाचलेले नाहीत… महाराष्ट्रात शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता होती तेव्हा अण्णा काही मंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाची टिंगल करतांना बाळासाहेबांनी त्यांना ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हटले होते… महाराष्ट्राची जनता साहेबांच्या या खोचदार वक्तृत्वावर भयंकर खुश होती आणि याला आम्ही ” ठाकरी शैली” म्हणत असू…
साहेबांच्या “ठाकरे शैली”चे सर्वात मासलेवाईक उदाहरण म्हणजे… युती असताना साहेबांनी जाहीरपणे भाजपचा “कमळाबाई” म्हणून केलेला उल्लेख… कमळाबाई म्हटलं की आजही भक्तांची जाम करपते… आणि आम्हाला आतून गुदगुल्या होतात…
मग मी हळूहळू शिवसनेचा इतिहास वाचू लागलो… जुन्या जाणत्या शिवसैनिकांकडे चौकशी करू लागलो…

स्वातंत्र्यानंतर देशाने भाषावर प्रांत रचना स्वीकारून देखील… मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबई महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी मुंबईच्या मराठी माणसाला जो शब्दातीत संघर्ष करावा लागला… संयुक्त महाराष्ट्राची प्रचंड चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली… संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पोलीस गोळीबारात १०६ हुतात्मे झाले… त्या पार्श्वभूमीवर १९६० साली महाराष्ट्राचा मंगल कलश आल्यावर देखील… मुंबईत मराठी माणसावर परप्रांतीयांकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात… सरकारी नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना… मराठी माणसाला डावलले जाण्याच्या विरोधात… अस्वस्थ मराठी मुंबईकरांच्या मनातील असंतोषाला बाळासाहेबांनी वाचा फोडली… १९ जून १९६६ रोजी शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘मी माझा बाळ या महाराष्ट्राला देतोय’ असं सांगत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली… “मराठी माणसाच्या न्याय हक्का”साठी शिवसेनेची स्थापना केली… अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या नावाने स्थापन झालेल्या “शिवसेने” भोवती… त्यांच्याच भगव्या झेंड्याखाली मुंबईतील मराठी तरुण मोठ्या संख्येने एकवटला… विशेषतः माझ्या तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समस्त मराठी मुंबईकर बघता बघता शिवसैनिक झाला… बाळासाहेबांवरून जीव ओवाळून टाकू लागला… “साहेबां”चा शब्द त्याच्यासाठी अंतिम होता…
मुंबईच्या राजकीय सारीपाटावर बाळासाहेबांच्या शिवसेनेची एन्ट्री झाली… ८०% समाजकारण आणि २०% राजकारण… आणि ते २०% राजकारण कशासाठी?… तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी… बस्स… आता कोणाचीच गरज नाही… आपल्याला आपला हक्काचा नेता… आणि आपला हक्काचा राजकीय पक्ष मिळाला आहे… हीच बहुसंख्य मुंबईकर मराठी माणसाची भावना होती… “मराठी माणूस” (विशेषतः मुंबईतला) हा शिवसेनेच्या केंद्रस्थानी होता… आणि त्यातला मी एक होतो याचा मला नेहमी अभिमान वाटत आला…

बघता बघता मुंबईत जवळपास प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा उघडू लागल्या… संध्याकाळी मोठ्या संख्येने मराठी तरुण त्या शाखांमध्ये येऊ लागले… शाखेवर डौलाने फडकणारा भगवा, शाखेत ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा, शाखेच्या बाहेर रंगवलेला आणि एका अर्थाने शिवसेनेचा लोगो ठरलेला तो फिस्कारणारा वाघ नि अत्यंत वळणदार आणि सुंदर हस्ताक्षरातील रंगीबेरंगी खडूंनी लिहिलेला फळा… सगळ्या शिवसैनिकांसाठी शाखा म्हणजे आकर्षणाचा आणि अभिमानाचा विषय होता…
शिवसेनेची शाखा ही गरजू नागरिकांसाठी एक आधार केंद्र बनू लागली होती… आपल्या अडीअडचणी तक्रारी घेऊन अनेक नागरिक शिवसेनेच्या शाखेत यायचे… शाखाप्रमुख आपल्या परीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असे… समोरच्याला गोड शब्दात समजले तर ठीक अन्यथा कानफाट फोडून समजावण्याची शिवसैनिकांची स्टाईल होती…
“वडापावची गाडी” ही मराठी तरुणाला रोजगारासाठी शिवसेनेने दिलेली अलौकिक देणगी आहे… (आणि तुमची रोजगाराची गाडी वडापावच्या पुढे कधी गेलीच नाही म्हणून वडापाव खात खात आम्हाला हिणवणाऱ्या खवट्या भाजपवाल्यांच्या बालबुद्धीची मला कीव येते)…

७०च्या दशकांत नोकरभरतीमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो, असं सांगत शिवसेनेने एअर इंडिया, ओबेरॉय शेरेटन हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फूड कार्पोरेशन यांच्यावर मोर्चे काढायला सुरुवात केली होती… त्याकाळी या आस्थापनांचे प्रमुख अमराठी असायचे…
त्यापैकीच एअर इंडियाच्या मुख्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला होता… या मोर्चाचं नेतृत्व खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं… या मोर्चात एअर इंडियाचे चीफ पर्सनेल ऑफिसर नंदा यांचे कानफाट फोडण्यात आले होते… साहेबांच्या पुढ्यात…
“कोणाला अटक झाल्यास एअर इंडियाच्या बाहेर जमलेले शिवसैनिक चिडतील, असा इशारा साहेबांनी मोर्चाच्या वेळी दिला होता… त्यामुळे या मोर्चानंतर पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नाही… असा होता साहेबांचा अर्थात शिवसेनेचा दरारा आणि साहेबांची स्टाईल… सर्वसामान्य मराठी मुंबईकराला शिवसेनेचा हा खाक्या भयंकर आवडला होता…
यातूनच १९७४ साली साहेबांच्या पुढाकाराने… सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि बँकांमध्ये मुंबईच्या ८०% स्थानिक भूमीपुत्रांची अर्थात् मराठी उमेदवारांची भरती व्हावी यासाठी संघर्ष करणाऱ्या “स्थानीय लोकाधिकार समिती” ची स्थापना झाली… आणि पुढे या समितीने मुंबईच्या हजारो मराठी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या… शिवसेनेचे हे योगदान न विसरता येण्यासारखे आहे…

एकमेकांना भेटल्यावर ” जय महाराष्ट्र” म्हणताना… दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला जाताना हातात भगवा आणि मुखाने “आवाज कुणाचा… शिवसेनेचा” ” जय भवानी जय शिवाजी” गर्जना करताना… या तरुण शिवसैनिकांमध्ये चैतन्याची एक विलक्षण लहर उसळायची… दसरा मेळावा हा नुसता मेळावा नसायचा तर बाळासाहेबांच्या ओजस्वी विचारांचे सोने लुटायला अक्षरशः लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर जात असे… (आम्ही एकमेकांशी बोलताना जय महाराष्ट्र म्हणत असलो तरी जाहीर कार्यक्रमात मात्र “जय हिंद जय महाराष्ट्र” म्हणण्याची काळजी घेत असू)
आणि त्याच आवेशात साहेबांच्या नुसत्या एका इशाऱ्यावरून… आमचा शिवसैनिक “हटाव लुंगी बजाव पुंगी” घोषणा देत… बेळगावच्या खालचे सगळे मद्रासी असे समजून… उडप्यांपासून शहाळी विकणाऱ्यापर्यंत सगळ्यांना सळो की पळो करून सोडत होता… आणि तेव्हापासूनच “परप्रांतीय” हा शब्द आमचा आवडता झाला… नागपूरच्या वर सगळे भैय्ये आणि बेळगावच्या खाली सगळे मद्रासी… आमची “परप्रांतीयां”ची एवढी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या होती… (पश्चिम महाराष्ट्रात यादव आडनाव असते आणि विदर्भात पांडे तिवारी ही आडनावे मराठी माणसांची आहेत… हे एका भाजपवाल्याकडून मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा चाट पडलो होतो… कारण आमच्या कोकणात असला फाजीलपणा चालत नाही… माझ्या दृष्टीने यच्चयावत यादव पांडे तिवारी हे परप्रांतीयच होते…)
१९६६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात… शिवसेनेनं पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्कात पहिली सभा आयोजित केली होती… कारण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बराच काळ जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते. शेवटी जाहीर सभा घेण्याचं ठरलं आणि ती शिवाजी पार्कवर घ्यायचं ठरलं.
या सभेला काँग्रेसचे नेते रामराव आदिक उपस्थित होते… ती सभा अभूतपूर्व होती असे त्या सभेला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाने मला सांगितले… तेव्हा माझा उर अभिमानाने भरून आला…
तरी पण पक्षातील काही नतद्रष्टांनी साहेबांच्या लोकप्रियतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाच… बळवंत मंत्री हे शिवसेनेचे संस्थापक सदस्य होते… शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात संघटनेत बाळासाहेबांच्या खालोखाल त्यांचीच जागा होती… मात्र साहेबांनी आपल्या वाणीनं तरुणांना भुरळ घातली होती आणि त्यामुळे शिवसैनिकांसाठी साहेबांपेक्षा मोठं कुणीच नव्हतं… शिवसेनेतही साहेबांचा शब्द शेवटचा मानला जायचा… हीच गोष्ट बळवंत मंत्री यांना पटली नाही आणि त्यांनी शिवसेनेत लोकशाही हवी, अशी मागणी करण्याचं ठरवलं… त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी सभा बोलावली होती… मात्र शिवसैनिकांनी ती सभा उधळून लावली आणि बळवंत मंत्री यांची दादरच्या वनमाळी हॉल ते शिवाजीपार्क येथील बाळासाहेबांच्या राहत्या घरापर्यंत धिंड काढली… बळवंत मंत्री नुसत्या धिंडीवर निभावले याचे मला आजही खूप दुःख होते… पक्षातली लोकशाही वगैरे घरी ठेवायचं… आमचा पक्ष फक्त साहेबांच्या आदेशानुसारच चालणार हीच सर्वसामान्य शिवसैनिकाची धारणा होती…

त्याच्या पुढच्याच वर्षी ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली… एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले… त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला शिवसेनेने ठाणे नगरपालिका निवडणूक लढवली आणि शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष झाला… वसंतराव मराठे… मुंबई स्थापन झालेल्या शिवसेनेने पहिली सत्ता मिळवली की ठाण्यात… आमच्या साहेबांचा करिश्माच तसा होता…

१९६८ साली शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढली… म्हणजे स्थापनेनंतर २ च वर्षांनी… यावेळी सेनेनं मधू दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती… निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेनं पहिल्याच फटक्यात ४२ नगरसेवक निवडून आणले होते… ढाल तलवार या निशाणीवर… कारण आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाची कोणतीच मान्यता नव्हती.. त्यामुळे सगळे उमेदवार अपक्ष आणि सगळ्यांची निशाणी ढाल तलवार… ढाल तलवार का तर आमचा पक्ष छत्रपती शिवरायांच्या नावाने स्थापन झाला होता.. आणि शिवराय नि त्यांचे मावळे म्हणजे ढाल तलवार… आमच्या साहेबांच्या दूरदृष्टीने निवडलेल्या चिन्हामुळे आजही माझ्या डोळ्यात पाणी येते…
त्यावेळी शिवसेनेत फारशा महिला नसतानाही स्नेहलता कोरडे या नायगाव हिंदमाता मतदारसंघातून पहिल्या महिला शिवसेना नगरसेवक झाल्या… हे कळल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही… आणि साहेबांबद्दलचा आदर दुणावला…
या निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेकडून एक मिरवणूक काढण्यात आली होती… लहू आचरेकर आणि ऑर्थर डिसुझा नावाचे कार्यकर्ते या मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनले होते… तेव्हा त्यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण होता… शिवसेनेची आपल्या प्रचाराची ही अनोखी स्टाईल तेव्हा गाजली होती… मुंबईतील पहिली निवडणूक असूनही शिवसेनेने मुंबईत आपली चांगलीच छाप सोडली… साहेबांच्या अनोख्या कल्पनाशक्तीला मी मनोमन त्रिवार मुजरा केला…
याच दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक भाई शिंगरे यांचे बंधू बंडू शिंगरे यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप झाला आणि साहेबांनी त्यांना पक्षाच्या भर बैठकीतून बाहेर काढलं होतं… बंडू शिंगरे चांगलेच खवळले होते आणि त्यानंतर ते नेहमीच साहेबांच्या विरोधात बोलू लागले… स्वारी इथंच थांबली नाही तर साहेबांना विरोध करण्यासाठी त्यांना प्रतिशिवसेनेची स्थापना केली आणि स्वतःला प्रतिशिवसेनाप्रमुख अशी उपाधीसुद्धा लावली… मात्र साहेबांसारखं वागणं त्यांना कधीच जमलं नाही (आणि ते बापजन्मात शक्यही नव्हतं कारण साहेब ते साहेब) आणि काहीच दिवसांत त्यांची प्रतिशिवसेना मरगळली… शिवसेनेला खिंडार पडण्याचा त्यांचा हा प्रयोग पुरता फसला…
(क्रमश:)
– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक