Thursday, January 1, 2026

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

Share

पाठोपाठ १९९१ साली परत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या… सेना भाजप युती आता आणखी घट्ट झाली होती… या निवडणुकीत आमच्या हिमतीवर आमचे १ चे ४ वाघ झाले… आणि आमच्यामुळे भाजपचे ५ उमेदवार निवडून आले… पण हे नमकहराम भाजपवाले कधीच मान्य करत नाहीत…

अल्पमतातील काँग्रेस सरकारचे नरसिंह राव पंतप्रधान झाले…

एव्हाना साहेबांच्या हिंदुत्वाचा डंका गोदावरी ओलांडून थेट उत्तर प्रदेशा गंगेच्या खोऱ्यात वाजत होता… १९९१ च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पवन पांडे नावाचा वाघ आंबेडकर नगर जिल्ह्यातल्या अकबरपुर

विधानसभा मतदारसंघातून सेनेचा भगवा घेऊन उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचला होता… मी तर अत्यानंदाने दोन-चार वेळा हळूच “जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश”च्या घोषणा पण दिल्या होत्या…

पुढे या परप्रांतीयाने साहेबांशी गद्दारी केली… चक्क मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत गेला… पण ४ वेळा विधानसभा आणि २ वेळा लोकसभा लढवून त्याला एकदाही विजय मिळवता आला नाही… साहेबांचे आणि शिवसैनिकांचे शाप त्याला बाधले असेच मी मानतो… “शेवटी भैय्या तो भैय्या, आपल्या जातीवर गेला” म्हणून आम्ही शिवसैनिकांनी त्या पांड्याला खूप शिव्या घातल्या…

१८ ऑक्टोबर १९९१ रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला… शिवसेनेच्या या मेळाव्यात साहेबांनी २८ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध करत… भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी ‘मुंबई बंद’ करण्याचा इशारा दिला… त्याकाळी मुंबई बंद फक्त दोघेच जण करू शकत असत… एकतर बाळासाहेबांची शिवसेना किंवा पाऊस…

पण आमचे कट्टर सैनिक शिशिर शिंदे कुठे ऐकायला… त्यावेळी शिशिर शिंदे हे काही कार्यकर्त्यांसह वानखेडे स्टेडियममध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उखडून टाकली… ते यावरच थांबले नाहीत… त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑईलही टाकले… त्यामुळे हा सामनाच रद्द करावा लागला होता…

यानंतर साहेबांनी शिशिर शिंदे यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवले होते… त्यांचे गाजलेले आणखी एक आंदोलन म्हणजे १९९० च्या दशकात सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना तेल टंचाईचा सामना करावा लागला

होता… यानंतर शिशिर शिंदे यांनी थेट धारा तेलाचे ट्रक अडवून त्याचे सर्वसामान्यांना वाटप केले होते…

पुढे २००६ साली शिशिर शिंदे शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले… साहेबांनी पाठीवर हात ठेवलेले… मोठे केलेले शिवसैनिक पक्षाशी गद्दारी का करतात आणि कशी करू शकतात?… हे मला आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे… १२ वर्षांनी आपली चूक कळल्यावर हेच शिशिर शिंदे… २०१८ साली पुन्हा शिवसेनेत आले…

असो… तोपर्यंत शिवसेनेच्या राजकीय आयुष्यातील एक सोनेरी पान असलेले ते १९९२ चे वर्ष आले… राम जन्मभूमी आंदोलनाचे.

शिवसेना सुरुवातीपासूनच राम जन्मभूमी आंदोलनाची कट्टर समर्थक होती… अनेक शिवसैनिकांनी १९९२ मधील ‘कार सेवा’ मध्ये भाग घेतला होता.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितले होते की… “जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे”… या भूमिकेमुळे शिवसेनेला सबंध देशात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ठोस ओळख मिळाली… विशेषतः विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नसताना आमच्या साहेबांनी दाखवलेला बाणेदारपणा हिंदू समाजाला खूप भावला…

बाळासाहेब त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे उघड उघड… मुस्लिम आतंकवाद… त्यांची जिहादी मानसिकता… त्यांचा देशद्रोह या सगळ्यावर प्रचंड घणाघात

करत होते… आणि आम्ही प्रचंड जल्लोष करत असू…

आणि पाठोपाठ आल्या… १९९२/९३ च्या मुंबईतील हिंदू मुस्लिम दंगली आणि बॉम्बस्फोट…

बाबरी मशीद पाडल्याचे निमित्त साधून… मुंबई हिंदू मुस्लिमांच्या पूर्वनियोजित दंगली व बॉम्बस्फोट घडवण्यात आले… जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीत ६ बहुतेक मराठी हिंदू  माता बंधू भगिनींना मुसलमानांनी जिवंत जाळले…

मग मात्र मराठी हिंदू समाजाचा संयम सुटला… नंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि सुमारे ९०० लोक, मुख्यतः मुस्लिम, मारले गेले… यामुळे मुंबईत मोठे धार्मिक तणाव निर्माण झाले होते…

मुंबईत देशद्रोही दाऊद इब्राहिमने १२ बॉम्बस्फोट घडवले… २५७ बहुतांशी निरपराध हिंदू नागरीक मारले गेले… हजारो निरपराध हिंदू जखमी आणि कायमचे अपंग झाले… शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता उद्धवस्त झाली… पण मुंबईकरांना एकच आधार होता… साहेब आहेत… आणि साहेबांची शिवसेना आहे…

त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी तर खोटेपणाची हद्द केली होती… “मुस्लिम वस्तीत १३ वा बॉम्बस्फोट झाला आहे” असे खोटेच जनतेला सांगितले होते… बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या “नीच प्रवृत्ती”चा त्यांनी परिचय करून दिला होता.

या दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण आयोगाने…  “८ जानेवारी १९९३ पासून शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी मुस्लिमांवर आणि त्यांच्या मालमत्तांवर सुनियोजित हल्ले केले… शिवसेनेच्या शाखांनी स्थानिक कमांड सेंटर म्हणून काम केले आणि हल्लेखोरांनी मतदारांच्या याद्या घेऊन मुस्लिमांच्या मालमत्ता लक्ष्य केल्या… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “अनुभवी सेनापतीप्रमाणे” आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना मुस्लिमांवर हल्ला करून ‘बदला’ घेण्याचे आदेश दिले”… असे निरीक्षण नोंदवले होते…

ही साहेबांच्या आणि शिवसैनिकांच्या कर्तबगारीची पोचपावती होती… साहेबांचा आदेश म्हणजे शिवसैनिकासाठी अंतिम शब्द असल्यामुळे… त्यांनी दाखवलेल्या क्षात्रतेजाने मुंबईचा हिंदू वाचला… अशीच माझी व असंख्य मुंबईकर मराठी आणि परप्रांतीय हिंदूंची भावना झाली होती… विशेषतः हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या (म्हणजेच मुस्लिम बहुसंख्य असलेल्या) वस्त्यांमध्ये शिवसेना ही तिथल्या हिंदू माणसाला समाजाला आधार ठरली…

खरं म्हणजे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार साहेबांवर आणि शिवसेनेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती पण कोणत्याच काँग्रेसच्या सरकारची ती हिम्मत झाली नाही… हा होता आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा…

आता शिवसेना ही मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य घटक बनली होती…

मुंबईतील परप्रांतीय हिंदूंसाठी विशेषतः हिंदी भाषिकांसाठी… ‘दोपहर का सामना’ १९९३ मध्ये सुरू झाला… त्यामुळे शिवसेनेला व्यापक जनसमर्थन मिळवता आले… संजय निरूपम या परप्रांतीय हिंदू शिवसैनिकाचा चेहरा शिवसेनेला मिळाला… पुढे साहेबांनी या संजय निरूपमला राज्यसभेवर देखील पाठवले… पण बहुदा २००५ साली परत राज्यसभेची खासदारकी न मिळाल्यामुळे हा हरामखोर बिहारी काँग्रेसमध्ये गेला…

आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे एक पुस्तक दाखवून… त्या पुस्तकात लिहील्याप्रमाणे… ठाकरे कुटुंब मूळ बिहारचे… ते बिहारहून महाराष्ट्रात आल्याचा दाखला देत फिरत होता… त्यावेळी भक्तांच्या टोमण्यांना तर ऊत आला होता… तो हरामखोर संजय निरुपम त्यांच्यासाठी हिरो झाला होता… आज ठाकरे कुटुंबाला “बिहारी” म्हणणे याच्यासारखे दुसरे पाप नाही… अशीच आमच्या शिवसैनिकांची भावना होती…

याच दरम्यान नरसिंह राव यांच्या अल्पमतात असलेल्या सरकारला ३ अविश्वासाच्या ठरावांना सामोरे जावे लागले… त्यापैकी जुलै १९९३ मध्ये भाजपने आणलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी आमचे खासदार मोहन रावले यांनी पोट बिघडल्याचे कारण सांगितले आणि मतदान चुकवल्याने सरकार अल्प मताने बचावले… काही बदमाश विरोधकांनी मोहन रावले यांच्या घरासमोर लाऊड स्पीकर लावून… पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे हे गाणे लावले होते… मला मोहन रावले यांचा मनातून राग आला होता पण साहेबांना त्यांचा राग आला नाही म्हणून माझाही राग कुठच्या कुठे पळून गेला…

१९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेना-भाजप युतीच्या पारड्यात भरभरून मते टाकली… सेना भाजप युतीला १३८ जागा मिळाल्या… १६९ जागा लढवून आमचे ७३ आमदार निवडून आले तर भाजपने ११६ जागा लढवल्या आणि त्यांचे ६५ आमदार निवडून आले… (यावेळी देखील मोठा भाऊ आम्हीच ठरलो… आणि काही दळभद्री भाजपवाल्यांना अजूनही पटत नाही… आपले अपयश झाकण्यासाठी ते स्ट्राईक रेट काढायला सांगतात)… बहुमताला कमी पडणाऱ्या जागा अपक्षांच्या मदत मदतीने आम्ही पूर्ण केल्या आणि ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने… शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली… त्यांचा शपथविधी सोहळा १४ मार्च १९९५ रोजी जिथे दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो त्या शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित करण्यात आला होता… सर्वसामान्य शिवसैनिकालाही या सोहळ्यात सहभागी होता यावं म्हणून शपथविधी राजभवनावर न करता… शिवाजी पार्कात करण्यात आला होता… लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली… डोळे भरून तो सोहळा बघितला… सोन्याला सुगंध यावा तसा हा सोहळा होता… थोडे दिवस माझ्यासकट प्रत्येक शिवसैनिकाला आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो आहोत असा भास होत होता…

असे होते आमचे साहेब शिवसैनिकावर जीवापाड प्रेम करणारे… त्याची काळजी घेणारे…

पण एवढे अफाट यश मिळूनही आपण स्वतः निवडणूक लढवावी… सत्तेत सहभागी व्हावे असे साहेबांना कधीच वाटले नाही… ते नेहमी किंग मेकरच्या भूमिकेत राहिले… त्यामुळे त्यांच्याविषयीचा मला वाटणारा आदर शतगुणित झाला होता…

मात्र माधुकरी मागणारा एक मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याची किमया फक्त आमचे बाळासाहेबच करू शकत होते…

मात्र त्या मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ यासारखी दोन महत्त्वाची खाती… आम्ही मोठा भाऊ असूनही धाकट्या भावाच्या अर्थात भाजपच्या हातात गेल्याचे दुःख मला अजूनही होते… विक्रम आणि वेताळातल्या गोष्टीतल्या वेताळासारखा हा भाजप सेनेच्या मानगुटीवर कायमचा बसला आहे याचा मला संताप येत असे… (मला तर काही वेळा प्रमोद महाजनांनी साहेबांवर वशीकरणाचा जादूटोणा करून त्यांना भारून टाकले होते का अशी शंका येते…)… पण त्याच वेळी साहेबांच्या दिलदार वृत्तीचा दाखला देखील मिळतो… युती टिकवण्यासाठी आमच्या साहेबांनी केलेला हा त्याग होता… कद्रु वृत्तीच्या भाजपने कधी त्याची कदर केल्याचे मला आठवत नाही… मात्र तेव्हा महाराष्ट्रात भाजपला कोण विचारत होते?… शिवसेनेमुळे आणि साहेबांमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला हे समीकरण आम्हां शिवसैनिकांच्या डोक्यात तेव्हापासून घट्ट बसले ते कायमचेच…

याच विधानसभा निवडणुकीत आमच्या ढाण्या वाघ बाळा नांदगावकरांनी लखोबा लोखंडेला मुंबईच्या त्याच माझगाव मतदार संघात आसमान दाखवले…

पुढे हेच बाळा नांदगावकर २००६ साली साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करून… साहेबांच्या डोळ्यादेखत राज ठाकरे यांचा हात धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले… तेव्हा मी बाळा नांदगावकरला मनातल्या मनात अक्षरशः

शिव्यांची लाखोली वाहिली होती…

पुढे १९९७ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे ६ खासदार निवडून आले तर युतीधर्म पाळून आम्ही मित्र पक्षाचे म्हणजे भाजपचे चार खासदार निवडून आणले… कारण मोठा भाऊ आम्ही होतो आणि युतीधर्म पाळणे ही आमची नैतिक जबाबदारी होती… ती आम्ही पाळली देखील…

अवघ्या १३ दिवसांच्या पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या अल्पकालीन सरकारमध्ये देखील भाजप सोडून अन्य पक्षाचा एकच मंत्री होता आणि तो होता शिवसेनेचा… इंडस्ट्री मिनिटस्टर सुरेश प्रभू… यावरून आमच्या साहेबांचा रुबाब आणि दरारा सगळ्या देशाच्या लक्षात आला…

हे सरकार अल्पकालीन ठरल्यामुळे एक शिवसैनिक केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर झाल्याचा आमचा आनंद देखील १३ दिवसांसाठीच टिकला…

१९९८ साली भाजपच्या पुढाकाराने अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) स्थापना झाली… रालोआमध्ये शिवसेना हा भाजपचा अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा सहकारी होता कारण आमची युती वैचारिक होती… व्यापक हिंदुत्वासाठी होती… काँग्रेस मुक्त महाराष्ट्रासाठी होती… सत्ता आहे किंवा नाही याचा साहेबांनी कधी विचार केला नाही आणि कायम भाजपची पाठराखण केली…

यामुळे “केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही” हे अलिखित समीकरण भाजप आणि सेनेत रूढ झाले… म्हणजे केंद्रात मोठा भाऊ तुम्ही आणि राज्यात मोठा भाऊ आम्ही… असा एका अर्थी परस्परांच्या संमतीने व स्वखुशीने केलेला तो नियतीशी करार होता.

आणि मग १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे ६ तर  भाजपचे ४ उमेदवार आम्ही मोठा भाऊ या नात्याने निवडून आणले… पण कोत्या मनाचे भाजपवाले हे कधीच मान्य करत नाहीत… असो, पण आमचे खासदार सुरेश प्रभू हे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाले…

पुढे २०१४ साली याच सुरेश प्रभूंनी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपची वाट धरली आणि केंद्रात मंत्रीपद मिळवले… शिवसैनिक सत्तेसाठी आमच्याशी गद्दारी करू शकतो ही कल्पनाच मला सहन होत नाही… हरामखोर लेकाचे…

याच १९९८च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची गिरगावात एक सभा पार पडली… या सभेला बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, उद्धव ठाकरे उपस्थित होते… याच सभेत बाळासाहेब  भाषणाला उभे राहिल्यावर शिवसैनिकांनी फटाके फोडायला सुरुवात केली… खूफ वेळ गेल्यानंतरही फटाक्यांचा आवाज काही शांत होईना… शेवटी कंटाळून बाळासाहेब दोन्ही पायांवर खाली उकीडवे स्टेजवर बसून राहिले… बाळासाहेबांचा हा मिश्किलपणा पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला…

असे होते आमचे साहेब… मिश्किल… समयसूचक आणि हजरजबाबी…

(क्रमश:)

– तुमचाच
बाळसाहेबांचा शिवसैनिक

या आधीचे भाग वाचा –

१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३

अन्य लेख

संबंधित लेख