Saturday, January 3, 2026

अधिकृतपणे सांगतो…” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

Share

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मोठी घोषणा केली.

मिडिया आणि विरोधकांना फटकारले!
भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देऊन महापौराच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण करणाऱ्यांना फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. “कृपाशंकर सिंह आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? त्यांनी ते विधान मीरा-भाईंदरमध्ये केले होते, मुंबईत नाही. तुम्ही मीरा-भाईंदरचे विधान मुंबईला जोडून हुशारी दाखवू नका,” अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि विरोधकांना सुनावले.

संदिग्धता संपली: भाजपचा ‘मराठी-हिंदू’ अजेंडा स्पष्ट
मुंबईच्या महापौराबाबत भाजपच्या भूमिकेविषयी जी काही चर्चा सुरू होती, तिला मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी अत्यंत ठामपणे तीन गोष्टी स्पष्ट केल्या: १. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. २. मुंबईचा महापौर हिंदू असेल. ३. मुंबईचा महापौर मराठीच असेल.

या विधानामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा प्रचाराचा मुख्य अजेंडा ‘मराठी अस्मिता’ आणि ‘प्रखर हिंदुत्व’ हाच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबईकरांचा कौल कुणाकडे?
मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अडीच दशकांपासून असलेल्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि मराठी मतदारांना साद घालण्यासाठी फडणवीस यांनी हे ‘मास्टरस्ट्रोक’ मानले जाणारे विधान केले आहे. मुंबईत येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे निवडणुकीची संपूर्ण समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख