Saturday, January 10, 2026

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

Share

मुंबई : “मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवली प्रभाग क्र. २६ मधील भाजप-महायुतीच्या उमेदवार प्रीतम पंडागळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

कांदिवलीत उभारणार ‘कोकण भवन’

कांदिवली पूर्व परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसाठी नितेश राणे यांनी महत्त्वाची घोषणा केली. “कोकणच्या संस्कृतीचे आणि समृद्ध परंपरेचे जतन करण्यासाठी या परिसरात स्वतंत्र ‘कोकण भवन’ उभारण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. यामुळे मुंबईत राहणाऱ्या माझ्या कोकणवासी भावा-बहिणींना हक्काचे केंद्र मिळेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

महापालिकेवर ‘हिंदुत्वाचा भगवा’ फडकवणार

मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा फडकवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. “मुंबईच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक मत भाजपला द्या,” असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

यावेळी व्यासपीठावर मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उमेदवार प्रीतम पंडागळे, विजय साळवी, अविनाश राय, सचिन नांदगावकर, अमर पन्हाळकर, राकेश चव्हाते यांसह भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख